फराळाचा ‘ओव्हरडोस’ झाला; आता आरोग्याचा ’बॅलन्स’ साधा!

दिवाळीनंतर ’बॉडी डिटॉक्स’पेक्षा ‘संतुलित आहारा’ची गरज

नाशिक : प्रतिनिधी
आकाशकंदिलांचा झगमगाट, पणत्यांची आरास आणि फराळाच्या खमंग सुगंधाने नटलेला दिवाळीचा सण आता निरोप घेत आहे. या उत्साहात चकली, करंजी, बेसन-रव्याचे लाडू, शंकरपाळे, अनारसे, चिवडा आणि खव्याच्या मिठाईवर सर्वांनीच मनसोक्त ताव मारला. मात्र, तळलेले, तुपातले आणि गोड पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्याने अनेकांचे खाण्यापिण्याचे वेळापत्रक बिघडले आहे. वजन वाढणे, पोट फुगणे, अ‍ॅॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि आळस अशा तक्रारी डोके वर काढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महागडे डिटॉक्स ड्रिंक्स किंवा कडक उपवासाच्या आहारी न जाता, घरच्या साध्या व संतुलित आहारातून शरीराला पुन्हा पूर्वपदावर आणणे गरजेचे असल्याचा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
दिवाळीच्या काळात घरोघरी होणारा फराळ आणि पाहुण्यांकडील आग्रहाचे खाणे यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज आणि साखर जाते. सण संपल्यानंतर हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि शरीर हलके करण्यासाठी अनेक जण ’बॉडी डिटॉक्स’च्या नावाखाली केवळ ज्यूस पिणे किंवा उपाशी राहणे असे टोकाचे उपाय करतात. परंतु मानवी शरीरातील लिव्हर आणि किडनी हे दोन अवयव नैसर्गिकरीत्या अनावश्यक घटक बाहेर टाकण्याचे काम करत असतात. त्यामुळे शरीराला कृत्रिम डिटॉक्सची नव्हे, तर योग्य पोषणाची आणि नियमित दिनचर्येची आवश्यकता असते.

दिवाळीत खाल्लेल्या फराळाबद्दल अजिबात अपराधी वाटून घेऊ नका. शरीराला शिक्षा म्हणून उपाशी राहणे किंवा क्रॅश डाएट करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. एक-दोन दिवस जास्त खाल्ल्याने आरोग्य बिघडत नाही आणि दोन दिवस डाएट केल्याने ते सुधारत नाही. त्यामुळे दिवाळीनंतर शरीराला डिटॉक्स करण्यापेक्षा योग्य पोषण देणे अधिक महत्त्वाचे आहे.
– क्षितिजा गायकवाड, आहारतज्ज्ञ

हे उपाय करा
फायबरयुक्त पदार्थांचा समावेश : पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी आहारात पपई, पेरू, सफरचंद, संत्री यांसारखी फळे, तसेच काकडी, गाजर आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवावे.
प्रोटिनकडे लक्ष द्या : स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि पोट भरलेले राहण्यासाठी मूग, मटकी, विविध डाळी, उसळी, दही, पनीर आणि अंडी यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा रोजच्या जेवणात समावेश करावा.
तळलेले आणि गोड पदार्थ टाळा : उरलेला फराळ एकाच वेळी संपवण्याच्या नादात रोज चकली, चिवडा, लाडू खाणे टाळावे. काही दिवस साखर व तेलकट पदार्थांपासून लांब राहावे.
घरच्या साध्या जेवणाला प्राधान्य : बाहेरचे खाणे बंद करून पोळी-भाजी, डाळ-भात, मुगाच्या डाळीची खिचडी, दही आणि कोशिंबीर अशा सात्त्विक व संतुलित आहाराकडे वळावे.
व्यायाम आणि पुरेशी झोप : चयापचय क्रिया (मेटाबॉलिक हेल्थ) सुधारण्यासाठी दररोज 30 ते 45 मिनिटे चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम करावा. सोबतच झोपेची वेळ नियमित ठेवून शरीराला पुरेशी विश्रांती द्यावी.

Overindulged in festive snacks? Now, restore the balance to your health!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *