एसटी कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार

391 कोटींचा निधी मंजूर : सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई :
तोट्यात असलेल्या एसटी कर्मचार्‍यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने 391.02 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली. या निधीमुळे सुमारे 83 हजार अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध होणार आहे.
परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर शासनाने 27 ऑक्टोबर रोजी निधी मंजुरीचा निर्णय घेतला. या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.
हा निधी सप्टेंबर 2026 मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी मंजूर करण्यात आला आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींचा आर्थिक भार एसटी महामंडळावर पडतो. या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी मिळणार्‍या निधीमुळे महामंडळाला आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यास मदत
होते.
एसटी कर्मचार्‍यांना साधारणतः दर महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान वेतन दिले जाते. यंदा 6 नोव्हेंबरपासून दिवाळी सुरू होत असल्याने कर्मचार्‍यांना सणापूर्वी वेतन मिळावे, यासाठी सरनाईक यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. एसटी कर्मचारी हे महामंडळाचे खरे बळ आहे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळी आनंदाने साजरी करता यावी, ही आमची भूमिका आहे. दिवाळीपूर्वी वेतन देण्याचा दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. आता एसटी प्रशासनाने वेतन वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. सरकारच्या निर्णयामुळे दिवाळीपूर्वी वेतन देण्यासाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता प्रत्यक्ष वेतन वितरणाकडे कर्मचार्‍यांचे लक्ष लागले
आहे.

Diwali will be a happy one for ST employees

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *