पंजाबच्या निर्णयाअभावी रखडला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार?

सर्व मंत्र्यांसोबत साडेतीन तास मंथनानंतर मोदी-शहा-नितीन नवीन यांच्यात दीड तास बैठक

नवी दिल्ली । प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. बुधवारी, मोदी यांनी प्रथम भारत मंडपम येथे संपूर्ण मंत्रिपरिषदेची साडेतीन तास बैठक घेतली. त्यानंतर रात्री त्यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि संघटन महामंत्री बी. एल. संतोष यांच्यासोबत सुमारे दीड तास हायलेव्हल बैठक झाली. या दोन बैठकांमुळे दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या अटकळींना पुन्हा उधाण आले आहे. मात्र, सरकारकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. विशेष म्हणजे, पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी अकाली दलासोबत युती करायची की नाही, याचा निर्णय होईपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
बुधवारच्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मोदी यांनी मंत्र्यांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड घेतले. सप्टेंबरमधील चिंतन शिबिरात दिलेली उद्दिष्टे किती पूर्ण झाली, याचा आढावा घेतला. गरिबी निर्मूलन, नक्षलमुक्त भारत आणि जनधनद्वारे आर्थिक सक्षमीकरण यावर तीन सादरीकरणे झाली. गृह, वित्त यासह 11 मंत्रालयांच्या सचिवांनी सादरीकरणे केली. मोदी यांनी योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. त्यानंतर रात्रीच्या बैठकीत आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका, संसदेचे विशेष अधिवेशन, मध्य प्रदेशातील राजकीय स्थिती आणि मंत्रिमंडळ विस्तारावर मंथन झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्रिपरिषदेत 13 जागा रिकाम्या
सध्या मंत्रिपरिषदेत 68 सदस्य आहेत आणि 13 जागा रिकाम्या आहेत. जून ते ऑक्टोबर दरम्यान 4 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे, पूर्णवेळ शिक्षणमंत्री अद्याप नेमलेला नाही. पंजाबचे मंत्रिमंडळात सध्या प्रतिनिधित्व नाही. रवनीत बिट्टू यांचा राज्यसभा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. त्यामुळे पंजाबमधील नेत्यांना, मग ते भाजपचे असोत किंवा अकाली दलाचे, मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Has the Union Cabinet expansion been stalled due to the lack of a decision from Punjab?

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *