कोजागिरी पौर्णिमा आणि आयुर्वेद

पावसाळ्याचा ओलसर गारवा हळूहळू ओसरू लागतो आणि आसमंतात एक मंद, प्रसन्न ऊब जाणवू लागते, की समजावं शरद ऋतूचं आगमन झालं आहे. निरभ्र निळं आकाश, हळुवार वाहणारी मंद झुळूक आणि रात्रीचा शीतल चंद्रप्रकाश ही या ऋतूची खरी ओळख. आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच ‘कोजागरी पौर्णिमा’ किंवा ‘शरद पौर्णिमा’! आपल्या पूर्वजांनी निसर्गात होणार्‍या सूक्ष्म बदलांचा अचूक वेध घेऊन ऋतूबदलाचा आरोग्यावर होणारा परिणाम आनंदाने कसा सुसह्य करावा, याची सुंदर सांगड सणांशी
घातली आहे.
पावसाळ्यात निसर्गात गारवा असतो, पण त्याच वेळी आपल्या शरीरात नैसर्गिकरीत्या पित्तदोषाचा संचय होत असतो. त्यानंतर येणार्‍या शरद ऋतूत अचानक कडक ऊन पडू लागतं, ज्याला आपण ‘ऑक्टोबर हीट’ म्हणतो. या वाढत्या उष्णतेमुळे शरीरात आधीच साठलेलं पित्त उसळी मारून प्रकुपित होतं. त्यामुळे अनेकांना आंबट ढेकर येणं, छातीत जळजळ, डोकेदुखी, अंगाची लाही लाही होणे किंवा त्वचेवर पुरळ येणे अशा पित्तविकारांचा त्रास सुरू होतो. आयुर्वेद सांगतो, या काळात शरीराला शांत आणि शीतल ठेवणं ही आरोग्याची सर्वांत मोठी गरज असते.
कोजागरीची रात्र म्हणजे याच उसळलेल्या पित्तावर निसर्गाने शोधलेला अमृततुल्य उपाय! शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो आणि त्याचे किरण विशेष औषधी गुणांनी युक्त असतात. या रात्री खुल्या आकाशाखाली चांदण्यात बसणे (चंद्रस्नान), ध्यान किंवा सौम्य शतपावली करणे म्हणजे निसर्गाकडूनच शरीराचे ‘शीतलीकरण’ करून घेणे होय. यामुळे शरीरातील दाह शांत होतो, मज्जासंस्थेला पोषण मिळते, मानसिक ताण कमी होतो आणि निद्रानाशासारख्या तक्रारींवर नियंत्रण मिळण्यास मदत होते.
कोजागरीला चंद्रप्रकाशात आटीव दूध किंवा तांदळाची खीर ठेवण्याची परंपरा अत्यंत शास्त्रीय आहे. दूध आणि तांदूळ दोन्ही प्रकृतीने मधुर, स्निग्ध आणि उत्तम पित्तशामक आहेत.
दुधात किंवा तांदळाच्या खिरीत खडीसाखर, वेलची पूड, जायफळ आणि चारोळी घालावी. खडीसाखर दाह शांत करते, वेलची पचन सुधारते, जायफळ मनाला शांतता देऊन गाढ झोपेसाठी मदत करते, तर चारोळी शरीराचे पोषण करते. या दिवसांत दुधात केशर आणि इतर ड्रायफ्रूट्स (बदाम, पिस्ता, काजू) घालणे टाळावे, कारण ते प्रकृतीने उष्ण असल्याने आधीच वाढलेल्या पित्ताला अधिक
भडकवू शकतात.
खीर, दूध किंवा पिण्याचे पाणी चांदीच्या, काचेच्या किंवा चांगल्या स्टीलच्या भांड्यात काढून त्यावर पातळ सुती कपडा अथवा जाळी झाकून चंद्रप्रकाशात थंड होण्यासाठी ठेवावे.
हे चांदण्यात अमृतमय झालेले दूध किंवा खीर रात्री अथवा दुसर्‍या दिवशी सकाळी उपाशीपोटी घेतल्यास पचनसंस्थेला उत्तम शीतलता लाभते.
कोजागरीचा आनंद घेतानाच संपूर्ण शरद ऋतूत स्वतःची थोडी काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. जेवणात तूप, भात, मूग, आवळा, डाळिंब, परवर यांसारख्या पचनास हलक्या व शीतल पदार्थांचा समावेश असावा. जड, अति तिखट, तेलकट आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत. दिवसा सूर्याच्या आणि रात्री चंद्राच्या किरणांनी नैसर्गिकरीत्या शुद्ध झालेले पाणी (हंसोदक) पिणे आरोग्यासाठी अमृतसमान ठरते.
दिवसा झोपणे टाळावे, कारण दुपारच्या झोपेने शरीरात पित्त आणि कफ वाढतो.
आपले सण हे केवळ रूढी-परंपरेपुरते मर्यादित नसून, निसर्गाच्या लयीशी आपले शरीर जुळवून घेण्याची ती एक समृद्ध, शास्त्रीय जीवनशैली आहे. चला तर मग, या कोजागरीला मनातील ताण आणि शरीरातील उष्णता विसरून, शीतल चांदण्यात बसूया… घोट घोट अमृतमय दुधाचा आस्वाद घेत निरामय आरोग्याचा नवा संकल्प करूया.

Kojagiri Purnima and Ayurveda

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *