शेतकर्‍यांना सरसकट मदत नाहीच; जीआर जारी

33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांनाच मिळणार अग्रिम 5 हजार

मुंबई : प्रतिनिधी
दुष्काळामुळे त्रस्त शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्यासाठी सरकारने पाच हजार रुपये अग्रिम मदत जाहीर केली असली, तरी ती सरसकट नसणार आहे. केवळ 33% पेक्षा जास्त पीक नुकसानीचा निकष पूर्ण करणार्‍यांनाच ही रक्कम मिळणार असल्याचा शासन निर्णय (जीआर) आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने बुधवारी (दि. 28) जारी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. राज्यातील 304 दुष्काळी तालुक्यांतील ज्या शेतकर्‍यांच्या पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशा सर्व पात्र शेतकर्‍यांना सरसकट पाच हजार रुपये अग्रिम दिले जाणार. यासाठी सुमारे दीड कोटी शेतकर्‍यांसाठी 7,500 कोटींंची तरतूद करण्यात आली आहे. आधी ही संख्या सव्वा कोटी सांगितली होती. मदत थेट डीबीटीद्वारे बँक खात्यात जमा होणार. 1 नोव्हेंबर 2025 पासून विविध योजनांसाठी ई-केवायसी केलेल्यांना पुन्हा ई-केवायसी करावी लागणार नाही. वनपट्टाधारकांनाही ई-केवायसी वर मदत मिळणार. बँकांनी कर्जाच्या नावाखाली पैसे कापू नयेत, असे सक्त आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. पैसे कापल्यास जिल्हाधिकारी जबाबदार असतील. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पुढील दोन दिवसांत म्हणजेच गुरुवारपर्यंत पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.
याच मदतीसाठी कर्जमाफीचे निकष लावण्यात आले आहेत. 25 हजारांपेक्षा जास्त वेतन घेणारे सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, 25 हजारांपेक्षा जास्त पेन्शनधारक (माजी सैनिक वगळता), कृषी उत्पन्न बाजार समिती, साखर कारखाने, सूतगिरणी, जिल्हा बँकांचे पदाधिकारी-कर्मचारी यांना ही अग्रिम मदत मिळणार
नाही.

सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित
राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सहकार विभागाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेशापर्यंत स्थगित केल्या आहेत. यासंदर्भातील शासन आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुका फक्त मतदान बाकी असल्याने त्या स्थगित करण्यात आलेल्या नाहीत. गोकुळ दूध संघात महायुतीला बसलेल्या धक्क्यानंतर जिल्हा बँका आणि साखर कारखान्यातही पुनरावृत्ती होण्याच्या धास्तीने हा निर्णय घेतल्याची चर्चाही सुरू आहे.

शरद पवार पुन्हा जाणार बांधावर
राज्यात 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा दुष्काळग्रस्त भागाच्या दौर्‍यावर जाणार असून, थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांची दुःखे समजून घेणार आहेत. दुष्काळाचा आढावा घेऊन पवार थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकरी जनावरे विकायला लागले आहेत, घरदारं-मुलांचे शिक्षण सोडून शहराकडे स्थलांतर करत आहेत, असे निरीक्षण पवार यांनी नोंदवले आहे. दौर्‍यानंतर ते या सर्व मागण्या घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांची थेट भेट घेणार आहेत.

No blanket aid for farmers; Government Resolution (GR) issued

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *