वाढत्या गैरप्रकारांनी प्रशासनावर स्पष्टीकरणाची नामुष्की

बोगस भरतीनंतर सोशल मीडियावरही गैरप्रकार

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने बनावट निविदा प्रक्रिया आणि बोगस भरतीचे प्रकार समोर आल्यानंतर आता बनावट समाजमाध्यम खात्यांचाही प्रकार उघडकीस आला आहे. प्राधिकरणाच्या नावाचा वापर करून समाजमाध्यमांवर बनावट खाती चालविली जात असल्याने नागरिक आणि भाविकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. वारंवार अशा प्रकारचे गैरप्रकार समोर येत असताना त्यांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी नागरिकांनाच अधिकृत माध्यमांवरून माहिती घेण्याचे आवाहन करण्याची वेळ प्राधिकरणावर आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे विविध विकासकामे, पायाभूत सुविधांची उभारणी आणि भाविकांसाठी सोयीसुविधांची निर्मिती सुरू आहे. या कामांशी संबंधित माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने नागरिकांना अधिकृत संकेतस्थळ आणि समाजमाध्यम खात्यांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 31 ऑक्टोबर रोजी कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले होते.
या संकेतस्थळावर प्राधिकरणाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांच्या लिंक्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यूट्यूब, फेसबुक, एक्स आणि इन्स्टाग्रामवरून अधिकृत माहिती प्रसिद्ध केली जात आहे. या सर्व उपक्रमांसह कुंभमेळा प्राधिकरणाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी एका संस्थेला तब्बल 27 कोटींचे काम देण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे. यानंतरही नागरिकांपर्यंत प्राधिकरणाच्या अधिकृत माहिती ऐवजी बनावट खात्यांच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती पोहोचत असल्याने प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांनी अधिकृत माध्यमांवरील माहितीचीच खातरजमा करावी असे आवाहन केले आहे. मात्र, बनावट खात्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्राधिकरणाकडून कोणती ठोस कार्यवाही करण्यात येणार? याविषयी अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

Increasing irregularities make it difficult for the administration to provide explanations.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *