लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर नाशिकच्या बाजारपेठेत धनवर्षाव

दिवाळीचा आनंद द्विगुणित : रिअल इस्टेटमध्ये 100 हून अधिक फ्लॅटची विक्री, 55 गृहप्रवेश

नाशिक : प्रतिनिधी
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या बाजारपेठेत लक्ष्मीची बरसात झाली आहे. खरेदीच्या उत्साहातून विविध क्षेत्रांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, पूजेचे साहित्य यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेषतः वाहन क्षेत्रात दुचाकी आणि चारचाकींच्या खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुसरीकडे, रिअल इस्टेट क्षेत्रातही गृहखरेदीचा उत्साह कायम राहिला. नाशिकमध्ये शंभरहून अधिक सदनिकांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. 55 पेक्षा अधिक कुटुंबांनी नव्या घरात गृहप्रवेश केला. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेसह बांधकाम आणि वाहन क्षेत्रातही आर्थिक उलाढालीला मोठी चालना मिळाली.
भारतीय संस्कृतीत दिवाळी हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाच्या मुहूर्तावर नवीन वस्तू, वाहन आणि घर खरेदीला विशेष महत्त्व असते. यंदाही अनेक नाशिककरांनी दिवाळीचे औचित्य साधत आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार केले. विविध बांधकाम प्रकल्पांना भेटी देऊन ग्राहकांनी फ्लॅट आणि रो-हाउसची बुकिंग केली. शंभरहून अधिक नवीन बुकिंग आणि 55 पेक्षा अधिक गृहप्रवेश झाल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे, 35 लाख रुपयांपर्यंतच्या टू बीएचके आणि 25 लाख रुपयांपर्यंतच्या वन बीएचके सदनिकांना ग्राहकांनी अधिक पसंती दिली. परवडणार्‍या दरातील घरांना असलेली मागणी यानिमित्ताने अधोरेखित झाली. नाशिक शहरातील नागरिकांसोबतच धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील नागरिकही घरखरेदी आणि गुंतवणुकीसाठी नाशिकला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे नाशिकचे गृहबाजारपेठेतील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठीही ग्राहकांनी मोठी पसंती दर्शविली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ दिसली. सणासुदीच्या मुहूर्तावर नवीन वाहन घरी आणण्याची परंपरा जपत अनेकांनी वाहनांचे आरक्षण आणि खरेदीचे व्यवहार पूर्ण केले. एकूणच लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्ताने नाशिकच्या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून, विविध क्षेत्रांतील कोट्यवधींच्या उलाढालीमुळे व्यापारी आणि व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.

दिवसभरात शंभरहून अधिक फ्लॅटची विक्री झाल्याचा अंदाज आहे. ग्राहकांनी 35 लाख रुपयांपर्यंतच्या टू बीएचके आणि 25 लाख रुपयांपर्यंतच्या वन बीएचके सदनिकांना पसंती दिली. यंदा दुष्काळाच्या सावटाचा काही प्रमाणात गृहखरेदीवर परिणाम जाणवला.
– सुनील गवादे, माजी अध्यक्ष, नरेडको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *