– सचिन अहिरराव
मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा… वेगवान धाव, चपळ हालचाली, क्षणार्धात गोलपोस्टचा अचूक वेध आणि गोल झाल्यानंतर दोन्ही हात पसरून हवेत झेप घेत केलेला तो ‘सिऊऽऽ’ जल्लोष! स्टेडियममधील हजारो प्रेक्षकांचा गजर आणि दूरचित्रवाणीसमोर बसलेल्या कोट्यवधी चाहत्यांचा आनंद एकाच क्षणी शिगेला पोहोचायचा. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ फुटबॉलविश्वाला वेड लावणार्या या जल्लोषाला आता पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघापुरता विराम मिळाला आहे. जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने दि. 5 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने फुटबॉलच्या इतिहासातील एका सुवर्णयुगाच्या अखेरची चाहूल लागली आहे. विशेष म्हणजे, या निरोपाची हुरहूर पोर्तुगालइतकीच हजारो किलोमीटर दूर असलेल्या क्रिकेटवेड्या भारतातील तरुणाईलाही लागली आहे.
पोर्तुगालच्या मादेइरा बेटावरील एका सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या रोनाल्डोचा प्रवास एखाद्या स्वप्नकथेसारखा आहे. ऑगस्ट 2003 मध्ये अवघ्या 18 व्या वर्षी राष्ट्रीय संघात पदार्पण करणारा हा तरुण पुढे जगभरातील कोट्यवधी मुलांचा आदर्श बनला. अफाट मेहनत, कमालीची शिस्त, विलक्षण वेग आणि पराभव स्वीकारण्यास नकार देणारी जिद्द ही त्याच्या खेळाची ओळख ठरली. पोर्तुगालसाठी 234 सामने खेळताना 146 गोल नोंदवून त्याने पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने आणि गोलांचे विश्वविक्रम प्रस्थापित केले. मात्र, प्रत्येक सामन्यात स्वतःला नव्याने सिद्ध करण्याची भूक आणि वयाच्या चाळिशीनंतरही तरुण खेळाडूंना लाजवेल अशा उत्साहाने मैदानावर उतरण्याची जिद्द हीच त्याची खरी ओळख ठरली.
रोनाल्डो म्हणजे केवळ गोल करणारे दोन पाय नव्हेत, तर मैदानावर सतत काहीतरी विलक्षण घडविण्याची क्षमता असलेले व्यक्तिमत्त्व! प्रतिस्पर्ध्यांना चकविणारे ड्रिब्लिंग, वेगवान आक्रमणे, दूरवरून मारलेले भन्नाट फटके आणि हवेत उंच झेपावत हेडरद्वारे केलेले गोल पाहताना प्रेक्षक थक्क व्हायचे. गोल करण्याची संधी हुकली की स्वतःवरच संतापणारा आणि पुढच्याच क्षणी दुप्पट जोमाने प्रतिस्पर्ध्यांच्या गोलपोस्टवर चाल करून जाणारा रोनाल्डो हे फुटबॉलविश्वातील एक वेगळेच रसायन होते. त्याचा आत्मविश्वास कधी अहंकार वाटायचा, तर कधी त्याच आत्मविश्वासातून अशक्यप्राय विजय साकार व्हायचा.
रोनाल्डोच्या कारकिर्दीतील सर्वांत भावस्पर्शी क्षण म्हणजे 2016 चा युरो चषक. अंतिम सामन्यात दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्यानंतर सीमारेषेवर उभे राहून सहकार्यांना प्रोत्साहन देणारा रोनाल्डो आणि पोर्तुगालने विजेतेपद पटकावल्यानंतर त्याच्या डोळ्यांत तरळलेले आनंदाश्रू फुटबॉलप्रेमी कधीही विसरणार नाहीत. त्यानंतर 2019 आणि 2025 मधील नेशन्स लीग विजेतेपदांनी त्याच्या कारकिर्दीला आणखी झळाळी दिली. मात्र, सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवूनही विश्वविजेतेपदाचे स्वप्न अपूर्णच राहिले. सहाही विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल नोंदविणारा तो पहिला पुरुष फुटबॉलपटू ठरला. 2026 च्या विश्वचषकातही त्याने तीन गोल केले, पण अंतिम सोळा संघांच्या फेरीत स्पेनकडून पोर्तुगालचा पराभव झाला. फुटबॉलने त्याला जवळपास सर्व काही दिले, पण विश्वचषकाची एक आस शेवटपर्यंत कायम राहिली.
रोनाल्डोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची लोकप्रियता देश, भाषा आणि संस्कृतीच्या सीमा केव्हाच ओलांडून गेली. विशेषतः क्रिकेटवेड्या भारतात रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांनी निर्माण केलेली क्रेझ विलक्षण आहे. ज्या देशात क्रिकेटपटूंना देवासमान मानले जाते, त्या देशातील नव्या पिढीच्या मनात या दोन फुटबॉलपटूंनी तितकेच भावनिक स्थान निर्माण केले. काही तरुणांसाठी तर त्यांचे आकर्षण क्रिकेटमधील आवडत्या खेळाडूंपेक्षाही अधिक आहे. क्रिकेटची बॅट हातात घेऊन विराट कोहलीसारखे खेळण्याचे स्वप्न पाहणार्या मुलांच्या बरोबरीने रोनाल्डोसारखा गोल करण्याचे स्वप्न पाहणारी पिढीही भारतात मोठी झाली आहे. क्रिकेटमध्ये षटकार ठोकल्यानंतर होणार्या जल्लोषाइतकाच आनंद फुटबॉलला लाथ मारून ‘सिऊऽऽ’ म्हणण्यात मिळू लागला आहे.
आज शाळा-महाविद्यालयांच्या मैदानांवर, सोसायट्यांच्या आवारात आणि रस्त्यांवर रोनाल्डोच्या नावाची सात क्रमांकाची जर्सी घातलेली मुले सहज दिसतात. कुणाच्या अंगावर पोर्तुगालची लाल जर्सी असते, तर कुणी रिअल माद्रिदच्या पांढर्या जर्सीत मिरवत असतो. कुणाच्या मोबाईलवर त्याचा फोटो, तर कुणाच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर ‘सीआर सेव्हन’चा उल्लेख! अनेकांना पोर्तुगालचा इतिहास ठाऊक नसेल, त्याच्या क्लबची संपूर्ण माहितीही नसेल; पण ‘सीआर सेव्हन’ कोण, हे मात्र नक्की ठाऊक असते. फुटबॉल खेळताना स्वतःला रोनाल्डो समजणारा चिमुकला, गोल केल्यानंतर त्याच्यासारखी उडी मारणारा शाळकरी मुलगा किंवा सात क्रमांकाची जर्सी घालून मित्रांसमोर मिरवणारा तरुण ही दृश्ये भारतातही परिचयाची झाली आहेत. या मुलांसाठी रोनाल्डो हा केवळ परदेशी फुटबॉलपटू नाही, तो त्यांच्या बालपणातील आनंदाचा आणि खेळातील उत्साहाचा भाग बनला आहे.
ही लोकप्रियता महानगरांपुरती मर्यादित नाही. मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांपासून छोट्या गावांपर्यंत फुटबॉल खेळणार्या मुलांच्या तोंडी रोनाल्डोचे नाव असते. मैदानावर ‘मी रोनाल्डो’, ‘तू मेस्सी’ अशी वाटणी होणेही मुलांच्या खेळातील गंमत बनली आहे. रोनाल्डोची जर्सी घातली म्हणजे त्याच्यासारखे खेळता येईलच असे नाही, पण ती अंगावर चढविल्यानंतर मिळणारा आत्मविश्वास वेगळाच असतो. सात क्रमांक हा त्यांच्यासाठी केवळ जर्सीवरील अंक राहिलेला नाही, तर एका स्वप्नाची खूण बनला आहे. भारतातील फुटबॉलच्या या नव्या चाहतावर्गाला आकार देण्यात रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांचाही मोठा वाटा आहे.
रोनाल्डोच्या भारतीय चाहतावर्गाची व्याप्ती सोशल मीडियावरील आकडेवारीतूनही स्पष्ट होते. जून 2026 मधील एका सोशल मीडिया विश्लेेषणानुसार इन्स्टाग्रामवर रोनाल्डोचे भारतात सुमारे 8 कोटी 13 लाख, तर मेस्सीचे 5 कोटी 66 लाख फॉलोअर्स असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. विश्वचषकाच्या काळात त्यांच्या जर्सींना असलेली मागणी, सोशल मीडियावर रंगणार्या चर्चा आणि गोलांच्या व्हिडिओंना मिळणारा प्रतिसाद यातून ही क्रेझ व्यक्त होत असते. कोण महान, कोणाचे गोल अधिक सुंदर, कोणाचे विक्रम मोठे, यावरून मित्रांच्या कट्ट्यांवर रंगणारे वादही संपलेले नाहीत. मेस्सीच्या खेळात सहजसुंदर कलात्मकता दिसते, तर रोनाल्डोच्या खेळात जिद्द, ताकद आणि कठोर मेहनतीचे दर्शन घडते. भारतीय जेन झी पिढीसाठी हे दोघे केवळ परदेशी खेळाडू नाहीत, तर त्यांच्या डिजिटल जगातील नायक आहेत.
निवृत्तीची घोषणा करताना रोनाल्डोने पोर्तुगालची सात क्रमांकाची जर्सी पुढच्या पिढीकडे सोपविण्याची वेळ आल्याचे सांगितले. हा निर्णय केवळ बुद्धीने नव्हे, तर हृदयाने घ्यावा लागल्याची त्याची भावना चाहत्यांच्या मनाला भिडणारी होती. राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणे हाच आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठा विजय असल्याचे त्याने म्हटले. आपल्या एखाद्या गोलमुळे कुणाच्या चेहर्यावर आनंद उमटला असेल, कुणी क्षणभर चिंता विसरून दुसर्याला मिठी मारली असेल, तर आपल्या खेळण्याचे सार्थक झाले, अशी त्याची भावना होती. तब्बल 23 वर्षे अभिमानाने मिरवलेली जर्सी उतरविण्याचा निर्णय त्याच्यासाठी किती कठीण असेल, याची कल्पना चाहत्यांना नक्कीच आली असेल.
अर्थात, रोनाल्डोचा फुटबॉलशी संबंध अद्याप संपलेला नाही. सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून तो खेळत राहणार असून, कारकिर्दीतील एक हजार गोलांचा ऐतिहासिक टप्पा गाठण्याचे त्याचे स्वप्नही कायम आहे. त्यामुळे मैदानावर त्याच्या खेळाची जादू आणखी काही काळ अनुभवता येईल. मात्र, पोर्तुगालच्या लाल-हिरव्या जर्सीत सात क्रमांक घेऊन मैदानात उतरणारा रोनाल्डो आता इतिहासाचा भाग बनत आहे. ती जर्सी पुढे दुसरा खेळाडू परिधान करेल; पण त्या सात क्रमांकाला रोनाल्डोने दिलेली ओळख पुसणे सोपे नसेल.
पोर्तुगालच्या संघातील सात क्रमांकाची जर्सी आता दुसर्या खेळाडूच्या अंगावर दिसेल. मात्र, भारतातील एखाद्या छोट्याशा मैदानावर, सोसायटीच्या आवारात किंवा शाळेच्या पटांगणावर फुटबॉलला लाथ मारल्यानंतर दोन्ही हात पसरून हवेत झेप घेणारा एखादा चिमुकला जेव्हा पुन्हा ‘सिऊऽऽ’ म्हणेल, तेव्हा रोनाल्डो तिथेही जिवंत असेल! त्या मुलाला कदाचित रोनाल्डोचे सर्व 146 आंतरराष्ट्रीय गोल आठवणार नाहीत, त्याचे विश्वविक्रमही ठाऊक नसतील; पण गोल झाल्यानंतरचा आनंद कसा साजरा करायचा, हे त्याला रोनाल्डोने शिकवलेले असेल. कारण काही खेळाडू मैदानातून निवृत्त होतात; चाहत्यांच्या हृदयातून कधीच नाहीत!
यशाला मेहनतची जोड
रोनाल्डोने या पिढीला दिलेला सर्वांत मोठा संदेश म्हणजे प्रतिभेला मेहनतीची जोड दिल्याशिवाय यशाला पूर्णत्व येत नाही. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही नियमित सराव, कठोर शिस्त, आहाराबाबत जागरूकता आणि
स्वतःच्या क्षमतेवर अढळ विश्वास याबाबतीत त्याने निर्माण केलेला आदर्श अनेक तरुणांना प्रेरणा देणारा ठरला. त्याची कारकीर्द म्हणजे केवळ गोलांची मालिका नाही, तर स्वतःच्या मर्यादा सतत ओलांडत राहण्याचा प्रवास आहे. त्यामुळेच भारतातील एखाद्या छोट्या शहरात सात क्रमांकाची जर्सी घालून फुटबॉल खेळणार्या मुलालाही त्याची निवृत्ती आपल्याच आवडत्या नायकाच्या निरोपासारखी वाटते.
Bye-bye ‘CR7’!