दूध-दही, पनीरच्या पॅकेटवर आता दिसणार नवा लोगो

खरे डेअरी प्रॉडक्ट ओळखणे होणार सोपे, 1 जुलै 2028 पासून नियम लागू

नाशिक : प्रतिनिधी 
बाजारातून दूध, दही, पनीर घेताना आता गोंधळ होणार नाही. भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण(एफएसआय)ने डेअरी उत्पादनांसाठी एक समान नवा लोगो अनिवार्य केला आहे. 1 जुलै 2028 पासून सर्व कंपन्यांना आपल्या डेअरी उत्पादनांच्या पॅकेटवर हा लोगो लावावाच लागणार आहे.
एफएसएसएआयने 6 नोव्हेंबर 2026 रोजी अन्नसुरक्षा आणि मानके (लेबलिंग आणि प्रदर्शन) द्वितीय सुधारणा नियमावली, 2026 अधिसूचित केले. 9 नोव्हेंबरला ते राजपत्रात प्रसिद्ध झाले. 2020 च्या लेबलिंग नियमांमध्ये हा बदल करण्यात आला आहे.
कोणत्या उत्पादनांवर
लागू होणार?
हा नियम फक्त दूध-दही-पनीरपुरता नाही. तर, दूध, दही, पनीर, तूप, लोणी, चीज, खवा, आइस्क्रीम, फ्लेवर्ड फर्मेंटेड मिल्क आणि कंपोझिट मिल्क प्रॉडक्ट्स यांनाही
सक्तीचा राहील.

ग्राहकांना काय फायदा?
जसे पॅकेटवर हिरवा ठिपका म्हणजे शाकाहारी आणि लाल त्रिकोण म्हणजे मांसाहारी, हे आपल्याला लगेच कळते, तसेच आता निळा चौकोन आणि पांढरा थेंब दिसला की ते उत्पादन दूध किंवा दुधापासून बनलेले डेअरी उत्पादन आहे, हे लगेच ओळखता येईल.
अनेकदा वनस्पतीजन्य – म्हणजे सोया, बदाम, ओट्सपासून बनवलेल्या पेयांना दूध म्हटले जाते किंवा डेअरीसारखी दिसणारी पण दुधापासून न बनलेली उत्पादने विकली जातात. अशा वेळी खरे डेअरी प्रॉडक्ट ओळखण्यास हा लोगो मदत करेल, असे एफएसएसएआयने म्हटले आहे.
अर्थात, लोगो असणे म्हणजे ते उत्पादन भेसळमुक्त किंवा 100% शुद्ध आहे, याची हमी नव्हे. तो फक्त त्या उत्पादनाच्या श्रेणीची ओळख आहे. गुणवत्ता आणि सुरक्षिततेसाठी एफएसएसएआयचे इतर मानके, एफएसएसएआय लोगो नंबर आणि लेबलवरील माहिती तपासणे अजूनही गरजेचे राहील.
कंपन्यांना पॅकेजिंग बदलण्यासाठी दीड वर्षाहून अधिक वेळ दिला आहे. त्यामुळे 1 जुलै 2028 नंतर बाजारात येणार्‍या प्रत्येक डेअरी पॅकेटवर हा निळा-पांढरा लोगो दिसणार आहे.

कसा दिसेल नवा लोगो?

नवा लोगो अगदी सोपा आणि लक्षात राहणारा आहे. निळ्या रंगाच्या चौकोनात पांढर्‍या रंगाचा दुधाचा थेंब. हा लोगो पॅकेटच्या समोरच्या मुख्य भागावर लावणे बंधनकारक असेल. पॅकेटच्या आकारानुसार लोगोचा किमान आकारही ठरवून दिला आहे. पॅकेटच्या मुख्य भागाचे क्षेत्रफळ 100 चौ. सेमीपर्यंत असल्यास लोगोचा किमान आकार 6 मिमी आवश्यक राहील. 100 ते 500 चौ. सेमी क्षेत्रफळासाठी 8 मिमी आणि 500 ते 2500 चौ. सेमी क्षेत्रफळ असल्यास 12 मिमी आकारात लोगो राहील. पॅकेट क्षेत्रफळ 2500 चौ. सेमीपेक्षा मोठे राहिल्यास लोगो आकार 16 मिमी ठेवावा लागेल.

A new logo will now appear on packets of milk, curd, and paneer.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *