मंत्र्यांची दिवाळी बळीराजासोबत

शेताच्या बांधावर जाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नागपूर/मुंबई : प्रतिनिधी
यंदाची दिवाळी मंत्र्यांसाठी फक्त फटाके आणि फराळाची नसणार आहे, तर ती शेताच्या बांधावरची असणार आहे. दुष्काळाच्या काळ्या सावटाखाली सापडलेल्या बळीराजाला ‘तू एकटा नाहीस’ हे सांगण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळाला एक अनोखं, भावनिक आवाहन केले आहे – दिवाळीतला किमान एक दिवस गावात जाऊन, शेतकरी कुटुंबासोबत साजरा करा!
नागपूरच्या ‘रामगिरी’ निवासस्थानी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये फडणवीस यांनी ही भूमिका मांडली. त्यावेळी वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार संजय भेंडे, परिणय फुके, कृष्णा खोपडे आणि पत्रकार उपस्थित होते. या आवाहनाला मंत्र्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकल्या, तर प्रशासकीय यंत्रणेलाही वेग येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. फक्त भाषणं नको, तर जमिनीवर जाऊन परिस्थिती पाहा, हा त्यामागचा स्पष्ट संदेश आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूरच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेला मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. आता प्रश्न एकच आहे – फडणवीसांच्या या आवाहनाला सर्व मंत्री खरंच शेताच्या बांधावर जाऊन प्रतिसाद देणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय!

मुख्यमंत्री स्वतःपासून करणार सुरुवात
शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या अडचणी म्हणजे संपूर्ण समाजाच्या अडचणी आहेत. सरकारी मदतीबरोबरच माणुसकीची ऊबही त्यांना हवी आहे, असे म्हणत फडणवीस यांनी आधी स्वतःपासून सुरुवात करण्याची घोषणा केली. ते स्वतः नागपूर जिल्ह्यातील एका गावात जाऊन शेतकर्‍यांसोबत दिवाळीचा एक दिवस घालवणार आहेत.

मंत्र्यांची दिवाळी बळीराजासोबत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *