ताम्रपटातील प्राचीन नाशिक

– रमेश पडवळ
– चेतन राजापूरकर

नाशिकचा प्राचीन इतिहास केवळ मंदिरे, लेणी आणि शिलालेखांपुरता मर्यादित नाही. शतकानुशतके ताम्रपटांवर कोरलेल्या अक्षरांतूनही या प्रदेशाच्या इतिहासाची अनेक अज्ञात पाने उलगडतात. विविध राजघराण्यांची सत्ता, राजकीय विस्तार, प्राचीन गावांची नावे, प्रशासनव्यवस्था, भूमिदानाची परंपरा, धार्मिक संस्था आणि सामाजिक-आर्थिक जीवनाचे महत्त्वपूर्ण संदर्भ त्यातून समोर येतात. नाशिकमध्ये सापडलेल्या ताम्रपटांबरोबरच अन्य प्रदेशांतील ताम्रपटांतही नाशिकच्या ऐतिहासिक अस्तित्वाच्या खुणा आढळतात. अशा 32 ताम्रपटांतील नोंदींचा वेध घेणारा चेतन राजापूरकर आणि रमेश पडवळ लिखित ‘ताम्रपटातील प्राचीन नासिक’ हा संशोधनात्मक ग्रंथ संस्कार भारती, नासिक इतिहास संशोधन मंडळ आणि नासिक हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज, दि. 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता गंगापूर रोडवरील कुर्तकोटी शंकराचार्य संकुलाच्या तिसर्‍या मजल्यावरील नानाराव ढोबळे सभागृहात प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त या ग्रंथाचा घेतलेला वेध…

नाशिकचा इतिहास गोदावरीतीरावरील मंदिरे, लेणी आणि तीर्थक्षेत्रांइतकाच राजघराण्यांचे सत्तासंघर्ष, बदलत्या राजकीय सीमा, ग्रामव्यवस्था, व्यापारी संबंध आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरांचाही आहे. त्याची अनेक पाने ताम्रपटांत दडलेली आहेत. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात राजे, सामंत व प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या दानांची, विशेषतः भूमिदानांची, अधिकृत नोंद तांब्याच्या पत्र्यांवर अर्थात ताम्रपटांवर कोरली जात असे. त्यात दानकर्त्या राजाचे नाव, वंशावळ, पदव्या, राज्यकारभाराचे ठिकाण, दान दिलेले गाव, त्याच्या सीमा, शेजारील गावे, नद्या, धार्मिक संस्था आणि दान स्वीकारणार्‍याची माहिती त्यात असते. संवत्सर, शकवर्ष आणि तिथींवरून राजघराण्यांचा कालक्रम निश्चित करता येतो. करपद्धती, गावांचे अधिकार, व्यापारी संघटना आणि धार्मिक संस्थांची आर्थिक व्यवस्थाही समजते. त्यामुळे ताम्रपट तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचे महत्त्वपूर्ण पुरावे ठरतात
बत्तीस ताम्रपटांतून दिसणारे नाशिक प्राचीन नाशिक प्रदेशातील राजसत्तांनुसार प्रशासकीय विभाग बदलत गेल्याने जिल्ह्याबाहेरील ताम्रपटांतही गावांचे आणि राजकीय संबंधांचे उल्लेख आढळतात. काही ताम्रपट येथे प्रत्यक्ष सापडले, काहींमध्ये स्थाननामे आहेत, तर काही राजघराण्यांचा सत्ताविस्तार दर्शवतात. त्यातून त्रैकूटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकूट, सेंद्रक, हरिश्चंद्रवंशीय आणि यादव राजघराण्यांचा नाशिकशी संबंध स्पष्ट होतो. गोवर्धन, गोपराष्ट्र, नाशिकदेश, अंजनेरी, कळवण, अभोणा, सिन्नर, वणी, लोहणेर आणि देवळाली परिसराचे ऐतिहासिक संदर्भही उलगडतात.
त्रैकूटकांच्या ताम्रपटांतील नाशिक
सातवाहनांनंतर उत्तर महाराष्ट्रात आभीर आणि पुढे त्रैकूटक राजघराण्यांना महत्त्व प्राप्त झाले. त्यांच्या इतिहासासाठी ताम्रपट व नाणी उपयुक्त पुरावे आहेत. इंद्रदत्त, दह्रसेन आणि व्याघ्रसेन या राजांची नावे त्यांत आढळतात. दह्रसेनाने केलेल्या अश्वमेध यज्ञाचा उल्लेख त्याच्या सार्वभौमत्वाच्या दाव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सुरतजवळील पारडी येथे सापडलेला दह्रसेनाचा आणि व्याघ्रसेनाचा सुरत ताम्रपट या घराण्याचा पश्चिम भारतातील विस्तार स्पष्ट करतात. त्यातून नाशिकचे उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम किनारपट्टीच्या राजकीय घडामोडींशी असलेले संबंध समोर येतात.
कलचुरी ताम्रपटांतून सत्ताविस्तार
कलचुरी राजघराण्यातील कृष्णराज, शंकरगण आणि बुद्धराज यांच्या कारकिर्दीची माहिती ताम्रपटांतून मिळते. अभोणा (कळवण) येथे सापडलेल्या शंकरगणाच्या कलचुरी संवत 347, म्हणजे साधारण इ.स. 597 च्या ताम्रपटातून कलचुरी सत्तेचा प्रभाव माळव्यापासून नाशिकपर्यंत असल्याचे दिसते. वडनेरच्या बुद्धराजाच्या ताम्रपटामुळे त्याचा कालक्रम आणि अन्य अभिलेखांशी असलेले संबंध तपासता येतात.
चालुक्यांच्या ताम्रपटातील गोपराष्ट्र
दख्खनच्या इतिहासात बदामीच्या चालुक्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. नाशिक जिल्ह्यातील लोहोणेर येथे सापडलेला सम्राट पुलकेशी दुसरा याचा शक 552, म्हणजे इ.स. 630 चा ताम्रपट उल्लेखनीय आहे. चालुक्य राजा नागवर्धनाच्या ताम्रपटात गोपराष्ट्रातील बालेग्रामचा उल्लेख असून, त्याची ओळख आजच्या इगतपुरी तालुक्यातील बेळगाव तर्‍हाळेशी जोडली जाते. कपाळेश्वराच्या पूजेसाठी आणि मंदिरातील महाव्रती तपस्व्यांच्या निर्वाहासाठी हे गाव दान दिल्याची नोंद आहे. ‘गोपराष्ट्र’ या प्रशासकीय संज्ञेतून तत्कालीन भूगोलाचाही मागोवा घेता येतो.
राष्ट्रकूटांच्या ताम्रपटांतील नाशिकदेश
राष्ट्रकूट काळात नाशिकचे राजकीय आणि प्रशासकीय महत्त्व अधिक ठळक झाले. दंतिदुर्ग, ध्रुव, गोविंद तिसरा आणि इंद्र तिसरा यांच्या काळातील अभिलेख यासाठी उपयुक्त आहेत. सम्राट ध्रुवाच्या कारकिर्दीतील शक 701 चा सिन्नर येथे सापडलेला ताम्रपट महत्त्वाचा आहे. तीन ताम्रपत्रांच्या या संचात सेंद्रक घराण्यातील मांडलिक दुर्गहस्ती याने प्रतिष्ठान विभागातील बृहत्पुष्करिका गाव कौशिक गोत्रातील वर्धन ब्राह्मणाला दान दिल्याची नोंद आहे. हा ताम्रपट ध्रुवाची पत्नी शीलमहादेवी हिच्या मंत्रिपदावर कार्यरत बलदेवाने तयार केला होता.
वणी-दिंडोरी परिसरात सापडलेला गोविंद तिसर्‍याचा शक 730, म्हणजे इ.स. 808-809 चा ताम्रपट ऐतिहासिक भूगोलासाठी महत्त्वाचा आहे. त्यातील ‘नाशिकदेश’ आणि ‘वटनगर विषय’ या प्रशासकीय संज्ञांसह अंबकग्रामच्या दानाची नोंद नाशिकची स्वतंत्र प्रादेशिक ओळख अधोरेखित करते. वजिरखेडा परिसरातील इंद्र तिसर्‍याच्या ताम्रपटांमुळे नाशिक, खानदेश आणि प्रतिष्ठान यांच्यातील राजकीय संबंधांचा अभ्यास करता येतो.
अंजनेरीच्या ताम्रपटांतील धार्मिक जीवन
अंजनेरी परिसरातील हरिश्चंद्रवंशीय राजा भोगशक्तीच्या ताम्रपटांतून धार्मिक संस्था, व्यापारी वर्ग आणि ग्रामव्यवस्थेचे दर्शन घडते. कलचुरी संवत 461, म्हणजे इ.स. 710-711 च्या सुमारास जयपूर येथील नारायण मंदिरासाठी आठ गावे दान दिल्याची नोंद आहे. या मंदिराच्या व्यवस्थापनात व्यापार्‍यांचा सहभाग होता. त्यांच्या प्रतिनिधींमार्फत उत्पन्न आणि उत्सवांचे व्यवस्थापन करण्याची तरतूद होती. व्यापारी करसवलतींचाही उल्लेख आढळतो. त्यामुळे मंदिरे केवळ उपासनेची केंद्रे नव्हती, तर शेती, भूमिदान, व्यापार आणि आर्थिक व्यवहारांशी जोडलेल्या संस्थाही होत्या.
ताम्रपटांतील प्राचीन गावांचा शोध
या 32 ताम्रपटांच्या अभ्यासातील महत्त्वाचा पैलू म्हणजे प्राचीन स्थाननामांचा शोध. काळानुसार अनेक गावांची नावे व उच्चार बदलले, तर काही वसाहती लुप्त झाल्या. नाशिकदेश, गोपराष्ट्र, गोवर्धन, वटनगर विषय, बालेग्राम, अंबकग्राम आणि बृहत्पुष्करिका यांसारख्या उल्लेखांतून प्राचीन भूगोल समजतो. ताम्रपटांत ओझर, ओढा, चेहडी, मालेगाव, अभोणा, नाशिक, बेळगाव तर्‍हाळे आणि सिन्नर या गावांचेही संदर्भ आढळतात. मात्र, प्राचीन आणि आधुनिक गावांची ओळख निश्चित करताना केवळ नावातील साधर्म्य पुरेसे नसते. शेजारील गावे, नद्या, दिशा, जुने मार्ग आणि अन्य ऐतिहासिक पुराव्यांचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक असतो.
राजांच्या इतिहासापलीकडील समाजजीवन
ताम्रपटांतून केवळ राजे आणि युद्धांचा नव्हे, तर तत्कालीन समाजजीवनाचाही इतिहास समोर येतो. भूमिदानाच्या नोंदींमध्ये ब्राह्मण, तपस्वी, मंदिरांचे सेवेकरी, व्यापारी, अधिकारी आणि ग्रामव्यवस्थेतील व्यक्तींचे उल्लेख आहेत. धार्मिक संस्थांना दिलेली गावे, करसवलती, उत्पन्नाचे अधिकार आणि दानाच्या अटी यांतून शेती व महसूल व्यवस्थेची माहिती मिळते. अंजनेरीतील व्यापार्‍यांचा सहभाग आणि राष्ट्रकूटकालीन प्रशासकीय विभागांच्या नोंदी नाशिकच्या आर्थिक जीवनाचे व्यापक स्वरूप स्पष्ट करतात.
नाशिकच्या इतिहासाची कालरेषा
नाशिकच्या सातवाहनकालीन लेणी आणि शिलालेखांना विशेष महत्त्व असले, तरी त्यानंतरच्या अनेक शतकांचा इतिहास तुलनेने कमी परिचित आहे. ही उणीव ताम्रपट भरून काढतात. त्रैकूटक, कलचुरी, चालुक्य, राष्ट्रकूट आणि पुढील राजसत्तांमधील बदल, प्रशासकीय विभाग, धार्मिक आश्रय आणि भूमिदानाची परंपरा यांचा सलग मागोवा त्यातून घेता येतो. ‘ताम्रपटातील प्राचीन नासिक’ या ग्रंथात नाशिकमध्ये सापडलेल्या ताम्रपटांसह अन्य प्रदेशांतील मात्र, नाशिकच्या राजकीय इतिहासाशी, भूगोलाशी किंवा स्थाननामांशी संबंधित ताम्रपटांचाही विचार केला आहे. मूळ ऐतिहासिक साधनांच्या आधारे प्राचीन गावांची ओळख, राजघराण्यांच्या वंशावळी, दानव्यवस्था, प्रशासकीय विभाग आणि धार्मिक परंपरांचा परस्परसंबंध शोधणे हे या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. एका ताम्रपटात गावाच्या दानाची नोंद आहे, दुसर्‍यात धार्मिक संस्थेला मिळालेला आश्रय; तिसर्‍यात प्रशासकीय विभागाचे नाव, तर चौथ्यात प्राचीन गावाच्या अस्तित्वाचा पुरावा. या सर्व नोंदींमधून गोदावरीच्या खोर्‍यातील वसाहती, राजसत्ता, धार्मिक श्रद्धा, कृषी संस्कृती आणि व्यापारी संबंधांचा इतिहास आकाराला येतो. ‘ताम्रपटातील प्राचीन नासिक’ हा ग्रंथ अशा 32 ताम्रपटांच्या साक्षीने विस्मृतीत गेलेल्या इतिहासाचा शोध घेणारा संशोधनात्मक प्रयत्न आहे. ताम्रपटांवरील अक्षरे केवळ राजाज्ञा किंवा भूमिदानाच्या नोंदी नाहीत; ती नाशिकच्या प्राचीन अस्तित्वाची,आणि विकसित संस्कृतीची ऐतिहासिक साक्ष आहेत. नाशिकचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर लेण्यांतील शिलालेख आणि ताम्रपटांवरील अक्षरेही वाचावी लागतील.
(लेखक पुरातत्त्व आणि नाशिक विषयाचे अभ्यासक आहेत.)

Ancient Nashik in copperplate

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *