– सचिन अहिरराव
नाशिक महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्त्यांवर अखेर शुक्रवारी शिक्कामोर्तब झालं. पण त्याआधी बरीच भवती न भवती झाली. तब्बल नऊ महिने रखडल्यानंतर ही नियुक्ती प्रक्रिया झाली खरी. पण दहा सदस्यांच्या या नियुक्तीत सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असलेली शिवसेना (ठाकरे) यांची बरीच ओढाताण झाली आणि महत्त्वाचं म्हणजे यातून सत्ताधारी भाजपाची सत्तालालसा उघड झाली!
खरंतर केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी लगोलग धूमधडाक्यात कामाला लागायला हवं होतं. तोंडावर येऊन ठेपलेला कुंभमेळा हेही त्यासाठी एक कारण होतंच. पण प्रशासकीय काळातील नियंत्रित सत्ताकारणाचा तोंडवळा न बदलण्याच्याच मानसिकतेत भाजपा अजून दिसतो आहे. असे नसते तर स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्त्या होण्यासाठी न्यायालयाचा हातोडा पडण्याची वाट पाहिली गेली नसती. महानगरपालिकेत सत्ताधारी म्हणून भाजपा एककल्ली कारभार करत असल्याचं सांगत विरोधी पक्षच काय त्यांचे सहकारी पक्षही बोटं मोडत असतात. महानगरपालिकेचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून कायद्याने काही संवैधानिक पदांची रचना केली आहे. त्या रचनेलाच फाटा देऊन भाजपा कारभार दामटत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. कारण सत्ता हाती घेतल्यानंतर सर्वच आवश्यक नियुक्त्यांमध्ये भाजपाने असाच वेळकाढूपणा केला आहे. त्यात केवळ स्वीकृत सदस्यांचीच नव्हे, तर महापालिकेतील सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता या महत्त्वाच्या पदांबाबतली सत्ताधार्यांची उदासीनता पाहता त्यांना कारभारावर अंकुश नको असल्याचंच द्योतक म्हणावी लागेल. तसं नसतं तर स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीबरोबरच सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेत्यांचीही नियुक्तीही होऊन गेली
असती.स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीचा आखाडा यावेळी कधी नव्हे इतका रंगला. महानगरपालिका निवडणूक होऊन नऊ महिने उलटले तरी या नियुक्त्या होत नसल्याचे पाहून नगरसेवकपदाची आस लावून बसलेल्या मंडळीची अस्वस्थता शिगेली पोहोचली होती. त्यात सर्वांत अधिक संख्या सत्ताधारी भाजपामध्येच होती. पण या अस्वस्थतेला तोंड फोडलं ते इनमिन तीन नगरसेवक असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवक सूफी जीन यांनी. वास्तविक काँग्रेसने महानगरपालिकेत शिवसेना-ठाकरे गटासोबत शहर विकास आघाडी म्हणून संयुक्त नोंदणी केली होती. यामुळे ठाकरे गटाचे 15 आणि काँग्रेसच्या 3 मिळून या आघाडीचे संख्याबळ 18 झाले. महापालिकेतील बलानुबलानुसार 12 नगरसेवकांमागे एक या सूत्राने दहा स्वीकृत सदस्य होतात. त्यानुसार भाजपाच्या 72 जागांसाठी सहा, शिवसेना-शिंदे गटाला 26 जागांपोटी दोन आणि ठाकरेगट-काँग्रेस आघाडीला 18 जागांच्या बदल्यात एक स्वीकृत नगरसेवकपद निश्चित होतं. विषय होता तो दहाव्या जागेचा. त्यासाठी ज्या पक्षाकडे 12 जागांच्या पटीत स्वीकृत सदस्य देऊन सर्वाधिक नगरसेवक उरतील त्यांच्याकडे ही दहावी जागा जाणार होती. या न्यायाने ठाकरेगट-काँग्रेस आघाडीकडे सर्वाधिक सहा नगरसेवक उरल्याने ही दहावी जागा त्यांच्या वाट्याला जाणार होती.
‘आम्ही तुमच्यासोबत आलो म्हणून ही जागा मिळाली, ती आम्हाला द्या’, असा पवित्रा काँग्रेसच्या सुफी जीन यांनी घेतला. पण, आघाडी करताना अशी काही चर्चा झाली नसल्याचं सांगत ठाकरे गटाच्या नेत्यांनी हा दावा धुडकावून लावला. खरं तर जीन यांचा बोलविता धनी दुसराच कुणीतरी होता, हे उघड गुपीत आहे. अगदी न्यायालयात दाद मागण्यापासून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गनिमी काव्यापर्यंत जीन यांचा वापर करून घेतला गेला. काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद पाहून भाजपाच्या तोंडाला पाणी सुटलं आणि त्यांनी सत्तेचा वापर करून एक अधिकची जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा आटापीटा केला. सुरुवातील माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्यासाठी भांडणारे जीन नंतर हळूच भाजपाच्या वळचणीला जाऊन बसले.
भाजपाने जीन यांना हाताशी धरून सुनिल आडके यांचा अर्ज स्विकारण्यास यंत्रणेला भाग पाडले. हे करताना ज्या काँग्रेसशी देशभरात आपल्या पक्षाचा उभा दावा आहे, त्याच्याशीच हातमिळवणी केल्याचा संदेश सगळीकडे जाईल, याचंही भान संबंधित मंडळीला राहिलं नाही. शिवाय हा खेळ कायद्यात बसणारा नाही, याचीही तमा त्यांनी बाळगली नाही. त्यातून या पक्षाची सत्तालालसाच उघड झाली. बाकी काही नाही!
(लेखक दै. गांवकरीचे कार्यकारी संपादक आहेत)
The lust for power, laid bare by ‘Sweekrut’!