अगर मौका मिला कभी तो कागज पर अपनी थकान लिखूंगी… मजबूत कंधों के पीछे छुपा छोटा सा इंसान लिखूंगी…
या ओळी वाचताना मन नकळत थबकते. कारण त्या केवळ एका स्त्रीच्या भावना नसून, आजच्या असंख्य स्त्रियांच्या मनात दडलेल्या न बोललेल्या वेदनांचा आवाज आहेत. घर, संसार, नाती, मुलं आणि कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी सांभाळताना
स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी धडपडणार्या स्त्रीच्या वाट्याला विश्रांतीचे क्षण किती येतात, हा खरा प्रश्न आहे.
आपल्या धार्मिक परंपरेनुसार वर्षभर अनेक सण-समारंभ साजरे केले जातात. नुकतीच दिवाळी संपली. घराघरांत दिव्यांची रोषणाई झाली, अंगणात सुंदर रांगोळ्या सजल्या, आकाशकंदील झळकले. फराळाच्या सुगंधाने घराचा कानाकोपरा दरवळला. वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस उत्साहात साजरा झाला. मात्र, या आनंदसोहळ्यामागे घरातील एका व्यक्तीचे कष्ट अनेकदा दुर्लक्षित राहतात. ती म्हणजे घरची ‘गृहलक्ष्मी’!
घराची साफसफाई, सजावट, रंगरंगोटी, फराळाची तयारी, खरेदी, पूजा, पाहुण्यांचे स्वागत, नातेवाइकांचा मानसन्मान अशा असंख्य जबाबदार्या ती पार पाडत असते. घरातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपत सणाचा गोडवा वाढवताना स्वतःच्या थकव्याकडे मात्र तिचे दुर्लक्ष होते. स्वतःच्या आरोग्यापेक्षा कुटुंबाचा आनंद तिला अधिक महत्त्वाचा वाटतो.
पण या सगळ्या धावपळीनंतर तिच्या मनाला एकच ओढ लागलेली असते, ती म्हणजे माहेरी जाण्याची!
कारण माहेर म्हणजे केवळ आई-वडिलांचे घर नसते, तर बालपणीच्या आठवणींचा खजिना असतो. आईच्या मायेचा पदर, वडिलांचा डोक्यावरून फिरणारा प्रेमळ हात, भावंडांशी केलेली भांडणे, रुसवे-फुगवे, मनसोक्त गप्पा आणि अंगणात साठलेल्या असंख्य आठवणी म्हणजे तिच्यासाठी अनमोल ठेवा असतो.
लग्नानंतर स्त्रीचे आयुष्य बदलते. घर, नाव, आडनाव आणि जबाबदार्या बदलतात. पत्नी, सून, आई, वहिनी अशा अनेक भूमिका निभावताना तिच्यातली ‘ती’ अनेकदा जबाबदार्यांच्या गर्दीत हरवून जाते. या हरवलेल्या स्वतःला पुन्हा भेटण्याचे ठिकाण
म्हणजे माहेर!
माहेरी गेल्यावर वेळेचे बंधन नसते. सकाळी उशिरा उठले तरी कुणी रागावत नाही. सासरी सगळ्यांची काळजी घेणार्या तिची काळजी माहेरी घेतली जाते. सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवणार्या तिला तिच्या आवडीचे पदार्थ प्रेमाने खाऊ घातले जातात. दमली असशील, थोडा आराम कर, हे आईचे दोन शब्दही तिचा थकवा दूर करतात. आईच्या हातचा चहा, वडिलांसोबत निवांत संवाद आणि भावंडांसोबतच्या गप्पा तिला पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देतात. दोन दिवस माहेरी राहून आल्यानंतर ती पुन्हा नव्या उत्साहाने संसाराच्या जबाबदार्या स्वीकारते.
मात्र, प्रत्येक स्त्रीच्या नशिबी माहेरचा हा विसावा असतोच असे नाही. काहींचे आई-वडील काळाच्या पडद्याआड गेलेले असतात, काहींची भावंडे परदेशात स्थायिक झालेली असतात, तर काहींना कौटुंबिक परिस्थितीमुळे माहेरी जाणे शक्य होत नाही. काहींचे माहेरचे घरही काळाच्या ओघात बंद झालेले असते. त्यामुळे माहेर असलेल्या प्रत्येक स्त्रीने या नात्यांची जपणूक करणे गरजेचे आहे. आई-वडिलांनीही मुलगी संसारात रमली असली तरी माहेरच्या घरात तिच्यासाठी कायम जागा आहे, ही जाणीव
करून द्यावी.
त्याचबरोबर सासरच्या मंडळींनीही तिच्या माहेरच्या ओढीचा आदर करायला हवा. माहेरी जाणे म्हणजे जबाबदार्यांपासून पळ काढणे नव्हे, तर भावनिक उभारी मिळवण्याचा तो एक मार्ग आहे. ज्यांना माहेरचा आधार नाही, अशा स्त्रियांच्या वाट्याला सासरी तरी प्रेम, आपुलकी आणि विश्रांतीचे क्षण यायला हवेत. घरातील प्रत्येकाने कामांची जबाबदारी वाटून घेतली, तिच्या श्रमांची दखल घेतली आणि तिला थोडा निवांत वेळ दिला तरी तिचा ताण निश्चितच कमी होईल.
The Shadow of a Weary Mind