67 कोटींचा आराखडा; निर्माल्यापासून खतनिर्मिती, प्लास्टिकमुक्त कुंभमेळ्याचे उद्दिष्ट
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांची गर्दी, त्यातून निर्माण होणारा कचरा आणि सार्वजनिक स्वच्छतेचे आव्हान लक्षात घेता नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी तंत्रज्ञानाधारित स्वच्छता व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. कुंभनगरी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी 67 कोटींंपेक्षा अधिक खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वच्छतेच्या प्रत्येक टप्प्यावर माहिती व तंत्रज्ञान प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. स्वच्छतागृहांची स्थिती, कचरा संकलन आणि स्वच्छता कर्मचार्यांच्या कामकाजाचे थेट निरीक्षण करण्याची सुविधा या व्यवस्थेत असेल.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील घाट, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच भाविकांच्या वर्दळीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केवळ कचरा उचलण्यापुरती व्यवस्था न ठेवता त्याचे वर्गीकरण, संकलन, प्रक्रिया आणि विल्हेवाट यांची साखळी विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. मुख्य नियंत्रण कक्षातून संपूर्ण स्वच्छता व्यवस्थेवर लक्ष ठेवले जाईल. एखाद्या ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास किंवा स्वच्छतागृहांची देखभाल न झाल्यास तातडीने संबंधित यंत्रणेला सूचना देऊन कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.
गोदावरी घाट आणि त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधींमधून मोठ्या प्रमाणात निर्माल्य व फुलकचरा जमा होतो. या कचर्याचे स्वतंत्र संकलन करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यापासून खतनिर्मिती, तसेच अन्य उपयुक्त वस्तू तयार करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे धार्मिक कचर्याची नदीत किंवा परिसरात विल्हेवाट लावण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करता येईल. गोदावरी नदीचे पावित्र्य आणि पर्यावरणाचे संरक्षण हा या व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग असेल.
कुंभमेळा परिसर एकदा वापरल्या जाणार्या प्लास्टिकपासून मुक्त ठेवण्याचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आले आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांचे स्वतंत्र संकलन करून त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. प्लास्टिकला पर्यावरणपूरक पर्याय वापरण्यास प्रोत्साहन दिले जाईल. रस्ते आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जाणार आहे. याशिवाय दिव्यांग भाविकांसाठी विशेष सुविधांनी युक्त पोर्टेबल स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरणासाठी संपूर्ण मेळाक्षेत्रात वॉश प्रणाली कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
स्वच्छतेसाठी डिजिटल नियंत्रण
स्वच्छतागृहांची स्थिती, कचरा संकलन आणि विल्हेवाट यावर माहिती व तंत्रज्ञान प्रणालीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. स्वच्छता कर्मचार्यांच्या कामकाजाची नोंद ठेवण्यासह तक्रारींचे तातडीने निराकरण केले जाईल. मुख्य नियंत्रण कक्षातून संपूर्ण स्वच्छता व्यवस्थेचे थेट निरीक्षण होणार आहे.
निर्माल्यापासून खतनिर्मिती
गोदा घाट आणि त्र्यंबक परिसरातील निर्माल्याचे स्वतंत्र संकलन करून त्यापासून खत, उपयुक्त वस्तू तयार केल्या जाणार आहेत. पुनर्वापर न होणार्या प्लास्टिकवर बंदी, बाटल्यांचे पुनर्प्रक्रियेसाठी संकलन, दिव्यांगांसाठी विशेष स्वच्छतागृहे आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीद्वारे चोवीस तास स्वच्छता राखण्याचे नियोजन आहे.
Technology keeps an eye on cleanliness in the Kumbh Mela city