पेरण्या अवघ्या 27 टक्के; पाण्याअभावी गहू-मक्याचे क्षेत्र घटणार; हरभर्याकडे शेतकर्यांचा कल
सिन्नर : भरत घोटेकर
खरीप हंगामातील उत्पादनात झालेली मोठी घट आणि पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचे सावट आता रब्बी हंगामावरही पडले आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकर्यांनी पेरण्यांना सुरुवात केली असली, तरी 16 नोव्हेंबरअखेर तालुक्यात अवघ्या 26.92 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा रब्बीचे निम्मे क्षेत्र पेरणीविना राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
पाण्याची कमतरता लक्षात घेता अधिक पाणी लागणार्या गहू आणि मक्याऐवजी कमी पाण्यात येणार्या हरभर्याला शेतकर्यांकडून पसंती दिली जात आहे.
तालुक्यात रब्बी हंगामासाठी 20 हजार 627 हेक्टर क्षेत्र नियोजित असून, आतापर्यंत 5 हजार 553 हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये गव्हाची 1 हजार 867, मक्याची 1 हजार 407, ज्वारीची 624, तर हरभर्याची 1 हजार 576 हेक्टरवर पेरणी झाली आहे. इतर कडधान्यांची 68 हेक्टरवर पेरणी झाली असून, करडई, तीळ,
सूर्यफूल यांसारख्या गळीत पिकांची पेरणी अद्याप झालेली नाही. यंदा खरीप पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांपर्यंत घट झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहेत. त्यात विहिरी आणि जलस्रोतांमधील पाणीसाठा मर्यादित असल्याने रब्बीच्या पेरण्यांवरही मर्यादा येत आहेत. ऊस पिकाच्या पूर्वहंगामी नवीन लागवडीच्या 1 हजार 50 हेक्टरपैकी 10 हेक्टरवर, तर गळीत हंगामासाठी 86 हेक्टरवर लागवड झाली आहे. ऊसासह रब्बीचे एकूण नियोजित क्षेत्र 21 हजार 677 हेक्टर असून, आतापर्यंत 5 हजार 649 हेक्टरवर पेरणी व लागवड पूर्ण झाली आहे.
सिन्नर तालुका पीकनिहाय रब्बी पेरणी अहवाल (16 नोव्हेंबरअखेर)
अ.क्र. पिकाचे नाव सरासरी क्षेत्र (हे.) प्रत्यक्ष पेरणी (हे.)
1 ज्वारी (रब्बी) 2,495 624
2 गहू 8,933 1,867
3 मका 3,045.24 1,407
4 इतर तृणधान्य 0.20 11
5 हरभरा 6,153.88 1,576
रब्बी हंगाम उसासह एकूण क्षेत्र 21,677 हेक्टर
रब्बी पेरणी पूर्ण : 5,553 हेक्टर, पेरणीची टक्केवारी : 26.92 टक्के
हरभरा पेरणी : 1,576 हेक्टर, ऊसासह एकूण पेरणी व लागवड : 5,649 हेक्टर.
गहू, मक्याचे क्षेत्र घटणार
सिन्नर तालुक्यात रब्बी हंगामात गव्हाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जाते. जनावरांच्या चार्यासाठी मक्यालाही पसंती असते. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने या दोन्ही पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गहू आणि मक्याचे क्षेत्र घटण्याची चिन्हे असून, कमी पाण्यात येणार्या हरभर्याचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे बर्याच भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे.
50 टक्क्यांपर्यंत पेरण्या होण्याची अपेक्षा
आगामी काळात पेरणीच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली, तरी एकूण नियोजित क्षेत्राच्या निम्म्यापर्यंतच पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित क्षेत्र नापेर राहण्याचे संकट उभे आहे.
– ज्ञानेश्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी, सिन्नर.
Drought hits the Rabi season too; fears that half the cultivable area in Sinnar may remain unsown