अचानक दुपारच्या वेळेला राधा माझ्याकडे आली…चेहरा पडलेल,डोळे लालसर झालेले बहुदा रडलेली असावी.वय माझ्या बरोबरीचच मनमेळावु स्वभावामुळे आमच्यात छान मैत्रीभाव जुळला होता… जराशा नाराजीच्या स्वरातच राधा म्हणाली ….
“ताई एक काम होते जरा..”
मी म्हटलं ,हो बोलना..काय झालय बरं नाही वाटत का ?
नाही ताई तेच तर काहीच कळत नाही मला…आजारी नाही मी…पण आजारीही वाटतय मनातनं ,,,कधी खूप उदास होतं मन भरभरुन बोलावं आपल्या माणसांजवळ तर सर्वाना आपलं बोलणं रडगाणं वाटतं..टाळलं जातं ऐकून घेणं…
घरभर कामात मन रमवावं म्हटलं तर आयुष्यभर तेचतेच घरकाम आता नकोनकोसं वाटतय..खूप थकवा येतो तासातासात पडून घ्यावंस वाटतं…आराम केला तर मन शांत बसत नाही सतत डोक्यात विचारचक्र चालु रहातात..कधी आशा, निराशा कधी स्वप्नाळु जगात मन हरवतं. बेडवरुन उठावसच वाटत नाही ….मग घरात चिडचिड होते…घरातली बाई सतत रोबोटसारखी उभी कशी राहीन गं ..पंचेचाळीशीच्या उंबरठ्यावर आलेले शरीर थकणारच ना ….तोच पुर्वीसारखा स्टॕमिना नाही उरला आता…सहन होत नाही जीवाला ..स्वतःचाच जीव जड झालाय मला …!
दूर निघून जायचय आता मला हा सर्व संसार पसारा गोतावळा सर्वापासुन…आज खूप रडू आलय मला…भांडून आलेय घरात..माझी सहनशीलताच संपलीय गं…वयाच्या या टप्प्यात नवराही मनाने सोबतीला नसतो..तो त्याच्याच विश्वात रमलाय…पण घरात बाईला फक्त चार भिंतीच…! मी कंटाळलेय आता मला बाहेर मोकळ्या हवेत श्वास हवाय जबाबदाऱ्याच्या बाहेरही स्वअस्तित्वाचं जग हवय प्रेमाचं मायेचं माणुस बोलायला जवळ सोबत हवय …!
असं होवु शकतं का गं..मी अनाथ आश्रमात,वृद्ध आश्रमात काम करु शकते त्या अनाथांना मायेची ऊब देवु शकते…आणि त्यात मलाही मायेचा आत्मिक समाधानाचा ओलावा मिळेन…सुखावेन मी इतरांच्या चेहऱ्यावर आनंदी क्षण भरताना…घरात आपली कुणालाही कदर नसते गं.,फक्त गृहीत धरलं जातं आयुष्यभर हे स्वार्थी जग वाटू लागलय आता…मला तुझी मदत हवीय…तुझ्या ओळखीत असे कुठे अनाथालय असेल तर कळव मला लवकर ..एवढंच सांगायला आले होते गं…!
राधाची मनातली तळमळ ऐकून मी अवाक् झाले…किती एकाकी झाली होती ती मनातनं घरभर माणसं असुनही ..!
“हे बघ राधा,असा त्रागा करु नकोस .हे घरोघरी चालुच रहातं..दुर्लक्ष कर स्वतःवर प्रेम कर आणि छान आनंदी रहा…तुला आवड आहे सेवेची तर आपण नक्की भेट देवू आनाथ आश्रमात..तिथे अधुनमधुन जावुन तु व्यक्त होत जा मदत करत जा..जमेन ती सेवा करु शकते त्यासाठी घर सोडण्याची गरज नाही समजले का”…
बर आता मी छान चहा करते बस तु मग गप्पा करुया …तुझा राग तणावही पळुन जाईन…जरासे स्मित करत राधाने टिपाॕयवरचे मासिक हातात घेतले..त्यात लेख होता “मोनोपाॕझ” राधा वाचु लागली आणि गुंग झाली…
काय गं काय झालय राधा कुठे हरवली…हा चहा घे..बोल आता …शांत वाटतय ना मन मोकळे बोलुन झाल्याने…
हो ताई ..खरच छान चहा झालाय..आणि मनही हलकं झालय बोलुन ..पण त्यापेक्षा हा “मोनोपाॕझचा लेख” वाचुन माझ्या मनातले उत्तरं सापडलेय जणू…अगदि असेच घडतेय माझ्या आयुष्यात ..मी मगाशी बोलले ना तेच सारं लक्षणं दिलेय यात.आणि खरच हो चाळीशीनंतरचा हा हळवा टप्पा आनंदाने स्विकारुन जगायला हवंच ना…
हो बरोबर बोललीस राधा… पण या वयात भावनिक शारीरीक,मानसिक या तिन्ही स्तरावर हळव्या मनाला जपणारी जोडीदाराची आधाराची फार गरज असते गं….आणि समाज इथेच स्रीमनाला समजुन घ्यायला कमी पडतो..वैचारीक व्याख्यानमाला द्वारे अशा हळव्या विषयावरही जनजागृतीची गरज आहे ….पण हे करावं कुणी आणि ऐकणार कोण हा प्रश्नच गं….?
राधा फक्त एकटक बघत ऐकत राहीली…काहीतरी चुकतय नक्की हे समजलं पण उमजलं तरच स्वतःचा आनंद स्वतःत शोधणं सोपं होत जातं…!
©सविता दरेकर