नाशिकच्या रस्त्यांवर मृत्यूचा सापळा!

– अफजल पठाण

रस्त्यावर निघताना स्वप्नं असतात घरी परतण्याची, पण भीती असते वाटेतच आयुष्य संपण्याची वेग, खड्डे आणि बेफिकीर व्यवस्थेच्या गर्दीत, सुरक्षित प्रवासाची हमी देणार कोण शेवटी? नाशिक शहर वेगाने विस्तारत आहे; मात्र या विकासाच्या वेगात रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. शहरात वाढती वाहनसंख्या, ठिकठिकाणी पडलेले खड्डे, अनावश्यक वाहतूक कोंडी, विस्कळीत ट्रॅफिक व्यवस्था आणि अपुर्‍या नियोजनामुळे नागरिकांचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. प्रश्न केवळ अपघातांचा नाही, तर नागरिकांच्या जीवाची जबाबदारी स्वीकारणार कोण, हा आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो किंवा वाहन वळवावे लागते. अशा वेळी मागून येणार्‍या वाहनांची धडक होण्याची शक्यता वाढते. रस्त्यांची कामे सुरू असताना योग्य बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि सूचना फलक नसल्यास धोका अधिकच वाढतो. पावसात खड्ड्यांचा अंदाज येत नाही, तर रात्री अपुर्‍या प्रकाशामुळे परिस्थिती आणखी गंभीर होते. रस्ते दुरुस्ती आणि देखभालीकडे वेळेत लक्ष देणे ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. दुसरीकडे, अनेक चौकांमध्ये वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने अनावश्यक कोंडी होते. सिग्नल व्यवस्थेतील त्रुटी, बेशिस्त पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे रस्त्यांवर गोंधळ निर्माण होतो. वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्याच्या घाईत वाहनचालक नियम मोडतात आणि त्यातून अपघातांना निमंत्रण मिळते. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी केवळ सिग्नल पुरेसे नाहीत; प्रभावी नियोजन, नियमित देखरेख आणि नियम मोडणार्‍यांवर ठोस कारवाईही आवश्यक आहे. अपघातांसाठी केवळ प्रशासनाला दोष देऊनही चालणार नाही. अतिवेग, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे आणि बेदरकार वाहनचालक हीदेखील अपघातांची महत्त्वाची कारणे आहेत. मात्र, नागरिकांनी नियम पाळावेत अशी अपेक्षा करताना प्रशासनानेही सुरक्षित रस्ते आणि सुरळीत वाहतूक उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जीव जातो, तेव्हा वर्तमानपत्रात बातमी येते; काही दिवस चर्चा होते आणि नंतर सर्व काही विस्मरणात जाते. मात्र, मृत व्यक्तीच्या कुटुंबासाठी तो अपघात आयुष्यभराची वेदना बनतो. मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवते, आई-वडिलांचा आधार निघून जातो आणि एका कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य बदलून जाते. त्यामुळे नाशिक महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून खड्डे, धोकादायक वळणे, अपुरा प्रकाश आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांवर समन्वयाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. चौकांचे योग्य नियोजन, सिग्नलचे प्रभावी नियंत्रण, बेशिस्त पार्किंगवर कारवाई आणि रस्त्यांच्या कामांवर नियमित देखरेख याला प्राधान्य मिळाले पाहिजे.
नाशिकचा विकास केवळ उंच इमारती, रुंद रस्ते आणि वाढत्या वाहनसंख्येने मोजता येणार नाही; तर नागरिक किती सुरक्षितपणे प्रवास करतात, यावरही तो मोजला गेला पाहिजे. काही मिनिटे वाचविण्याच्या घाईत एखाद्याचे संपूर्ण आयुष्य संपत असेल, तर त्या वेगाचा उपयोग काय? रस्ते सुरक्षित असावेत, वाहतूक शिस्तबद्ध असावी आणि प्रशासनाचे नियोजन प्रभावी असावे, ही नागरिकांची अपेक्षा अवास्तव नाही. ती त्यांची मूलभूत गरज आहे. कारण खड्डे बुजविण्यासाठी डांबर लागते; पण व्यवस्थेतील खड्डे बुजविण्यासाठी इच्छाशक्ती लागते! आता प्रश्न एवढाच नाशिकच्या रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी ठोस पावले कधी उचलली जाणार, की आणखी एखाद्या दुर्घटनेनंतरच यंत्रणा जागी होणार?

A death trap on the roads of Nashik!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *