हरवत चाललेली नात्यांची श्रीमंती!

घरं मोठी झाली, पण मनं छोटी

कपडो की मॅचिंग बिठाने से सिर्फ शरीर सुंदर दिखेगा… रिश्तो व हालातो से मॅचिंग बिठा लीजिए पुरा जीवन सुंदर हो जायेगा..
दिवाळी येते आणि खूप आनंद, उत्साह देऊन जाते आणि त्यात नातेवाईक सामील झाले की सोन्याहून पिवळे.
आता आतापर्यंत बहिणी, भाऊ, जेठ, जावा, त्यांची मुलं-मुली, जावई, सुना, नातेवाइकांची खूप मोठी सोन्याची खाण असायची.
खरंच अशी सर्व नाती असणं म्हणजे नशीबवानच समजलं पाहिजे.
भाऊ-बहीण, जावा-जावा, नणंद-भावजय, मावशी -मावसा, मामा-मामी ही नाती मला वाटतं कालांतराने मिटणार. बदलत्या काळानुसार एकच मूल किंवा दोघे असतील तर एक भाऊ-एक बहीण असेल तर ठीक आहे, नाहीतर या सणांचं महत्त्व कमी होत जाणार. नाही तरी आजकाल कोणतेही नातेसंबंध हे कमीच होत चालले आहेत. स्वतःपुरता मर्यादित आणि जी नाती आहेत ती पण व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, फोन कॉलमुळे टिकून आहेत, हे नशीबच.
फार पूर्वी नाही, अगदी काही वर्षांपूर्वीच परिवारात जेवढ्या जास्त व्यक्ती तेवढी जास्त शक्ती परिवारातल्या व्यक्तींमध्ये दिसून यायची. विश्वास असला की आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढला की शक्ती वाढते.
एकमेकांना सांभाळून घेण्याची शक्ती म्हणजेच सामावून घेण्याची शक्ती परिवारात दिसायची. तडजोड करण्याची शक्ती असली की, सोबत सहनशक्ती वाढण्यास नक्कीच मदत व्हायची. सर्वांनी मिळून घेतलेला निर्णय, ज्यामुळे अनुभवातून निर्णय घेण्याची शक्ती वाढायची, मग ताणतणाव कमी असायचा… खूप जणांचं येणं-जाणं असायचं. त्यामुळे चांगल्या -वाईट गुणांमधून परखण्याची शक्ती वाढायची. त्यामुळे ताण कमी असायचा. कारण प्रेमाच्या भावना उच्च असायच्या….प्रेम आलं की अर्धे प्रश्न संपतात…आणि आता प्रेमच जरा कमी पडत चाललं आहे. स्वार्थी प्रेम, कामापुरतं प्रेम, मग कोणतंही नात असो!! याचा शरीरावर परिणाम होतोय हे जर समजलं तर नक्कीच प्रेमाच्या भावना उंचावतील आणि नाती जवळ येतील, मात्र हे आजकाल समजण्याच्या पलीकडे झालेलं आहे. त्यामुळे घरं मोठी आणि मनं छोटी झाल्यामुळे डॉक्टरांकडच्या फेर्‍या
वाढल्या आहेत.
ज्याला समजेल तो सुधरेल… पूर्वी एक गाव एका कुटुंबासारखं राहायचं, मग एकत्र कुटुंबपद्धत आली, मग चाळ सिस्टिम, हम दो हमारे दो, हम दो हमारा एक, आता नुसतं हम दो किंवा लिव्ह इन रिलेशनशिप. टिकलं तर टिकलं नाही तर तुटलं. विश्वासच नाही मग
आत्मविश्वास कुठून येणार! म्हणून मनोरुग्णालय भरगच्च भरलेली दिसतात. नवीन पद्धतीप्रमाणे तर बरेच जण लग्नच करत नाहीत. एकटं राहूनही योग्य विचारसरणी नसल्यामुळे आत्मिक शक्ती कमी कमी होत आहे आणि नको तेवढे शारीरिक आणि मानसिक रोग वाढत आहेत. नवीन जनरेशन नवीन विचार! आपणही बदललं पाहिजे नाही!
कारण शिकवलेलं या पिढीला चालतच नाही. पूर्वी चार पावसाळे खाल्लेल्या व्यक्तीला महत्त्व असायचं. आता या व्यक्तींना जुन्या विचारांचं समजलं जातं.
कारण आता गुगलचा काळ आहे. तो सांगेल ते बरोबर. मात्र प्रेम, सुख, शांती, आनंद हे गुगलवर मिळवता येत नाही हे कोण बरं सांगेल या नवीन पिढीला. एकमेकांना या गोष्टी देऊन नाती टिकवली पाहिजेत, हेच तर दिवाळी सांगत असते (हक्काची जागा आता इगोने घेतली आहे… स्वार्थापोटी प्रेम केलं जातं याचं दुःख) जो नात्यातली पवित्रता समजला त्याचीच खरी दिवाळी!

The fading richness of relationships!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *