चहाच्या पिशव्यांमधून सूक्ष्म प्लास्टिकचे कण!

– डॉ. किशोर पवार

उकळत्या पाण्यात केवळ तीन मिनिटे ठेवलेल्या चहाच्या पिशवीतून (टी बॅग) सुमारे अडीच हजार सूक्ष्म प्लास्टिक कण बाहेर पडत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. परंतु हे आपल्या लक्षातही येत नाही. कारण प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण आपल्याला दिसत नाहीत.
चहा हे जगभरातील कोट्यवधी लोकांचे आवडते पेय आहे. चहा बनविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या टी-बॅगमुळे वेळ आणि श्रम वाचतात. मात्र, याच टी-बॅगमधून गरम चहामध्ये सूक्ष्म प्लास्टिकचे कण मिसळत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. तुर्कीमधील रेचेप तय्यिप एर्दोगान विद्यापीठातील संशोधकांनी बाजारात उपलब्ध असलेल्या टी-बॅगचा अभ्यास केला. सुमारे 95 अंश सेल्सिअस तापमानाच्या 150 मिलिलिटर गरम पाण्यात टी-बॅग तीन मिनिटे ठेवण्यात आली. त्यानंतर पाण्याचे विश्लेषण केले असता एका टी-बॅगमधून 555 ते 2498 सूक्ष्म प्लास्टिक कण बाहेर पडल्याचे आढळले.
हे संशोधन 13 ऑक्टोबर 2026 रोजी ’एनपीजी सायन्स ऑफ फुड’ या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले. या अभ्यासात14 ब्रँडच्या टी-बॅग आणि 14 ब्रँडच्या सुट्या चहाच्या नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. सूक्ष्म प्लास्टिक कण ओळखण्यासाठी -ढठ-ऋढखठ या तंत्राचा वापर करण्यात आला. तसेच बीपीए आणि प्लास्टिक मऊ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रसायनांचे विश्लेषण करण्यात आले. अभ्यासात टी-बॅगमधून बाहेर पडणारे प्लास्टिकचे कण प्रामुख्याने पॉलिअमाइड म्हणजेच नायलॉनचे असल्याचे आढळले. गरम पाण्याच्या संपर्कामुळे टी-बॅगच्या पृष्ठभागावरील प्लास्टिकचे तंतू सुटून पाण्यात मिसळत असल्याचे संशोधकांचे निरीक्षण आहे. सुट्या चहाच्या नमुन्यांमध्येही सूक्ष्म प्लास्टिक आढळले; मात्र त्याचे प्रमाण तुलनेने कमी होते.
प्लास्टिक कणांबरोबर रासायनिक पदार्थही
या संशोधनात चहामध्ये बिस्फेनॉल ए (बीपीए) आणि फ्थॅलेट्स या रासायनिक पदार्थांचे अस्तित्वही तपासण्यात आले. इझअ काही प्लास्टिक उत्पादनांमध्ये वापरले जाते. त्याचा मानवी शरीरातील संप्रेरकांच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. फ्थॅलेट्सचा वापर प्लास्टिक अधिक लवचिक करण्यासाठी केला जातो. या रसायनांचा दीर्घकाळ संपर्क प्रजननक्षमता आणि संप्रेरकांच्या संतुलनावर परिणाम करू शकतो, अशी शास्त्रज्ञांना चिंता आहे.
मात्र, या संशोधनावरून टी-बॅगमधील चहा प्यायल्याने निश्चितच आजार होतात, असा निष्कर्ष काढता येत नाही. मानवी आरोग्यावर होणारे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.
आरोग्याच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी?
सूक्ष्म प्लास्टिक म्हणजे पाच मिलिमीटरपेक्षा लहान आकाराचे प्लास्टिकचे कण. त्याहूनही लहान कणांना नॅनोप्लास्टिक म्हणतात. अन्न, पाणी आणि हवेतून हे कण मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. मात्र, त्यांचे दीर्घकालीन परिणाम अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाहीत. यापूर्वी 2019 मध्ये कॅनडातील मॅकगिल विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात प्लास्टिकच्या एका टी-बॅगमधून गरम पाण्यात अब्जावधी सूक्ष्म आणि नॅनोप्लास्टिक कण बाहेर पडत असल्याचे नोंदवले होते.
प्लास्टिकचा संपर्क कमी करण्यासाठी सुट्या चहाचा वापर करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. चहा तयार करण्यासाठी स्टेनलेस स्टील किंवा सिरॅमिकच्या गाळणीचा वापर करता येतो. टी-बॅग खरेदी करताना त्यातील घटकांची माहिती वाचणे आवश्यक आहे. काही कागदी टी-बॅगमध्येही जोडणीसाठी प्लास्टिक वापरलेले असू शकते. चहा पिण्याची सवय सोडण्याची आवश्यकता नाही. मात्र, चहा तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या साधनांच्या रचनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर आणि त्यातून होणारा सूक्ष्म प्लास्टिकचा संपर्क कमी करण्यासाठी अशा संशोधनांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.

Microplastic particles from tea bags!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *