मुंबई : विशेष प्रतिनिधी
ब्रिटनचे भावी राजे, त्यांच्या मागे बसलेल्या राजकन्या आणि दिमतीला चक्क भारतीय बनावटीची ऑटोरिक्षा! ना आलिशान रोल्स रॉइस, ना मर्सिडीजचा थाट… मुंबईत ब्रिटनचे युवराज प्रिन्स विल्यम यांनी चक्क महिंद्राच्या इलेक्ट्रिक रिक्षाचे स्टिअरिंग हाती घेतले आणि पत्नी प्रिन्सेस केट यांना फेरफटका मारला. विशेष म्हणजे, प्रिन्सच्या या राजेशाही सफरीने चर्चेत आलेल्या महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटी कंपनीने त्याच दिवशी ( मंगळवारी) प्रतिष्ठेचा तब्बल दहा लाख पौंड अर्थात 12 कोटी 34 लाख रुपयांचा ‘अर्थशॉट प्राइज 2026’ पटकावला. पर्यावरणपूरक वाहतुकीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मिळालेल्या या जागतिक सन्मानामुळे भारतीय इलेक्ट्रिक रिक्षेची कीर्ती जगभर पोहोचली!
मंगळवारी (दि. 17) मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन गार्डन परिसरात हा अनोखा प्रसंग घडला. निमित्त होते, प्रिन्स विल्यम यांनी स्थापन केलेल्या ‘अर्थशॉट प्राइज’ या जागतिक पर्यावरण पुरस्कार सोहळ्याचे. अंतिम फेरीतील स्पर्धकांच्या भेटीदरम्यान महिंद्राची ‘उडो’ इलेक्ट्रिक रिक्षा पाहून विल्यम यांनी स्वतःच चालकाची जागा घेतली. प्रिन्सेस केट मागील आसनावर बसल्या आणि राजेशाही रिक्षासफर सुरू झाली. पार्श्वभूमीला वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि समोर राजघराण्यातील जोडप्याची रिक्षासफर… हा क्षण कॅमेर्यांत टिपला गेला.
रिक्षा चालवून झाल्यावर विल्यम यांनी महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन मिश्रा यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. “खूप मजा आली! रिक्षा अतिशय शांत आहे आणि चालवायलाही सोपी आहे,” अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. त्यानंतर “काळजी करू नका, मी तुमच्या रिक्षेला अपघात केलेला नाही!” असे म्हणत त्यांनी हास्याची खसखस पिकवली. आणखी लांब रस्ता मिळाला असता, तर रिक्षेचा कमाल वेगही आजमावून पाहिला असता, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. प्रिन्सेस केट यांनीही मागील आसन अतिशय आरामदायी असल्याचे सांगितले.
या राजेशाही सफरीवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही एक्सवर मिश्कील प्रतिक्रिया दिली. “एक राजपुत्र, एक राजकन्या आणि एक उडणारे यंत्र! जवळपास तसेच! पण महिंद्राची ‘उडो’ असेल, तर उडण्यासाठी पंखांची गरजच काय?” अशी पोस्ट त्यांनी केली. हिंदीतील ‘उडणे’ या शब्दावरून रिक्षेला ‘उडो’ हे नाव देण्यात आले आहे. विमानाच्या रचनेपासून प्रेरणा घेतलेल्या या वाहनाला कंपनीने ‘ऑटोप्लेन’ असे संबोधले आहे. त्यामुळे आनंद महिंद्रा यांच्या शब्दखेळालाही वेगळीच रंगत आली.
महिंद्राने आतापर्यंत चार लाखांहून अधिक इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहने विकली असून, या वाहनांनी 900 कोटी किलोमीटरहून अधिक प्रवास केला आहे. त्यातून सुमारे एक लाख 85 हजार मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन टाळण्यास मदत झाली आहे. पुरस्कारातून मिळणारा निधी महिला रिक्षाचालकांचे प्रशिक्षण, परवडणारा वित्तपुरवठा, चार्जिंग सुविधांचा विस्तार आणि इलेक्ट्रिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
राजपुत्राच्या हातात भारतीय रिक्षाचे स्टिअरिंग आले आणि त्याच दिवशी भारतीय कंपनीच्या शिरपेचात जागतिक सन्मानाचा तुरा खोवला गेला. प्रिन्सला ‘उडो’ची सफर भावली अन् महिंद्राच्या इलेक्ट्रिक रिक्षेने जागतिक व्यासपीठावर भरारी घेतली!
Mahindra ‘Udo’, driven by Prince, wins Earthshot Prize