जिल्हात 1,177 ठिकाणी होणार नविन आपले सरकार सेवा केंद्रे

नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात ग्रामपंचायत क्षेत्रात 1,159, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात 18 ठिकाणी नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू शाखेने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. 18 नोव्हेंबरपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, 17 डिसेंबर 2026 रोजी सायंकाळी सहापर्यंत संबंधित तहसील कार्यालयात अर्ज सादर करता
येणार आहेत.
शासनाच्या 27 मार्च 2025 च्या निर्णयानुसार 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारे आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात पाच हजार लोकसंख्येपर्यंत दोन केंद्रे, तर पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असल्यास चार केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. नगर परिषद आणि महापालिका क्षेत्रात प्रत्येक दहा हजार लोकसंख्येमागे दोन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या निकषांनुसार सध्या कार्यरत केंद्रांची संख्या वजा करून रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर 18 ते 28 डिसेंबरदरम्यान तहसील कार्यालयांकडून अर्जांची छाननी करून तपासणी सूचीसह प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू शाखेकडे पाठविण्यात येणार आहेत. प्राप्त अर्जांची माहिती 1 जानेवारी 2027 रोजी जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 8 जानेवारीला पात्र व अपात्र अर्जदारांची प्रारूप यादी आणि गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर 8 ते 13 जानेवारीदरम्यान हरकती मागविण्यात येतील.
दरम्यान, रिक्त जागांच्या तुलनेत अधिक अर्ज प्राप्त झाल्यास पात्र अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

तालुकानिहाय केंद्रे
बागलाण-99, चांदवड-61, देवळा-29, मालेगाव-94, नांदगाव-68, निफाड-100, येवला-71, नाशिक-54, सिन्नर-87, कळवण-77, दिंडोरी-97, पेठ-64, सुरगाणा-78, इगतपुरी-64, त्र्यंबकेश्वर-76, मालेगाव शहर- 18. एकूण : 1,177

अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक
तपशील                                        तारीख
जाहिरात प्रसिद्ध                   17 नोव्हेंबर 2026
अर्ज स्वीकारणे                    18 नोव्हें. ते 17 डिसें. 2026
अर्जांची छाननी                   18 ते 28 डिसेंबर 2026
प्राप्त अर्जांची माहिती         1 जानेवारी 2027
प्रारूप पात्र-अपात्र यादी       8 जानेवारी 2027
हरकती दाखल करणे          8 ते 13 जानेवारी 2027

 

 

New ‘Aaple Sarkar’ Service Centres to be set up at 1,177 locations in the district

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *