‘कमाई अठन्नी आणि खर्च रुपया’ ही जुनी म्हण आजच्या काळात अगदी तंतोतंत लागू पडताना दिसत आहे. माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाडकष्ट करतो, घाम गाळतो, प्रामाणिकपणे पैसे कमावतो; परंतु महिनाअखेरीस त्याच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. उलट पुढचा महिना कसा काढायचा, हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो. एकेकाळी शंभर रुपयांत भरून येणारी किराणा सामानाची पिशवी आज हजार रुपये खर्च करूनही पूर्ण भरत नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. महागाईने अक्षरशः सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.
महागाई हा शब्द ऐकायला साधा वाटत असला, तरी त्याचे परिणाम अत्यंत गंभीर आहेत. कारण महागाई केवळ वस्तूंच्या किमती वाढवत नाही, तर ती माणसाच्या जगण्यातील आनंद, समाधान आणि सुरक्षिततेची भावनाही हिरावून घेते. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांच्या गरजा कमी होत नाहीत. मात्र, त्या पूर्ण करण्याची त्यांची आर्थिक क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते. परिणामी अनेक कुटुंबांना आपल्या इच्छा-आकांक्षा आणि स्वप्नांना मुरड घालावी लागते.
आज बाजारात गेल्यानंतर सर्वसामान्य माणसाची अवस्था पाहण्यासारखी असते. भाजीपाला, डाळी, खाद्यतेल, तांदूळ, गहू, दूध, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती पाहून त्याच्या कपाळावर आठ्या पडतात. पूर्वी किलोभर खरेदी करणारा ग्राहक आता अर्धा किलो किंवा पाव किलो खरेदी करून समाधान मानतो. दुकानदाराकडे वस्तूंची चौकशी करताना त्याचा पहिला प्रश्न असतो, ‘भाव किती आहे?’ आणि किंमत ऐकल्यानंतर तो विचार करतो, ‘हे घ्यावे की नको?’ ही परिस्थिती केवळ एखाद्या कुटुंबाची नसून असंख्य मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांची आहे. विशेष म्हणजे, महागाईचा सर्वाधिक फटका बसतो तो हातावर पोट असणार्या कष्टकरी वर्गाला. रोज काम मिळाले तर चूल पेटते आणि काम मिळाले नाही तर उपाशी राहण्याची वेळ येते, अशी अनेकांची परिस्थिती आहे. बांधकाम मजूर, शेतमजूर, घरकाम करणार्या महिला, छोटे व्यावसायिक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगार यांचे उत्पन्न अनिश्चित असते. मात्र, घरभाडे, वीजबिल, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि किराणा यांचा खर्च निश्चित असतो. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईशी सामना करताना त्यांची अक्षरशः दमछाक होते.
महागाईचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे सामान्य कुटुंबांच्या आहारावर होणारा परिणाम. पौष्टिक अन्न ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे; परंतु फळे, दूध, डाळी आणि इतर पौष्टिक पदार्थ महाग झाल्यास गरीब कुटुंबांना त्यांच्या खरेदीत कपात करावी लागते. पोट भरणे आणि पौष्टिक अन्न मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. महागाईमुळे अनेक कुटुंबांना पोट भरण्यालाच प्राधान्य द्यावे लागते. याचा परिणाम लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्धांच्या आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे महागाई हा केवळ आर्थिक प्रश्न न राहता आरोग्याशी संबंधित प्रश्नही बनतो. शिक्षण क्षेत्रावरही महागाईचे सावट स्पष्टपणे जाणवते. प्रत्येक पालकाला आपले मूल चांगले शिकावे, मोठे व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे वाटते. मात्र, शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके, गणवेश, प्रवास आणि इतर शैक्षणिक गरजांचा खर्च वाढल्यामुळे पालकांची चिंता वाढत आहे. अनेक पालक
स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करतात. काही जण कर्ज काढतात, तर काही अतिरिक्त काम करून मुलांचे शिक्षण सुरू ठेवतात. शिक्षण ही भविष्य घडविणारी गुंतवणूक असली, तरी वाढत्या खर्चामुळे ती सामान्य कुटुंबांसाठी आर्थिक कसोटी ठरत आहे.
महागाईचे चटके शेतकर्यांनाही बसत आहेत. शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, वाहतूक आणि इतर उत्पादन खर्च वाढत आहेत. मात्र, शेतमालाला त्या प्रमाणात हमखास दर मिळेलच, याची खात्री नसते. विशेष म्हणजे, शेतकरी आपला माल कमी दरात विकतो आणि तोच माल ग्राहकांना बाजारात महाग मिळतो, असे अनेकदा घडते. यात उत्पादक आणि ग्राहक दोघेही अडचणीत सापडतात. त्यामुळे महागाईचा विचार करताना शेतकर्यांच्या उत्पादन खर्चाचा आणि बाजारातील वितरण व्यवस्थेचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
पेट्रोल, डिझेल आणि वाहतूक खर्चाचा महागाईशी जवळचा संबंध आहे. इंधनाचे दर वाढले की, मालवाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम बाजारातील वस्तूंच्या किमतींवर होतो. ग्रामीण भागातून शहरात येणारा भाजीपाला असो किंवा कारखान्यातून दुकानात पोहोचणार्या वस्तू असोत, प्रत्येक टप्प्यावर वाहतुकीचा खर्च महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे इंधनाच्या किमतीतील वाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अप्रत्यक्षपणे परिणाम करते.
आज मध्यमवर्गीय कुटुंबांची परिस्थितीही फारशी समाधानकारक नाही. नोकरी करणार्या व्यक्तीला दरमहा ठरावीक वेतन मिळते. मात्र, त्याच प्रमाणात सर्व खर्च स्थिर राहत नाहीत. घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, घरभाडे, वीजबिल, मोबाइल, इंटरनेट, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करताना वेतन संपून जाते. भविष्यासाठी बचत करणे तर दूरच; अनेकांना अचानक उद्भवणार्या खर्चासाठीही पैसे उपलब्ध होत नाहीत. आजारपण, अपघात किंवा अन्य कौटुंबिक अडचण आल्यास आर्थिक संकट अधिक गंभीर बनते.
महागाईमुळे माणसाच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो. सतत पैशांची चिंता, कर्जाचे हप्ते, मुलांच्या अपेक्षा आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी यामुळे अनेक जण तणावाखाली जगतात. घरातील आर्थिक अडचणींमुळे कधीकधी कौटुंबिक वाद निर्माण होतात. मुलांच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करता येत नसल्याची खंत पालकांच्या मनात राहते. त्यामुळे महागाई ही केवळ खिशाला बसणारी झळ नसून ती माणसाच्या मनालाही वेदना देणारी समस्या आहे.
या परिस्थितीत एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की, महागाईवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? अर्थातच यात शासन, प्रशासन, उत्पादक, व्यापारी आणि ग्राहक या सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. महागाईची कारणे अनेक असतात. उत्पादनातील घट, हवामानातील बदल, जागतिक बाजारपेठेतील चढउतार, पुरवठा साखळीतील अडथळे, वाहतूक खर्च आणि मागणी-पुरवठ्यातील असमतोल यामुळे किमती वाढू शकतात. त्यामुळे महागाईचा प्रश्न केवळ घोषणाबाजी करून सुटणार नाही. त्यासाठी ठोस आर्थिक धोरणे आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे.
Inflation has broken the back of the common citizen.