रोषणाईचा झगमगाट अन् फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मीपूजन

नाशिक : प्रतिनिधी
दिव्यांची आरास, आकर्षक रांगोळ्या, फुलांची तोरणे, आकाशकंदिलांचा लखलखाट आणि फटाक्यांच्या आतषबाजीने नाशिक शहरात लक्ष्मीपूजनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. घरोघरी पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीमातेचे पूजन करून सुख, समृद्धी आणि भरभराटीची प्रार्थना करण्यात आली. व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये चोपडीपूजन, तर घरांमध्ये कुटुंबीयांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी, मिठाईच्या दुकानांमधील लगबग आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेली आतषबाजी यामुळे शहरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच घराघरांत स्वच्छता आणि सजावटीची लगबग सुरू होती. प्रवेशद्वारांवर झेंडूच्या फुलांची तोरणे, आकर्षक रांगोळ्या आणि पणत्यांची मांडणी करण्यात आली होती. विविध आकारांचे आकाशकंदील आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने इमारती, घरे आणि दुकाने उजळून निघाली होती. महिलांनी पारंपरिक पद्धतीने पूजेची तयारी केली. लक्ष्मीमातेची मूर्ती, पूजेचे साहित्य, धान्य, चलन आणि दागिन्यांची मांडणी करून सायंकाळी शुभमुहूर्तावर पूजन करण्यात आले.
व्यापारी वर्गासाठी लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असल्याने शहरातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि कार्यालयांमध्येही पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मीपूजनासोबतच वही-खाते अर्थात चोपडीपूजन करून नव्या आर्थिक वर्षात व्यवसायाची भरभराट व्हावी, अशी प्रार्थना व्यापार्‍यांनी केली. बँका, खासगी कंपन्या, शासकीय व निमशासकीय कार्यालयांतही दुपारच्या सुमारास लक्ष्मीपूजन करण्यात आले.

फुलांच्या बाजारात मोठी वर्दळ
लक्ष्मीपूजनासाठी झेंडूची फुले, फुलांचे हार, तोरणे आणि पूजेच्या साहित्याला मोठी मागणी होती. रविवार कारंजा, अशोक स्तंभ, एम. जी. रोड, सातपूर, सिडको आणि नाशिकरोड परिसरातील बाजारपेठांमध्ये फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पूजेसाठी झाडू खरेदी करण्यालाही नागरिकांनी पसंती दिली. पूर्वसंध्येपासून सुरू असलेली खरेदीची लगबग लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही कायम होती. फुलांच्या सजावटीसह वाहनांनाही हार घालण्यात आले होते.
मिठाई, फराळाच्या खरेदीला पसंती
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मिठाईच्या दुकानांमध्ये दिवसभर गर्दी होती. पूजेचा प्रसाद तसेच नातेवाइकांना, मित्रपरिवाराला भेट देण्यासाठी नागरिकांनी मिठाई खरेदी केली. पेढे, काजूकतली, बर्फी, लाडू यांसह विविध प्रकारच्या मिठाईंना मागणी होती. घरगुती फराळासोबत मिठाईची देवाणघेवाण करून नागरिकांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

Lakshmi Pujan amidst a dazzling display of lights and a spectacular show of fireworks

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *