आयकरदाते, सरकारी कर्मचार्यांच्या कुटूंबांचा समावेश; रेशनकार्ड मात्र सुरूच, आरोग्य योजनांचा लाभही मिळणार
सिन्नर : प्रतिनिधी
रेशन दुकानात धान्य घेण्यासाठी गेलेल्या अनेक कुटुंबांना यंदा महिन्याचा धान्य कोटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. ई-पॉस मशीनवर धान्याची नोंद दिसत नसल्याने या कुटुंबांची धावपळ सुरू झाली. चौकशी केल्यानंतर घरातील सदस्य आयकर भरत असल्याने किंवा शासकीय सेवेत असल्याने धान्यपुरवठा बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सिन्नर तालुक्यात एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत अशा 5 हजार 626 शिधापत्रिकांवरील धान्यपुरवठा बंद करण्यात
आला आहे.
केंद्र शासनाकडून प्राप्त माहितीनुसार पुरवठा विभागाने आयकर भरणारे, वाणिज्य करदाते तसेच शासकीय सेवेत असलेल्या कुटुंबांची पडताळणी केली. संबंधित कुटुंबांचे उत्पन्न निर्धारित निकषांपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील या शिधापत्रिकांचा प्रवर्ग बदलण्यात आला. त्यामुळे संबंधित कुटुंबांना मोफत किंवा सवलतीच्या दरातील धान्य मिळणे बंद झाले आहे.
धान्यपुरवठा बंद झालेल्या 5,626 शिधापत्रिका पूर्णपणे रद्द करण्यात आलेल्या नाहीत. त्यांचा प्रवर्ग बदलून ‘एनपीएच’ (अपात्र धान्य लाभार्थी) करण्यात
आला आहे.
त्यामुळे संबंधित शिधापत्रिका सक्रिय राहणार असून, आयुष्मान भारत योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचारांसाठी त्यांचा वापर करता येणार आहे.
गरजू कुटुंबांना संधी
अपात्र ठरलेल्या कुटुंबांचा धान्य कोटा बंद झाल्याने रिक्त झालेल्या इष्टांकात गरजू आणि वंचित कुटुंबांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या आदेशानुसार तलाठी आणि ग्रामसेवक यांच्यामार्फत संयुक्त पडताळणी करण्यात येत आहे. पात्र कुटुंबांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– विवेक जमधडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी
Food grain quota for 5,626 ration cards stopped in Sinnar taluka