जिल्ह्यात भूजलपातळी 1.60 मीटरने घटली

♦ 919 गावांना टंचाईची शक्यता

♦ येवल्यात सर्वाधिक घसरण

♦ उन्हाळ्यात 339 गावांना पाणीटंचाईचा धोका

नाशिक : प्रतिनिधी
यंदा अल निनोच्या संकटाने पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेती, जनावरांचा चारा, तसेच वापराच्या पाण्याची चिंता आतापासूनच सतावत आहे. अल निनोच्या प्रभावामुळे पावसावर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर आत भूजल पातळीतही घट झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये भूजलपातळी सरासरी 1.60 मीटरने खाली गेली आहे. येत्या उन्हाळ्यात 339 गावांना पाणीटंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे. उन्हाळा जसजसा जवळ येईल तसतसे पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची भीती आहे. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासोबतच संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे.
नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर 2026 मध्ये भूजल पातळीत मागील पाच वर्षांतील सप्टेंबरच्या सरासरीच्या तुलनेत 1.60 मीटरने घट झाली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या निरीक्षण विहिरींच्या आकडेवारीनुसार, येवला तालुक्यात सर्वाधिक 3.30 मीटरने भूजलपातळी खालावली आहे. नांदगाव 2.70 मीटर, चांदवड 2.42 मीटर, देवळा आणि मालेगावमध्ये प्रत्येकी 2.31 मीटर, तर सिन्नरमध्ये 2.05 मीटरने घट झाली आहे. या पाश्वर्र्भूमीवर ऑक्टोबर 2026 ते जून 2027 या कालावधीत संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी टप्प्याटप्प्याने नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात 80 पाणलोट क्षेत्रांत एकूण 185 निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. या विहिरींमधील स्थिर भूजल पातळीचे मोजमाप वर्षातून चार वेळा केले जाते. जानेवारी, मार्च, मे आणि ऑक्टोबर या महिन्यांत होणार्‍या मोजमापाच्या आधारे भूजल पातळीतील बदलांचा अभ्यास केला जातो. संबंधित महिन्यातील पातळीची मागील पाच वर्षांतील त्याच महिन्याच्या सरासरीशी तुलना करून वाढ किंवा घट निश्चित केली जाते.
सप्टेंबर 2026 च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांतील सप्टेंबरमधील सरासरी स्थिर भूजलपातळी 2.74 मीटर होती. सप्टेंबर 2026 मध्ये ती 4.34 मीटर नोंदविण्यात आली. त्यामुळे सरासरी 1.60 मीटरने घट झाल्याचे दिसते. एकूण 185 निरीक्षण विहिरींपैकी 157 विहिरींत पातळी घटली, तर 28 विहिरींमध्ये वाढ नोंदवण्यात आली.
सिन्नरमध्ये 2.05 मीटर, पेठ 1.90 मीटर, बागलाण 1.82 मीटर, इगतपुरी 1.75 मीटर, कळवण 1.47 मीटर, सुरगाणा 1.37 मीटर, नाशिक 0.60 मीटर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 0.15 मीटरने घट नोंदवण्यात आली. दुसरीकडे, दिंडोरीत 0.04 मीटर आणि निफाडमध्ये 0.06 मीटरने भूजल पातळीत वाढ झाली आहे.
संभाव्य टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी विहिरींची स्थिती, पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि पर्यायी स्रोत यांचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संभाव्य पाणीटंचाईसाठी तीन टप्प्यांत नियोजन
सप्टेंबरअखेर पर्जन्यमानाची आणि भूजल पातळीतील बदलांची नोंद विचारात घेऊन संभाव्य पाणीटंचाईसाठी तीन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या कालावधीत 288 गावांचा, जानेवारी ते मार्च 2027 या कालावधीत 292 गावांचा आणि एप्रिल ते जून 2027 या उन्हाळ्याच्या कालावधीत 339 गावांचा समावेश आहे.
तालुकानिहाय मालेगावमध्ये 125, येवला 111, चांदवड 102, कळवण 100, इगतपुरी 95, सिन्नर 93, नांदगाव 84, पेठ 59, देवळा 44, बागलाण 42, निफाड 24, सुरगाणा 16, दिंडोरी 12 व नाशिक तालुक्यात 12 गावांचा समावेश आहे.

येवला तालुक्यात सर्वाधिक घट
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, येवला तालुक्यातील 13 निरीक्षण विहिरींमध्ये सरासरी 3.30 मीटरने भूजलपातळी घटली आहे. नांदगावमधील 23 विहिरींत 2.70 मीटर, चांदवडमधील सहा विहिरींत 2.42 मीटर, देवळ्यातील सात विहिरींत 2.31 मीटर, तर मालेगावमधील 22 विहिरींत 2.31 मीटरने घट झाली आहे.

Groundwater level in the district has dropped by 1.60 meters.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *