– सुजाता येवले
पूर्वीच्या काळातले दिवे लागण्याच्या कातरवेळेला वातावरण आणि मन शुभ पवित्र, ऊर्जाभारित बनवणारे, घरोघर गुंजणारे शुभंकरोतीचे स्वर हल्ली दुर्मिळ झाले आहेत. असंख्य कारणे आहेत. कारणांचा ऊहापोह सुज्ञवाचकांनी स्वमनाशी करण्यास अजिबात हरकत नाही. दिवाळसणाचे दिवस आहेत. सणांची रेलचेल असलेल्या समृद्ध भारतात फक्त मातीच्या दिव्यांचीच उलाढाल कोट्यवधी रुपयांची होत असते असे म्हणतात. असे असताना देवतास्वरूप दीप बनवणारा मात्र फाटक्या कपड्यात दारिद्र्याने गांजलेला का? हा प्रश्न माझ्या मनाला नेहमी पडतो.
मृदेला आईची, सोन्याची, वैभवाची, समृद्धीची उपमा देणारे जनमानस मात्र मातीपासून बनवलेल्या असंख्य वस्तूंचा दर्जा कमी का समजतात? मातीची किंमत आणि कलेची किंमत बहुमूल्य असावी असे मला नेहमी वाटते. असो. मुळात दिव्याचा शोध लागला कसा? हा एक गहन प्रश्न आहे. जंगलात अनवधानाने लागलेल्या आगीवरून अग्नीचे महत्त्व आदिमानवाने ओळखले. आणि त्यावरून असंख्य अविष्कार पुढे घडत गेले. उजेड, ऊबपासून ते शिजवण्यापर्यंतचे महत्त्व त्याला ठाऊक होते. जसा जसा मानव प्रगत होत गेला तसे त्याने
स्वतःच्या प्रगतीसाठी अग्नीचा विविध प्रकारे उपयोग केला. निसर्गाच्या एकूणच अस्तित्वाला बर्यापैकी छेद गेला. पण मानव मात्र सुखी झाला. असे त्याचे स्वतःचे म्हणणे आहे. पूर्वी आगेट्या दगड किंवा चकमक दगड याचा वापर करून अग्नीची निर्मिती करणारा मानव आताशा लाइटरचे बटण दाबून किंवा नुसतीच रिमोटची बटणेे दाबून अग्नीची निर्मिती करू शकतो. सोनाराच्या दुकानात किंवा वेल्डिंगच्या ठिकाणी नोझल मधून एका लयीत निघणार्या निळ्या रंगाच्या ज्वाळा बघून अस्मादिकांना भारी कुतूहल असायचे. बराच वेळ त्याचे निरीक्षण केल्यानंतर कधी कधी डोळ्यापुढे अंधारल्यासारखे वाटायचे. मग बरेच धपाटे खाल्ल्यानंतर ते कुतूहल मनाच्या आणि डोळ्यांच्याही पाठी टाकले. आगपेटीची काडी, पेपरची घट्ट घडी, मेणबत्ती, समई, निरांजन, अगरबत्ती, कंदील, बत्ती, गॅस पेटवून त्या वेळेला त्याचे निरीक्षण पण चालायचे. वडील कौतुक करायचे, पण आईचा धपाटा ठरलेला असायचा. अग्नी हे पंचमहाभूत आहे. त्याच्याशी खेळ करायचा नाही म्हणून तिचे लक्ष असायचेच. आमचा काही भरोसा नव्हता ना. तसा हा खेळ दोन वेळा जीवावरही बेतला होता म्हणा. दिवसभरातून किमान दोन वेळेला समई किंवा निरंजन लावले जायचे. सणावाराला नैवेद्यासाठी आणखी एकदा; त्यावेळेला भक्तिभावाने हात जोडण्याचा प्रघात होताच जो आजही बटण दाबून लाइट लावल्यावर पाळला जातोय.
प्रत्येक सणाला, घरात प्रत्येकाच्या वाढदिवसाला किंवा इतर अनेक विशेष प्रसंगी दारात दिवा ठेवण्याची प्रथा आहे. पण दिवाळीत विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरोघरी दारात, खिडक्यांत, गॅलरी, अंगणात दिवे लावून लक्ष्मीचे स्वागत करणे ही आपल्या परमपूज्य संस्कृतीतील एक प्रथा आहे. कार्तिक महिनाभर दाराशी आणि तुळशीपाशी दिवा ठेवावा असे आई सांगायची कारण या महिन्यात स्वर्गातील देव भूतलावर वावरत असतात. असेलही कदाचित, पण कार्तिक महिना, शरद ऋतू, पाने, फुलं, फळं यांनी बहरलेली सृष्टी तनामनाला नक्कीच पवित्र प्रसन्न करतो. देवाचे अस्तित्व नक्कीच असावे. नवरात्रात घरोघरी अखंड दीप तेवत ठेवण्याची प्रथा आहे. अगदी गरीब परिस्थितीतील लोकही तेलाची तजवीज आधीच करून ठेवत असतात. घरातला दीप तेवत राहावा म्हणून सर्वच डोळ्यात तेल घालून नऊ दिवसांपर्यंत काळजी घेत असतात. दिवा काहीही कारणाने शांत झाल्यास घरात सासू मनाला खात सुनेला घरात लक्ष नाही, हे जरूर ऐकवते. आग विझते दिवा मात्र शांत होतो. कोजागरीला चंद्राला दिव्याने ओवाळणे नंतर त्याच दिव्याने घरातील कुलदीपकाला ओवाळताना, औक्षण करताना प्रत्येकच आईचा ऊर अभिमानाने भरून येतो.
चंद्र हे पृथ्वीचे प्रथम अपत्य आहे. तसेच कोजागरीला चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर कमी असते. जणू चंद्रदेवता आपल्या आईला पृथ्वीला भेटण्यासाठी तेजस्वी वदनाने येत असतो. तसेच शीतल तेज प्रत्येकच आई आपल्या लेकाच्या मुखकमलावर स्निग्धदृष्टीने बघत असते. म्हणूनच कोजागरीस आई आपल्या प्रथम अपत्यास ओवाळून वेलची केशर आणि ड्रायफ्रूट्स घातलेले स्निग्ध, पौष्टिक दूध घरातील सगळ्यांनाच पिण्यासाठी देत असते. घरातील लेकाला वंशाचा दिवा तर लेकीला वंशाची पणती असे म्हटले जाते.खरेतर सरत्या पावसाचाही दमटपणा दूर सारून शरद ऋतूचे आगमन होत असते. दुपारची गर्मी आणि रात्रीचं थंड वातावरण सहन करण्यासाठीची शक्ती केसर आणि ड्रायफ्रूट्सच्या माध्यमातून आपल्या शरीरास मिळावी, हा हेतू आहे.
Divya Divya Deepaktar…