सिंहस्थासाठी साधुग्राममध्ये पंधराशे एकरमध्ये काम होणार
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील साधुग्राममध्ये विविध आखाडे, साधू-महंत, धार्मिक संस्था, तसेच भाविकांच्या निवास व इतर आवश्यक सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान, सिंहस्थात पंधराशे एकरातील साधुग्राम परिसर स्वच्छ, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी तात्पुरत्या ड्रेनेज व्यवस्थेसह पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांचे काम केले जाणार आहे. याकरिता 370 कोटींचा खर्च आहे. महासभेने शुक्रवारी (दि.20) या खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
ड्रेनेज व्यवस्थेसाठी 206 कोटी, तर जलवाहिन्यांसाठी 166 कोटी, असा एकूण 372 कोटींचा खर्च लागणार आहे. साधुग्राममध्ये निर्माण होणार्या सांडपाण्याची योग्य व शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रभावी मलनिस्सारण व्यवस्था उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत साधुग्राम परिसर स्वच्छ, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी तात्पुरती ड्रेनेज व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. तपोवन येथील साधुग्राम परिसराचा वापर कुंभमेळ्याच्या कालावधीत तात्पुरत्या निवास व इतर धार्मिक आणि सार्वजनिक सुविधांसाठी करण्यात येणार आहे. या ठिकाणी उभारण्यात येणार्या तात्पुरत्या स्वच्छतागृहांमधून, स्नानगृहांमधून, तसेच अन्य वापरातून निर्माण होणारे सांडपाणी सुरक्षितपणे गोळा करून त्याची योग्य ठिकाणी वाहतूक व विल्हेवाट लावण्याकरिता पाइपद्वारे सांडपाणी गोळा करण्यात येईल. यासाठी साधुग्राम परिसरातील आवश्यकतेनुसार अंतर्गत मलवाहिन्या, जोडवाहिन्या, चेंबर्स (मॅनहोल), सांडपाणी संकलन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. यासोबतच साधुग्राममध्ये पाणीपुरवठ्याच्या वाहिन्यांचे जाळे विस्तारले जाणार आहे. यात भाविक मार्गावरील पाणी साठवण टाकीची तरतूद आवश्यकतेनुसार करण्यात येणार आहे.
चोवीस तास पाणी
साधुग्राममध्ये 24 तास आखाड्यांसह भाविकांना पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. याकरिता पाणीपुरवठा विभाग गेल्या वर्षभरापासून आराखडा तयार करण्याचे काम करत आहे. दरम्यान, महासभेने ड्रेनेज व पाणीपुरवठ्याच्या कामाला मंजुरी दिली असली, तरी साधुग्राममधील भूसंपादन अद्याप झालेले नसल्याचे चित्र आहे.
Approval granted for Rs 370 crore expenditure on drainage and water supply