पिसाळलेल्या लांडग्याचा धुमाकूळ
13 पेक्षा जास्त नागरिकांवर हल्ले
सिन्नर – कोपरगाव तालुक्याच्या सीमेवर पुतळेवाडी, विघनवाडी, शहाजापूर, कोळपेवाडी परिसरात पिसाळलेल्या लांडग्याने धुमाकूळ घालत जवळपास 13 पेक्षा जास्त नागरिकांवर हल्ले करत जखमी केल्याची घटना सोमवारी (दि.11) घडली. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पुतळेवाडी शिवारातील गोकुळ नरोडे यांच्या वस्तीपासून लांडग्याच्या हल्ल्यांचा सुरू झालेला हा प्रवास कोळपेवाडी,शहाजापूर शिवारात दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान संपला. या परिसरातील नागरिकांनी एकत्र येत पिसाळलेल्या लाडग्यावर प्रतिहल्ला करून त्यास ठार केल्याचे समजते.
सिन्नर तालुक्यातील पुतळेवाडी परिसरात सोमवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास शिवसेनेचे उप तालुका प्रमुख गोकुळ नरोडे् यांच्या वस्तीवर अंगणात झोपलेल्या विठाबाई अर्जुन नरोडे (60) या महिलेवर हल्ला करत लांडग्याने त्यांच्या तोंडाला चावा घेतला. त्यांनी आरडाओरड केल्याने घरातील सदस्य जागे झाले. त्यांनी या लांडग्याला हुसकावून लावले. त्यानंतर सकाळी 9 ते 9.30 वाजेच्या सुमारास भरतपूर (विघनवाडी) या परिसरात सुमारास मस्के वस्तीवर या लांडग्याने हल्ला चढवत येथील महिलांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात अलकाबाई चांगदेव म्हस्के (40), ताराबाई काशिनाथ थोरात (60), विमलबाई विष्णुपंत दुबे (65) आणि वेणुबाई माधव थोरात (65) या गंभीर जखमी झाल्या. सकाळच्या सुमारास झालेल्या या अनपेक्षीत हल्ल्याने भांबावलेल्या नागरिकांनी एकमेकांच्या मदतीने हातात लाठ्याकाठ्या घेऊन या पिसाळलेल्या लांडग्याला हुसकावून लावले. पुढे कोळगाव माळ परिसरातील बेंडकुळे वस्तीवर या लांडग्याने् सविता अनिल बेंडकुळे (25) या महिलेवर आणि गुलाबभाई शेख (60) पाठीमागून हल्ला करत तिलाही जखमी केले. शिंदेवाडी येथील वाळीबा हांडोरे (37) यांनाही जखमी केले.
हा लांडगा तसाच पुढे शेजारीच असलेल्या कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर-कोळपेवाडी शिवारात पोहोचला. तेथे राधाबाई कन्या महाविद्यालयातील एस. आर. थोरात या शिक्षकासह महेश खालकर् हा विद्यार्थी, आवारे नामक विद्यार्थीनी आणि पठाण महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसलेला विक्रेता यांच्यावरही हल्ला करत त्यांना जखमी केले. या परिसरातील आणखी काही लोकांना किरकोळ जखमा झाल्याचे समजते. दरम्यान, यातील काहींना नाशिक जिल्हा रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले् असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.