नाशिकमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा रुग्णांचे हाल

रक्तदान शिबिरांचे आयोजन करा

नाशिक : प्रतिनिधी
शहरात सध्या सण-उत्सवांचा काळ, महाविद्यालयांच्या सुट्ट्या आणि डेंग्यू, मलेरिया व व्हायरल तापाच्या वाढत्या रुग्णांमुळे रक्तदानाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. परिणामी, शहरातील सरकारी व खासगी रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा अत्यंत कमी पातळीवर पोहोचला असून, विशेषतः ओ पॉझिटिव्ह, ए पॉझिटिव्ह आणि सर्व प्रकारच्या निगेटिव्ह रक्तगटांची मोठी कमतरता भासत आहे.
सध्या आजारी पडल्यामुळे किंवा औषधोपचार सुरू असल्यामुळे अनेक नियमित रक्तदाते रक्तदान करू शकत नाहीत. तसेच, महाविद्यालये बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर होणारी शिबिरेही मंदावली आहेत. त्यामुळे दैनंदिन मागणी आणि प्रत्यक्ष संकलन यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका अपघातग्रस्त रुग्ण, थॅलेसेमियाग्रस्त बालके, प्रसूतीदरम्यानच्या महिला आणि मोठ्या शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना बसत असून, त्यांच्या नातेवाइकांना एका रक्तपेढीकडून दुसर्‍या रक्तपेढीकडे धावपळ करावी लागत आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी निरोगी नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता जवळच्या रक्तपेढीत जाऊन स्वयंप्रेरणेने रक्तदान करावे, तसेच शहरातील सामाजिक संस्था, गणेश मंडळे, राजकीय पक्ष, महाविद्यालये आणि औद्योगिक कंपन्यांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे कळकळीचे आवाहन जनकल्याण रक्तकेंद्राचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी आणि कार्यवाह शैलेश पंडित यांनी केले आहे. रक्तदान शिबिरांच्या आयोजनासाठी 9011156973 किंवा 7774077900 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Severe blood shortage in Nashik, plight of patients

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *