मालेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील रावळगाव येथील ओंकारनगर श्री शिव गणेश नवरात्रोत्सव मंडळाने कोजागरी पौर्णिमेनिमित्त घेतलेले पंचवीस लिटर दूध चुलीवर आटवताना त्याचा चिकट गोळा तयार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा गोळा च्युईंगमप्रमाणे ताणला जात असल्याचे मंडळाच्या सदस्यांनी सांगितले. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दुधाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मंडळाच्या सदस्यांनी कोजागरी पौर्णिमेनिमित्त गावातील एका दूध विक्रेत्याकडून 25 लिटर दूध घेतले होते. रात्री हे दूध चुलीवर आटवण्यासाठी ठेवले असता, सुरुवातीला ते नेहमीप्रमाणे गरम होत होते. मात्र, काही वेळानंतर दुधाचा घट्ट व चिकट गोळा तयार झाला. हा गोळा च्युईंगमप्रमाणे ताणला जात असल्याचे सदस्यांच्या निदर्शनास आले. दुधात असा बदल कशामुळे झाला याबाबत स्पष्टता नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
An incident where a sticky mass formed while thickening milk at Ravalgaon