– अनिल उदावंंत
नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवात गरबा खेळायला आलेल्या महिलेने घातलेला बॅकलेस ब्लाउज समाजमाध्यमावर व्हायरल झाला. संस्कृतिरक्षण व व्यक्तीस्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर तो सर्व स्तरांत पुष्कळसा चर्चेतही राहिला. मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं, तर या घटनेकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आपल्याला मिळू शकते. मानवी इतिहासात वस्त्रशोध हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. त्यानुसारच माणसानं कपड्यांचा शोध लावला असावा. सुरुवातीपासून कपडे म्हणजे वस्त्र ही माणसाची मूलभूत गरज होती. ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून रक्षण व्हावं यासाठी अंग झाकणं ही त्याची गरज होती.
माणसानं अंग झाकायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला अंग झाकण्यासाठी त्यानं झाडांची मोठी पानं, झाडांच्या साली, वल्कलं, प्राण्यांची कातडी यांचा वापर केला. हळूहळू तो सूत कातणं, कापड विणणं या गोष्टी शिकत गेला. त्यातून कापड तयार झालं. त्याचा उपयोग तो आपलं सर्वांग झाकण्यासाठी सर्रासपणे करू लागला. काळाच्या प्रवाहात कापड हे फक्त अंग झाकण्याचं साधन राहिलं नाही, तर ते संस्कृतीचं एक महत्त्वाचं लक्षण बनलं. कोणते कपडे घालायचे, किती अंग झाकायचं आणि कोणत्या प्रसंगी कोणता पोशाख वापरायचा, याविषयी वेगवेगळ्या समाजांत वेगवेगळे संकेत विकसित झाले. काही समाजांत कपड्यांच्या आधारे सभ्यता आणि प्रतिष्ठेचेही निकष ठरवले जाऊ लागले. अर्थात, हे निकष काळानुसार आणि समाजानुसार बदलत गेले. एकेकाळी कोण किती अंग झाकतो यावरून त्याची सभ्यता ठरवणारा मानवी समाज जसजसा प्रगत होत गेला, तसतसं त्याच्या कपड्याचं कार्य बदलत गेलं. आता माणसं केवळ ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून आपलं रक्षण व्हावं किंवा अंग झाकता यावं यासाठी कपडे घालत नाहीत. सांप्रतकाळी कपडे हे माणसाच्या व्यक्तिमत्वाचं प्रमुख व प्रभावी माध्यम झालं आहे. एखादी व्यक्ती कोण आहे, तिचे विचार काय व कसे आहेत, त्या व्यक्तीची आर्थिक, सामाजिक, शैक्षाणिक व सांस्कृतिक स्थिती कशी आहे, तिला पुरेसा आत्मविश्वास आहे की नाही, तिच्या मताला इतरांनी किती महत्त्व द्यावं अशा अनेक गोष्टींचा अंदाज त्या व्यक्तीने कोणते कपडे घातले आहेत यावरून लावला जातो. त्यामुळे साहजिकच प्रत्येक माणसाला वेगळं आणि इतरांपेक्षा उठून दिसणं आवश्यक वाटतं. यातून कपड्यांमध्ये विविध रंग आले. माणसाने निसर्गातून अनेक रंग शोधले. त्याने फुले, पाने, मुळे व फळांपासून रंग बनवले. पुढे कपड्याचा पोत महत्त्वाचा ठरू लागला. सुती, रेशमी, लोकरी, खादी अशा वेगवेगळ्या धाग्यांपासून कपड्याचे वेगवेगळे पोत तयार झाले. त्यानंतर नवनवीन डिझाइन आले. कापडावर नक्षीकाम, भरतकाम, चित्रकला व कलाकुसर आली. आपल्याकडे कोणीतरी पाहावं, आपलं कौतुक करावं, आपल्याला महत्त्व द्यावं, आपल्या व्यक्तीमत्वाचा इतरांवर प्रभाव पडावा ही माणसाची नैसर्गिक इच्छा आहे. कपडे हे त्याच्या इच्छापूर्तीचं सर्वात सोपं साधन आहे.
तुम्ही चांगले, नीटनेटके कपडे घातले की, ऑफिसमध्ये, कार्यक्रमात, मित्रांमध्ये तुम्ही वेगळे दिसता. लोकांचं लक्ष आपोआप तुमच्याकडे जातं. ते तुम्हाला पाहतात आणि त्यानं तुमचा आत्मविश्वास वाढायला मदत होते. आता सगळेच लोक चांगले कपडे घालायला लागलल्यावर केवळ चांगल्या कपड्याने लक्ष वेधता येणं कठीण होऊ लागलं, तेव्हा लोकांनी फॅशन करायला सुरुवात केली. कपड्याचा गळा लहान वा मोठा करणं, बाही लहान-मोठी करणं, कॉलर लहान-मोठी करणं, कपड्याची लांबी कमी-जास्त करणं, कपडे सैल किंवा घट्ट करणं किंवा अभूतपूर्व रंगसंगती साधणं या मार्गाने कपड्याला थोडासा वेगळा लूक देणं किंवा पॅटर्नमध्ये एखादा हटके बदल करणं यालाच फॅशन म्हटलं जातं.
बॅकलेस ब्लाऊज ही अशीच एक फॅशन आहे. साडी हा आपला पारंपरिक पोशाख आहे. साडीसोबत ब्लाउज येतोच. सुरुवातीला ब्लाउजचा उद्देश पूर्ण अंग झाकणे हाच होता. पूर्ण बाही, बंद गळा. पण जसा काळ बदलला, तसा ब्लाउजही बदलला. बाही लहान झाली, गळा अधिक खोल झाला. कारण आम्ही आधुनिक दिसावं, आमच्यात आत्मविश्वास दिसावा आणि लोकांनी आमच्याकडेही पहावं असं काही स्त्रियांना तीव्रतेनं वाटलं असावं. बॅकलेस ब्लाउजमध्ये पाठीचा भाग मोकळा असतो. दोर्यांनी किंवा डिझाइनने तो नाजूकरीत्या बांधलेला असतो. स्त्रियांच्या अशा कपड्यांकडे पाहण्याचे समाजात दोन प्रचलित दृष्टिकोन आहेत. एक दृष्टीकोन या कपड्यांना अश्लील म्हणतो तर दुसरा दृष्टीकोन त्याकडे एक डिझाईन किंवा एक कलाकुसर म्हणून पाहतो. यातला दुसरा दृष्टिकोन हा अधिक व्यावहारिक आहे. कारण कपड्यामागची भावना महत्त्वाची असते. कपडे घालणार्याच्या मनात काय भावना आहे हे महत्त्वाचे असते.
कपड्यांवरून माणसाचं चारित्र्य ठरविणं अनेकदा चुकीचं ठरत असतं. वस्त्र किंवा कपडे माणसाची आवड दाखवतात; विचार नाही. कुणाला साधी राहणी आवडते, कुणाला फॅशन आवडते. आपण त्या दोन्हीचा आदर केला पाहिजे. कपड्यांनी माणसाला कधीच लहान किंवा मोठं केलेलं नाही. माणसाला त्याचे विचारच मोठं करत असतात.
म्हणून बॅकलेस ब्लाउजकडे फार वेगळ्या गुंतागुंतीच्या नजरेने पाहण्याची गरज नाही. माणूस आता फक्त अंग झाकण्यासाठी कपडे घालत नाही, तर स्वतःचे व्यक्तिमत्त्व दाखवण्यासाठी घालतो. लक्ष वेधून घेणे हा मानवी स्वभाव आहे. त्यासाठी नवनवीन प्रयोग होत राहणार. त्यातूनच नवीन फॅशन जन्माला येते. तुम्ही त्या फॅशनला कसे डिकोड करता, हा तुमचा प्रश्न आहे.
The journey of clothing: from covering the body to drawing attention