सस्पेन्स संपला; फडणवीसच मफलर मॅन!

अजितदादा अपघातप्रकरणी रोहित पवारांचा बॉम्ब

मुंबई/पुणे : प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघाताच्या प्रकरणाने सोमवारी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण तापवले. एकाच दिवशी दोन विरुद्ध टोके समोर आली. एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले, तर दुसरीकडे पुण्यात अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात स्वतः फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर चौकशी अहवाल लवकर आणण्याची आणि दोषी असेल तर फाशी देण्याची मागणी केली.
रोहित पवार यांनी यापूर्वी ‘मफलर मॅन’ असा उल्लेख करत एका बड्या नेत्याकडे बोट दाखवले होते. सोमवारी त्यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांचा मफलर घातलेला फोटो आणि व्हिडिओ दाखवला. हा फोटो उद्योगपती रोहित सिंग यांच्या लग्नातील असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांचा आरोप असा की, अजित पवार यांचा अपघात झाला त्या विमानाची संचालक कंपनी व्हीएसआर व्हेंचर्स आणि तिचे मालक व्ही. के. सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. व्ही. के. सिंग यांच्या जयपूरमधील कार्यक्रमाला फडणवीस उपस्थित होते.
निवडणूक निकालाच्या दिवशी एक गूढ विमान मुंबई-जयपूर-मुंबई असे गेले. दादांच्या निधनानंतर व्हीएसआरला 168 कोटी रुपये दिले गेले, असाही आरोप त्यांनी केला.
महत्त्वाची बाब अशी की, रोहित पवार यांनी स्वतःच स्पष्ट केले की, फडणवीस यांनी अजितदादांचा घातपात केला, असे ते म्हणत नाहीत. त्यांचा संशय फक्त कंपनीला वाचवण्याबाबत आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, साडेनऊ महिने झाले तरी ठोस माहिती समोर आलेली नाही, अशीही त्यांनी तक्रार केली. त्यांनी सीआयडीकडून सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी केली नसल्याचा खुलासाही केला.

फडणवीसांचा अमित शहांसमोर शब्द
पुणे जिल्हा परिषद परिसरातील यशवंतराव चव्हाण भवन येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले, की 8-10 महिने झाले, मोठी चौकशी सुरू आहे, अमेरिकेसह इतर देशांच्या टीम मदत करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील संभ्रम दूर झाला पाहिजे, अहवाल लवकरात लवकर आला पाहिजे. जर कोणी दोषी असेल तर त्याला आम्हाला फासावर लटकवता आले पाहिजे. हा जर अपघात असेल तर सामान्यांच्या मनातील आक्रोशावर फुंकर पडली पाहिजे. शहा यांनी स्वतः लक्ष घालून अहवाल लवकर आणण्याचे आश्वासन दिल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

‘दोषी असेल तर फाशी द्या’

भाजपचा पलटवार
भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांना ‘प्रसिद्धीचा हावरट’ म्हटले. व्हीएसआर कंपनी 2013 पासून सर्वच पक्षांना आणि सरकारला विमानसेवा देते. त्यामुळे अनेक नेत्यांचे त्यांच्यासोबत फोटो आहेत. एका फोटोवरून आरोप करणे हे खालच्या स्तराचे राजकारण आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. अजितदादांच्या पुतळा अनावरणाचे महत्त्व कमी करण्यासाठीच हा उपक्रम केल्याचा आरोपही भाजपने केला.

The suspense is over; Fadnavis is indeed the ‘Muffler Man’!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *