मायदेशाची ओढ

बांगलादेशात कधी काय घडेल, याचा नेम नाही. भारतात आश्रयास आलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली असून, डिसेंबरमध्येच त्या आपल्या देशात जाऊ इच्छित आहेत. बांगलादेशात बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीची (बीएनपी) सत्ता आहे. हा पक्ष कट्टरपंथीय आणि हिंदूविरोधी आहे. या पक्षाची पाकिस्तानशी जवळीक आहे. हसीना यांच्या बांगलादेश अवामी लीग या पक्षाच्या विरोधातील बीएनपी पक्षाच्या नेत्या खालेदा झिया यांचे 30 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यांचे पुत्र तारिक रहमान सध्या पंतप्रधान आहेत. हसीना भारतात आल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या हंगामी सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाची स्थापना करण्यात आली. या लवादाने हसीना यांना अनेक गुन्ह्यांत दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. हंगामी सरकारने घेतलेल्या निवडणुकांत हसीना यांच्या अवामी लीगवर बंदी होती. त्यामुळे बीएनपीचा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. हंगामी सरकारच्या काळात हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या घटनाही घडल्या. हसीना यांनी बांगलादेशात जाण्याची तयारी केली असताना, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते उत्साहित झाले असून, त्यांना ऊर्जा मिळाल्याचे दिसते. अवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी बंद असलेल्या पक्ष कार्यालयांचे कुलूप तोडून पुन्हा ताबा घेतला. त्यामुळे बांगलादेशातील राजकीय वातावरण तापले आहे. शेख हसीना सत्तेतून पायउतार झाल्यानंतर ऑगस्ट 2024 पासून ही कार्यालये बंद होती. पक्ष कार्यालयावर बांगलादेशचा राष्ट्रध्वज आणि पक्षाचा ध्वज फडकावल्यानंतर कार्यालयात बैठक घेऊन कार्यकर्त्यांनी बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या समाधिस्थळाकडे मोर्चा वळवला. हसीना यांना पुन्हा बांगलादेशात आणण्यासाठी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रहमान यांच्या सरकारने अवामी लीगच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. आंदोलकांकडून राजकीय नेत्यांची निवासस्थाने आणि पक्ष कार्यालयांना लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायूँ कबीर यांच्या सिल्हेट येथील निवासस्थानाला आग लावण्यात आली. हसीना यांच्या विरोधात 2025 साली बीएनपी कार्यकर्त्यांनी जसे आंदोलन केले होते, तसे आंदोलन अवामी लीगचे कार्यकर्ते करत आहेत. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये बांगलादेशात विद्यार्थी व नागरिकांनी हसीना सरकारविरोधात मोठे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर आणि आंदोलकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे कूच केल्यानंतर त्यांनी पदत्याग करून भारतात आश्रय घेतला होता. सध्या बांगलादेशात धोका असतानाही त्यांनी स्वतःहून मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. खटल्यांना सामोरे जाण्यासाठी आणि आपल्या अवामी लीग पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी त्यांना परत जायचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेश लष्कराच्या विमानाने
हसीना भारतात आल्या होत्या. त्याचप्रमाणे बांगलादेश लष्करानेच दिल्लीला विमान पाठवून किंवा सीमेवर येऊन त्यांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घ्यावी, अशी अट भारताने घातली आहे. बांगलादेशात परतल्यानंतर त्यांना फाशीच्या शिक्षेविरोधात अपील करण्याची आणि त्यांच्यावर नव्याने निष्पक्ष खटला चालवण्याची हमी दिली जावी, अशी दुसरी अट भारताने घातली आहे. हसीना यांचे प्रत्यार्पण हा एक कायदेशीर आणि तांत्रिक विषय असून, त्यावर नियमानुसारच कार्यवाही केली जाईल, ही भारताची भूमिका आहे. दुसरीकडे, भारताने अटी घातल्या नसल्याचा दावा बांगलादेशच्या परराष्ट्र राज्यमंत्री शमा ओबेद इस्लाम यांनी केला आहे. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे सल्लागार जाहेद उर रहमान यांनी बांगलादेश अटी स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. बांगलादेश एक सार्वभौम देश असून, तो कोणत्याही अयोग्य अटी स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. हसीना यांच्या सुरक्षेची भारताला चिंता असली, तरी त्या देशातील सरकारची भूमिका वेगळी असल्याचे दिसते. शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्यावरून बांगलादेशात रणकंदन माजले आहे. अवामी लीगचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बांगलादेशच्या निर्मितीत ज्या पक्षाचे योगदान आहे, त्या अवामी लीगला निवडणुकांपासून दूर ठेवून सत्तेवर आलेला बीएनपी पक्ष हसीना यांचे काय करेल, याचा नेम नाही. याचमुळे अवामी लीगच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरत चालला आहे. काहीही झाले तरी मायदेशात परतणार, हा हसीना यांचा निर्धार अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरत आहे. त्या परतल्यावर आपले सरकार जाण्याची भीती बीएनपीचे तारिक रहमान यांना वाटत असावी, म्हणूनच भारत सरकारच्या अटी मान्य नसल्याचे परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी म्हटल्याचे स्पष्ट दिसते. मायदेशी परतल्यानंतर हसीना यांना मृत्युदंड देण्यात येईल, असे सांगितले जात असल्याने आंदोलन तीव्र होत आहे. बांगलादेशातील असंतोष आणि अस्वस्थता आणखी वाढविणारे हे ठरेल. कापड उद्योगातील कामगारांचा संप सुरू असतानाच आता अवामी लीगचे कार्यकर्ते रस्त्यावर येत आहेत. हसीना यांची इच्छा मायदेशी परतण्याची
असून, त्या मायदेशी सुरक्षित जाव्यात आणि मायदेशातही सुरक्षित असल्या पाहिजेत, यावर भारताचे विशेष लक्ष आहे. हसीना यांच्या विरोधातील संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेवर आंतरराष्ट्रीय समुदाय आणि जागतिक माध्यमांचे लक्ष राहावे, अशीही भारताची भूमिका आहे. हसीना यांनी 9 नोव्हेंबर रोजी नवीन पासपोर्ट आणि प्रवास दस्तऐवजांसाठी अर्ज केला होता. भारतात आल्यानंतर बांगलादेश सरकारशी त्यांनी केलेला हा पहिला अधिकृत संपर्क आहे. मात्र, ढाक्याकडून त्यांच्या अर्जाला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. बांगलादेशात परतल्यास अटक, तुरुंगवास किंवा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे हसीना यांनाही वाटत आहे. अटक होऊ शकते, तुरुंगात पाठवले जाऊ शकते किंवा माझा जीवही घेतला जाऊ शकतो, पण मी घाबरून मागे हटणार्‍यांपैकी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 1981 साली मायदेशी परतण्यापूर्वी हसीना भारतात नवी दिल्लीत आश्रयाला होत्या. 15 ऑगस्ट 1975 रोजी बांगलादेशातील लष्करी बंडात शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान आणि संपूर्ण कुटुंबाची हत्या झाली. त्यावेळी हसीना, त्यांचे पती आणि बहीण शेख रेहाना पश्चिम जर्मनीत असल्याने बचावले. या घटनेनंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना राजकीय आश्रय दिला. हसीना यांनी 1975 ते 1981 अशी सहा वर्षे नवी दिल्लीत ओळख गुप्त ठेवून वास्तव्य केले.

Homeland

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *