दिवाळीत तेजोत्सवात रंगीबेरंगी आतषबाजीची धूम

नाशिक : प्रतिनिधी
दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी अवघे नाशिक शहर लखलखून निघाले आहे. बाजारपेठेत फटाक्यांच्या आतषबाजीची लगबग शिगेला पोहोचली आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत कानाचे पडदे फाडणार्‍या आवाजांपेक्षा आसमंत उजळवून टाकणार्‍या रंगीबेरंगी रोषणाईला नाशिककरांनी पहिली पसंती दिली आहे. वाढती पर्यावरणीय जागरूकता आणि जागेची मर्यादा यामुळे बाजारात मोठ्या आवाजाच्या फटाक्यांऐवजी मनमोहक फॅन्सी फटाक्यांची चलती पाहायला मिळते आहे.
शहरातील गोल्फ क्लब मैदान, डोंगरे वसतिगृह मैदान आणि छत्रपती संभाजी स्टेडियमसह उपनगरांत फटाक्यांची शेकडो दुकाने थाटली आहेत. दिवाळीच्या मुख्य दिवसांच्या पाश्वर्र्भूमीवर या बाजारांत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. शहरात मोकळ्या जागांची कमतरता आणि दाट वस्त्या यामुळेही ग्राहकांचा आवाजापेक्षा सुरक्षित व फॅन्सी फटाके घेण्याकडे कल असल्याचे चित्र आहे.
विशेषतः सिडको, सातपूर येथील दाट घरांमुळे मुलांना भररस्त्यात फटाके फोडावे लागत असल्याने ग्राहकांनी आवाजाऐवजी आतषबाजीच्या
फटाक्यांना पसंती दिली आहे.
महागाईचे सावट असले, तरी दिवाळीचा उत्साह कायम आहे. लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर येत्या बाजारपेठेत अधिक उलाढाल होण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. शहरात दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे.

रंगीबेरंगी प्रकाशाची भुरळ
गेल्या काही वर्षांत फटाके फोडण्याच्या पद्धतीत लक्षणीय बदल झाला आहे. वाढते ध्वनी व वायुप्रदूषण, तसेच न्यायालयाचे निर्बंध यामुळे नागरिक स्वतःहून कमी आवाजाच्या आणि आकर्षक प्रकाश देणार्‍या पर्यायांकडे वळत आहेत. यंदा बाजारात बटरफ्लाय पिंक आउट एन जॉय यांसारख्या आकाशात विविध रंग आणि नक्षीकाम करणार्‍या फॅन्सी फटाक्यांना बच्चेकंपनीसह मोठ्यांकडूनही प्रचंड मागणी आहे.

दरवाढीची झळ, तरीही खरेदीचा उत्साह
यंदा फटाक्यांच्या किमतीत मागील वर्षाच्या तुलनेत 15 ते 20 टक्क्यांंची वाढ झाली आहे. कच्चा माल, मजुरी, पॅकिंग आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे यंदा फटाके महागले असल्याचे फटाके विक्रेत्यांनी सांगितले.

 

A spectacular display of colorful fireworks during the Diwali festival of lights

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *