लासलगाव: समीर पठाण
आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ आणि पारदर्शक व्यवहारासाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे.संपूर्ण देशात आणि देशाबाहेर आपल्या खास चवीने ठसा उमटवित असून येथील कांद्याची प्रत व चव विचारात घेऊन येथील कांद्यास लासलगावचा कांदा म्हणून भौगोलिक मानांकन मिळाले आहे.कमी पाऊस,पोषक हवामान, जमिनीची उत्तम प्रत,आणि नगदी पिक असल्यामुळे येथील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करतात.बाजार समिती आवारावर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असलेला कांदा आवकेचा विचार करून बाजार समितीने लासलगाव येथे स्वतंत्र कांदा बाजार आवाराची उभारणी केलेली आहे.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये लासलगाव बाजार समितीत ८५ लाख ३४ हजार २६१ क्विंटल
कांदा आवक होऊन १३०५ कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल झाली आहे.लासलगाव बाजार समितीचे आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने या वाढत्या आवकेचा विचार करत विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू करून स्पर्धा निर्माण केल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.
गेल्या ७५ वर्षांपासून अमावस्येला कांदा लिलाव बंद ठेवण्याची परंपरा होती याबाबत लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी व्यापारी वर्गाशी समनव्य साधत अमावस्येला कांदा लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न केले त्याला व्यापारी वर्गाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लासलगाव बाजार समितीत अमावस्येला सुद्धा कांदा लिलाव सुरू झाले. तसेच सुट्या आणि शनिवारी देखील कांदा लिलाव सुरू झाल्याने लासलगाव बाजार समितीत एतिहासिक अशी कांदा उलाढाल झाली आहे.लासलगाव बाजार समितीत एका वेळेस दोन कांदा लिलाव सुरू झाल्यास कमी वेळेत जास्त कांद्याचे लिलाव होऊन जास्त आवकेचा निकस जलद गतीने होण्यास मदत होईल या करिता देखील प्रयत्न सुरू आहे.
बांग्लादेशच्या आयात बंदीमूळे भारतीय कांदा कोंडीत सापडला असून भारतीय कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसताच बाजार समितीच्या पहिल्या महिला सभापती सुवर्णा जगताप यांनी तात्काळ आरोग्य मंत्री डॉ भारती पवार यांच्या माध्यमातून वाणिज्य मंत्री,कृषी मंत्री,परराष्ट्र व्यवहार मंत्री यांच्याशी पत्रव्यव्हार करून बांगलादेश आणि इतर देशात आपल्या कांद्याला बाजार पेठ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.
सध्या रेल्वेद्वारे कांदा पाठविणेसाठी BCN रॅक उपलब्ध करून दिल्या जातात. सदर रॅकद्वारे कांदा वाहतुकीसाठी साधारणतः 05 ते 08 दिवसांचा कालावधी लागतो. त्याऐवजी येथील कांदा निर्यातदारांना किसान रेल अथवा त्या धर्तीवर व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र रेल उपलब्ध करून दिल्यास सदरचा माल 48 ते 60 तासांमध्ये पोहोचविला जाईल. वेळ आणि भाडेदरातील बचतीमुळे व्यापारी वर्ग अधिकचा मोबदला शेतकरी बांधवांना भाववाढीसाठी देऊ शकतील. तसेच देशांतर्गत किंवा परदेशात कांदा पाठविणा-या खरेदीदारांना Transport Subsidy दिल्यास माल वाहतुक दरात अनुदान मिळत असल्याने कांदा खरेदीदार जास्तीत जास्त कांदा देशांतर्गत व परदेशात पाठविणेसाठी प्रयत्न करतील. याबाबत ही सभापती जगताप यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री, कृषी मंत्री परराष्ट्र व्यवहार मंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे.
कांद्याची विश्वसनीय बाजारपेठ म्हणून लासलगाव बाजार समिती ओळखली जाते.देशभरातील कांदा दर हे लासलगाव बाजार समिती वरून ठरले जातात.कांद्या संदर्भात काहीही निर्णय झाला तर संपूर्ण देशाचे लक्ष लासलगाव कडे लागलेले असते आपल्या पारदर्शक कामाच्या जोरावर लासलगाव बाजार समितीतने चांगली कामगिरी करत १६९५ कोटी रुपयांची उलाढाल केली.अमावस्या आणि शनिवार असे वर्षातील ६० दिवस कामकाज वाढल्याने उलाढालीत विक्रमी वाढ झाली आहे.तर कांदा विक्रीतून बाजार समितीला १३०५ कोटी रुपयांचे उलाढाल मिळाल्याची माहिती पहिल्या महिला सभापती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. सर्वात जास्त आवक व सरासरी मध्ये सर्वाधिक भाव मिळवून देणारी बाजार समिती अशी गणना लासलगाव बाजार समितीची शेतकर्यांमध्ये आहे.चवीला उत्कृष्ट असलेला जीआय मानांकन मिळालेला लासलगाव चा कांदा जगातील ७४ देशात निर्यात केला जातो.देशाला कांदा निर्यातीतून देखील मोठे परकीय चलन मिळत आहे.एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या आर्थिक वर्षात देशाला कांदा निर्यातीतून २९७३ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.
मागील ५ वर्षातील कांदा उलाढ़ाल
सन २०१६-१७ -२३६ कोटी
सन २०१७-१८ -८३१ कोटी
सन २०१८-१९ -४१६ कोटी
सन २०२०-२१ -९३९ कोटी
सन २०२१-२२ -१३०५ कोटी
बाजार समितीत पारदर्शक आणि विश्वासारय कामकाजमुळे शेतकऱ्यांची लासलगाव बाजार समितीला पहिली पसंदी असते. शेतकऱ्यांचा लासलगाव बाजार समितीवर विश्वास असल्याने फळे आणि भाजीपाला केंद्राने नियमन मुक्त असूनही शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात लासलगाव बाजार समितीत होत आहे. रोख चुकवती,जलद वजनमाप,पारदर्शक व्यवहार यामुळे शेतकरी लासलगाव बाजार समितिला प्राधान्य देतात.यामुळेच लासलगाव बाजार समितीने सन २१-२२ या आर्थिक वर्षात कांदा विक्रीतून १३०५ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
सुवर्णा जगताप,सभापती
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती