– वाहिद बागवान
ब्रह्मगिरीच्या कुशीतून पाझरणारी गोदावरी, द्राक्षबागांतून आणि सह्याद्रीच्या दर्याखोर्यांतून वाहणारा मंद, शीतल वारा हा नाशिकच्या भूमीला निसर्गाने दिलेला एक अलौकिक वरदहस्त. ज्या हवेने पिढ्यान् पिढ्यांच्या थकलेल्या मनांना संजीवनी दिली, ज्या आल्हाददायक वातावरणामुळे देशाच्या कानाकोपर्यांतील लोक या शहराच्या प्रेमात पडले आणि इथलेच झाले. ज्या नितांत सुंदर निसर्गामुळे नाशिकची तुलना जगातील सर्वोत्तम शहरांशी झाली, त्या नाशिकच्या नभावर आज प्रदूषणाची काजळी धरू लागल्याचे दिसते आहे.
प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची हानी नाही तर या शहराच्या आत्म्यावर झालेला आघातच आहे. एकेकाळी गुलाबी थंडीत धुक्याची शुभ्र चादर लपेटून जाणार्या नाशिककरांच्या नशिबी आज जिथे जावे तिथे जाम झालेल्या ट्रॅफिकचा काळाकुट्ट धूर आणि खोदलेल्या, उखडलेल्या रस्त्यांमुळे उधळलेले धूलिकण यावेत. यामुळे नाशिकवर जिवापाड प्रेम करणार्या प्रत्येकाच्या मनात उमटणारी कळ बथ्थड, कोडग्या आणि निगरगट्ट व्यवस्थेला जाणवू नये, यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते?
विकासाच्या नावाखाली शहरभर नांगर फिरवणार्या, अविचाराने उकरून ठेवलेल्या रस्त्यांची धुळधाण महिनोन्महिने तशीच राहू देणार्या आणि वातानुकूलित दालनांत बसून केवळ कागदी अहवालांचे घोडे नाचविणार्यांना सामान्य माणसाच्या गुदमरणार्या श्वासांची काहीही पर्वा राहिलेली नाही. गल्लोगल्ली नियम धाब्यावर बसवून उडणारा राडारोडा, हवेत काजळी ओकणार्या वाहनांचे लोंढे, हवेतील प्रदूषणाचा विचार न करता सुरू असलेली बांधकामे आणि रात्रीच्या अंधारात कचर्याचे ढीग पेटवून शहराच्या फुप्फुसांत विष कालवणारे हातर्या सार्यांवर करडी नजर ठेवण्याची शपथ घेतलेली यंत्रणा नेमकी कोणत्या कुंभकर्णी झोपेत गर्क आहे? आज निष्पाप लहान मुलांच्या हातात खेळण्यांऐवजी नेब्युलायझरचे मास्क यावेत, पहाटेच्या मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेण्याची इच्छा बाळगणार्या ज्येष्ठ नागरिकांना खोकल्याची उबळ येऊन अंथरुणावर पडावे लागावे, अशी परिस्थिती आहे.
ज्या काळात लंडनने आपल्या ऐतिहासिक धुरक्यातून धडा घेऊन जगातील सर्वात कठोर स्वच्छ हवा कायदे केले, पॅरिस आणि टोकियोसारख्या महाकाय महानगरांनी निसर्गाशी समतोल साधत धूलिकणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी केली, त्याच 21 व्या शतकात नाशिकसारखे निसर्गसंपन्न शहर जागतिक आरोग्य संघटनेच्या हवेच्या निकषांना पायदळी तुडवत प्रदूषणाच्या दलदलीत रुतावे, यापेक्षा मोठी नामुष्की कोणती असू शकते? त्यातच, अवघ्या जगाचे लक्ष ज्या आगामी सिंहस्थ कुंभपर्वाकडे लागले आहे, जिथे देश-विदेशातून लाखो भाविक, अभ्यासक आणि पर्यटक केवळ अध्यात्माच्या शोधात नव्हे, तर नाशिकच्या पवित्र आणि आरोग्यदायी वातावरणाची प्रचिती घेण्यासाठी येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी आपण ही विषारी धूळ आणि गुदमरलेले आकाश पुढे करणार आहोत का?
जर आंतरराष्ट्रीय पटलावर नाशिकची ओळख ’विषारी हवेचे शहर’ म्हणून झाली, तर त्या पापाचे धनी कोण असणार? या ढिम्म यंत्रणेला आता आपल्या सुस्त मानसिकतेतून खडबडून जागे व्हावेच लागेल. लालफितीच्या कारभारातून बाहेर पडून अधिकार्यांना रस्त्यांवर उतरावे लागेल. बांधकामांच्या ठिकाणी पाण्याचे फवारे, राडारोड्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, धूळ नियंत्रक यंत्रांचा चोवीस तास वापर आणि विषारी वायू ओकणार्या घटकांवर कठोर दंडात्मक व कायदेशीर बडगा उगारणे या गोष्टी आता केवळ कागदावर राहून चालणार नाहीत.
नाशिकची माती, गोदावरीचे पाणी आणि सह्याद्रीच्या कड्यांवरून वाहणारा वारा ही कोणा एकाची जहागीर नाही; तो या शहराच्या अस्तित्वाचा आणि आपल्या भावी पिढ्यांच्या जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. जर व्यवस्थेने या भावनेची वेळीच दखल घेऊन आपल्या अजगरासारख्या पडून असलेल्या यंत्रणेला युद्धपातळीवर कामाला लावले नाही, तर आज हवेत तरंगणारी ही धूळ उद्या अशा जनक्षोभाचे वादळ बनेल, जे या निष्क्रियतेला कायमचे उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. नाशिकचा श्वास वाचवणे हा आता केवळ पर्यावरणाचा तांत्रिक विषय राहिलेला नाही, तर ती या शहराच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई बनली आहे.
Nashik’s breath, the system’s noose!