अक्करमाशी

दरवर्षी भरणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्राचा सर्वांत मोठा सांस्कृतिक उत्सव. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात शंभरावे म्हणजे शताब्दी संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात जानेवारी 2027 मध्ये होणार आहे. पहिले संमेलन न्या. महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या पुढाकाराने 1878 साली पुण्यातच भरविण्यात आले होते. त्या काळी साहित्य नव्हे, तर ग्रंथकारांचे संमेलन म्हटले जायचे. पहिले संमेलन फारसे यशस्वी झाले नाही म्हणून न्या. रानडे यांनी दुसरे संमेलन 1885 साली पुण्यातच भरविले. हा योगायोग. या संमेलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी महात्मा फुले यांना निमंत्रण पाठविले होते. फुल्यांनी मराठी ग्रंथकार सभेस पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली होती. यांच्यात मिसळल्याने आम्हा शूद्रादि अतिशूद्रांचा काहीएक फायदा होणे शक्य नाही, याबद्दल आमचा आम्हीच विचार केला पाहिजे, असे या पत्रात फुल्यांनी म्हटले होते. त्याच पत्रात त्यांनी न्या. रानडेंना उद्देशून ’माझ्या घालमोड्या दादा’ असा उल्लेख केला होता. महात्मा फुले यांच्या अर्धांगिनी सावित्रीबाई यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठाच्या प्रांगणात फुले दाम्पत्याचे पुतळे आहेत आणि त्यांच्या साक्षीने शंभरावे संमेलन पार पडणार आहे. हा आणखी एक योगायोग. न्या. रानडेंना फुल्यांनी लिहिलेल्या पत्रात ज्या शूद्रादि अतिशूद्रांचा उल्लेख केला आहे, त्याच शूद्रादि अतिशूद्रांचा प्रतिनिधी असलेले डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची शतकमहोत्सवी संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे हाही एक योगायोग म्हणता येत असला, तरी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून लिंबाळे यांना दिलेली पसंती स्वागतार्ह आहे. जळगावमध्ये 1984 साली भरलेल्या 58 व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शंकरराव खरात झाले. त्याच वर्षी लिंबाळे यांचे ’अक्करमाशी’ आत्मकथन साहित्यविश्वात अवतरले होते. खरात यांचे तराळ-अंतराळ आत्मकथनही गाजलेले होते. खरात यांच्यानंतर अध्यक्षपदाचा मान कवी केशव मेश्राम यांना 2005 साली नाशिकच्या 78 व्या संमेलनात मिळाला. त्यानंतर 2010 साली ठाण्यातील 84 व्या संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे झाले. अतिशूद्रांचे प्रतिनिधित्व करणारे वास्तववादी साहित्यिक बाबूराव बागूल, नामदेव ढसाळ, दया पवार, गंगाधर पानतावणे, लक्ष्मण माने यांना अध्यक्षपदाचा सन्मान लाभला नाही, तरी त्यांच्या इतकीच कसदार वास्तव साहित्याची पेरणी लिंबाळे यांनी केलेली आहे. दलित साहित्याने माणुसकीची हाक दिली होती. त्या हाकेला सदाशिव पेठेतून पहिली ’ओ’ दिली गेली, ती 1984 साली खरात अध्यक्ष झाले तेव्हा. आता लिंबाळे शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष झाल्याने ती ’ओ’ दूरवर गेली आहे. ’अक्करमाशी’ हे आत्मकथन व ’सनातन’ ही कादंबरी या दोन साहित्यकृती लिंबाळे यांच्या संघर्षमय जीवनाची ओळख करून देतात. आत्मकथनात ते बालपणापासूनचे सर्व अनुभव मांडून अनैतिकता आणि नैतिकतेला हात घालतात. ’सनातन’मध्ये भारतीय समाजातील जातिव्यवस्थेचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तव मांडतात. धर्म, परंपरा आणि सनातन मूल्यांच्या नावाखाली अस्पृश्य आणि आदिवासी समाजाचे पिढ्यान्पिढ्या कसे शोषण झाले, याचे चित्रण ’सनातन’मध्ये आहे. स्वातंत्र्यलढा, धर्मांतराचे प्रयत्न (ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध धर्म) आणि तरीही न पुसली गेलेली जात, गावातील विहिरी आणि मंदिरांचा विटाळ अशा वास्तवावर त्यांनी भाष्य केले आहे. शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील सोलापूर जिल्ह्यातील हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे 1 जून 1956 रोजी झाला. जन्मापासूनच त्यांना ’अक्करमाशी’ (अनौरस) म्हणून हिणवले जाऊ लागले. आपला जन्म अनैतिक असल्याची बोचणी त्यांना सतत जाणवत आलेली आहे. ’अक्करमाशी’त तेच वास्तव मांडलेले आहे. मसामाय ही त्यांची आई आणि विठ्ठल कांबळे यांची पत्नी. दोन मुले होऊनही तिने हणमंता (लिंगायत पाटील) लिंबाळेशी अनैतिक संबंध ठेवल्याने विठ्ठल तिला सोडून देतो, तेव्हा मसामाय एकटी पडते. समाजाचा रोष पत्करून ती हणमंताची रखेल म्हणून राहते. काही दिवसांनी तिला हणमंतापासून मुलगा होतो, तो मुलगा म्हणजेच शरणकुमार लिंबाळे. मंतामाय ही त्यांची आजी त्यांचे पालनपोषण करते. हणमंता पितृत्व नाकारतो, तेव्हा शरणकुमार लिंबाळे यांच्या आयुष्याची परवड सुरू होते. माझी आई अस्पृश्य-बाप सवर्ण, आई झोपडीत-बाप कोठीत, बाप जमीनदार-आई भूमिहीन आणि मी अक्करमाशी. गाव, भाषा, आई, वडील, जात, धर्म या सर्व दृष्टीने मी खंडित आहे. माझा जन्मच येथे मला विखंडित घोषित केला गेला. अशा स्वरूपाचे निवेदन लिंबाळे ’अक्करमाशी’ आत्मकथनात करताना जीवनातील सत्य मांडतात. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत सर्व सदस्यांनी एकमताने लिंबाळे यांची निवड केली. मराठी दलित साहित्य विश्वामध्ये डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे नाव नेहमी आवर्जून घेतले जाते. लिंबाळे यांनी आपल्या ’अक्करमाशी’ या आत्मकथनाच्या माध्यमातून देशभरात आपली एक वेगळी आणि भक्कम ओळख निर्माण केली. त्यांनी ’सनातन’, ’उपजन’, ’दलित ब्राह्मण’ यांसारख्या कादंबर्‍यांसह ’दलित चालिसा’ आणि ’दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या ’सनातन’ या कादंबरीला 2020 मधील साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ’सरस्वती सन्मान’ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. गेली 45 वर्षे मराठी भाषेच्या माध्यमातून दलितांच्या हक्क-मुक्तीचा लढा मांडत आहेत. त्यामुळे ही निवड म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा, समतेच्या लढ्याची पावती आणि सामाजिक न्यायाचा झालेला सत्कार आहे, असे लिंबाळे यांनी म्हटले आहे. ’बंदुकांच्या जोरावर समाज बदलता येत नाही; समाज, देश आणि माणूस बदलायचा असेल तर त्याच्या मनामध्ये व मेंदूमध्ये साहित्याच्या विचारांनी बदल घडावा लागतो,’ असेही मत त्यांनी मांडले. त्यांची निवड फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरणारी आहे. ’अक्करमाशी’ आत्मकथनाने मराठी साहित्यविश्वात मोठी चर्चा घडवली. जातिव्यवस्थेने निर्माण केलेली सामाजिक विषमता, अस्पृश्यता, मानवी प्रतिष्ठेचा संघर्ष आणि सामाजिक बहिष्काराचे वास्तव त्यांनी मांडले. ’अक्करमाशी’ हे एका मोठ्या सामाजिक वास्तवाचे प्रतिनिधित्व करणारे साहित्य ठरले. समाजाच्या प्रस्थापित चौकटीत स्थान न मिळालेल्या माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यांनी लेखनातून उपस्थित केला. अध्यक्षपद म्हणजे याच लेखनाचा सन्मान!

Akkarmashi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *