रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी मोहीम सुरू

नाशिक : विशेष प्रतिनिधी
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी भुसावळ विभागाने प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान स्फोटक, ज्वलनशील किंवा धोकादायक पदार्थ सोबत घेऊन प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलीस, रेल्वे वाणिज्य विभागातील कर्मचारी रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सामानाची नियमितपणे तपासणी करत आहे.
रेल्वे कायद्यानुसार रेल्वेगाडीत प्रतिबंधित ज्वलनशील किंवा धोकादायक पदार्थ घेऊन प्रवास करताना आढळल्यास, त्याला तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दिवाळीमुळे रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी होत आहे. प्रवाशांमध्ये सुरक्षेविषयी जागृती करण्यासाठी रेल्वे प्रशासनामार्फत नियमितपणे जागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पोस्टर्स, बॅनर्स तसेच रेल्वेस्थानकांवरील उद्घोषणांच्या माध्यमातून प्रवाशांना पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, फटाके, रॉकेल आदी ज्वलनशील पदार्थ प्रवासादरम्यान सोबत न बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दल, वाणिज्य विभागाच्या कर्मचार्‍यांमार्फत प्रवाशांना जागरूक केले जात आहे. रेल्वे प्रवासादरम्यान ज्वलनशील व धोकादायक पदार्थ सोबत न बाळगण्याबाबत त्यांना सुरक्षा नियमांची माहिती देण्यात येत आहे. प्रवाशांच्या निदर्शनास सहप्रवासी संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू घेऊन प्रवास करत असल्याचे आढळल्यास, त्यांनी रेल्वे कर्मचारी किंवा रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 1309 वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Inspection drive launched on trains

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *