जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका आक्रमक
नाशिक : प्रतिनिधी
द्वारका परिसरातील दीडशे कोटींची सुमारे चार एकर जागा ताब्यात घेण्यासाठी नाशिक महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी व्यावसायिकांची सुनावणी घेतल्यानंतर आता अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे अंतरिम नोटिसा धाडल्या जाणार आहेत. त्यानंतरही व्यावसायिकांनी जागा न सोडल्यास महापालिका सदर जागा निष्कासित करणार आहे. ही जागा मनपा मालकीची असल्याने ती लवकर ताब्यात घेण्यासाठी आता प्रशासनाने आक्रमक पावले टाकली आहेत.
यापूर्वी नोटीस पाठविल्यानंतर व्यावसायिकांनी राजीव गांधी भवन मुख्यालयातील अतिक्रमण विभागात उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्याकडे 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान बाजू मांडली होती. द्वारका चौकातील सर्व्हे क्रमांक 489, फायनल प्लॉट क्रमांक 282 मधील ही चार एकर जागा मूळची नाशिक नगरपालिकेच्या मालकीची आहे. नगरपालिका अस्तित्वात असताना 1973 पासून ही जागा दुकानदारांना भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. सद्यःस्थितीत या जागेवर 109 दुकानदार, व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. द्वारका चौकातील रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी मनपाने 2015 मध्येच या दुकानदारांना नोटिसा दिल्या होत्या. हे प्रकरण उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने सर्व हक्क महापालिकेला दिले होते. त्यानंतर मनपाने या जागेचा ताबा घेण्यासाठी तत्काळ जागा रिकामी करण्यासाठी नोटिसा बजावल्या.पुढे दुकानदारांनी त्यांची बांजू मांडली असली, तरी महापालिका जागा ताब्यात घेण्यावर ठाम आहे. द्वारका परिसर दाट लोकवस्तीचा, मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वापर असलेला व मोठ्या वाहतूक कोंडीचा मध्यवर्ती परिसर आहे. बँका, रुग्णालये, शाळा, व्यापारी संकुले व हॉटेले असून, नाशिक-पुणे महामार्ग व मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणारा प्रमुख चौक येथे आहे.
या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी, वारंवार अपघात तसेच पादचार्यांच्या सुरक्षित व सुरळीत वाहतुकीस गंभीर अडथळे निर्माण होतात. वाहतूक कोंडी कमी करून रस्ता रुंदीकरणाचे सध्या काम सुरू आहे. पादचारी सुविधा निर्माण करणे, तसेच या परिसरातील इतर सार्वजनिक पायाभूत सुविधा व विकासकामे करण्यासाठी महानगरपालिकेला या जागेची सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता असल्याचे महापालिकेने धाडलेल्या नोटिसांत म्हटले आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जागेची आवश्यकता
पुढील वर्षी (2027) ऑगस्टपासून सिंहस्थ कुंभमेळ्याला प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी, महापालिकेला या मोठ्या भूखंडाचा फायदा केला जाणार आहे. याच भागात महापालिका कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या द़ृष्टीने द्वारका ते नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकापर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे. काम सुरू होण्याआधीच महापालिका ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
यापूर्वी द्वारका येथील जागेबाबत व्यावसायिकांची सुनावणी घेतली आहे; परंतु ही जागा महापालिकेची असून, हक्क सांगणारे सर्व कागदपत्रे मनपाच्या नावानेच आहेत. त्यानुसार येत्या आठवड्यात व्यावसायिकांना अंतरिम नोटिसा धाडल्या जाणार आहेत.
– सुवर्णा दखणे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, मनपा
Interim notices issued to 76 business owners in Dwarka