उपमुख्यमंत्री शिंदे : गंगापूर समांतर मार्गाचे भूमिपूजन
नाशिक : प्रतिनिधीं
नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील वाढती वर्दळ रोखण्यासाठी गंगापूर रोडला समांतर पर्यायी मार्ग म्हणून विकसित करण्यात येणारा स्व. मातोश्री अनुसयाबाई रामदास शिंदे मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्व. मातोश्री अनुसया रामदास शिंदे या नवीन गंगापूर समांतर मार्गाचे भूमिपूजन सोमवारी (दि.26) झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, महापौर हिमगौरी आडके, आ. सीमा हिरे, आ. गोकुळ गिते, माजी महापौर दशरथ पाटींल, गटनेते अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख बंटी तिदमे, नगरसेवक निवृत्ती इंगोले, नगरसेविका अंकिता शिंदे, हर्षदा गायकर, नयना जाधव, उषा बेंडकोळी, तसेच महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
ना. शिंदे पुढे म्हणाले, की ज्या शहरातील रस्ते चांगले असतात, त्या शहराची प्रगती वेगाने होते. आम्ही स्थगिती देणारे नसून प्रगती करणारे आहोत. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत. हा नाशिककरांसाठी अभिमानाचा क्षण आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून, आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न आहे. महापालिका कर्मचार्यांच्या प्रश्नावर उपमहापौरांनी लक्ष वेधले आहे. आयुक्तांनी त्यासंबंधीचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. प्रास्ताविकात उपमहापौर विलास शिंदे यांनी गंगापूर रोडला समांतर रस्त्याच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याचा आढावा घेतला. तसेच शाखाप्रमुख, नगरसेवक ते उपमहापौर असा प्रवास घडवून आणल्याबद्दल त्यांनी शिंदे यांचे आभार मानले. शिवाय कंत्राटी कर्मचार्यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली असता त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या.
संत कबीरनगरसाठी मोठी घोषणा
संत कबीरनगर येथील झोपडपट्टीधारकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारला जाईल. यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रस्ताव तयार करून नगरविकास विभागाकडे पाठवावा, असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संत कबीरनगर झोपडपट्टीमुक्त करून गृहनिर्माण प्रकल्पाची घोषणा करत रहिवाशांना दिवाळीचे मोठे गिफ्ट दिले.
सरकार शेतकर्यांच्या पाठीशी
शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणतेही संकट आले तरी सरकार शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात 2022 पासून अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागले असून, विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांंनी नमूद केले.
A parallel route is important for smooth traffic flow.