– प्रा. उल्हास पाटील
जेव्हा मूल अभ्यास टाळते, पुस्तक उघडायला तयार होत नाही किंवा वारंवार मोबाइल, टीव्ही, खेळ याकडे आकर्षित होते, तेव्हा पालकांची चिंता वाढते. कधी काळजी वाटते, कधी राग येतो आणि कधी मनात एक प्रश्न निर्माण होतो- माझं मूल आता माझं ऐकतच नाही. ही भावना साहजिक आहे. पण अशा वेळी एक क्षण थांबून स्वतःला एक प्रश्न विचारण्याची गरज आहे-माझं मूल अभ्यास का करत नाही? या प्रश्नाऐवजी माझ्या मुलाला अभ्यास करणे कठीण का वाटत आहे?
आपल्याला अनेकदा वाटते की, मुलगा किंवा मुलगी आळशी आहे, अभ्यास करायची इच्छा नाही किंवा मुद्दाम आई-वडिलांचे ऐकत नाही. पण, खरं पाहिलं तर बहुतेक मुलं पालकांना त्रास देण्यासाठी असे वागत नसतात. त्यांच्या त्या वागण्यामागे काहीतरी कारण असते. कदाचित एखादा विषय त्याला समजत नसेल, वाचनाची अडचण, गणिताची भीती, वारंवार होणार्या चुका त्याचा आत्मविश्वास कमी करत असतील, तो मानसिकदृष्ट्या थकलेला असेल किंवा त्याला फक्त कोणीतरी शांतपणे समजून घेण्याची गरज असेल.
म्हणूनच प्रत्येक वेळी मुलाला दोष देण्यापेक्षा त्याच्या अडचणीचे मूळ कारण शोधणे अधिक
महत्त्वाचे आहे.
प्रत्येक मूल वेगळं असतं.
एकही मूल दुसर्या मुलासारखे नसते.
काही मुलांना गणित पटकन समजते, काहींना वाचनाची आवड असते, काही मुलं चित्रांमधून उत्तम शिकतात, तर काहींना कृती, प्रयोग आणि अलींर्ळींळीूं मधून विषय अधिक चांगला समजतो. प्रत्येक मुलाची ताकद वेगळी आहे आणि प्रत्येकाची शिकण्याची पद्धतही वेगळी आहे. म्हणून आपल्या मुलाची तुलना त्याच्या मित्रांशी, भावंडांशी किंवा नातेवाइकांच्या मुलांशी करू नका.
बघ, तो किती अभ्यास करतो तू का नाही करत? हे वाक्य मुलाला प्रेरणा देत नाही; उलट त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण करू शकते. तुलनेऐवजी एकच गोष्ट पाहा-कालपेक्षा आज माझ्या मुलामध्ये किती छोटी सुधारणा झाली? कारण तुलनेपेक्षा प्रगती अधिक महत्त्वाची असते. चांगल्या सवयी रोजच्या छोट्या-छोट्या बदलांमधून तयार होतात. आज तीन-चार तास अभ्यास कर, असे सांगण्याऐवजी सुरुवात कमी वेळेपासून करा. 15-20 मिनिटांचा अभ्यास छोटा ब्रेक पुन्हा अभ्यास असा अभ्यासाचा छोटा दिनक्रम तयार करा. होमवर्क पूर्ण होईपर्यंत अभ्यास कर, असे सांगण्याऐवजी, चल, आधी हा सोपा प्रश्नांचा भाग पूर्ण करूया असे म्हणा. सुरुवात सोपी असेल तर मुलाला यशाची छोटी जाणीव होते आणि पुढच्या अभ्यासासाठी आत्मविश्वास वाढतो. अभ्यासाच्या वेळी मोबाइल, टीव्ही, गेम्स किंवा इतर लक्ष विचलित करणार्या गोष्टी शक्य तितक्या दूर ठेवा.
मुलाच्या प्रत्येक छोट्या
प्रयत्नाचे कौतुक करा.
तू किती मार्क मिळवलेस? हा प्रश्न विचारण्यापेक्षा कधी कधी, आज तू कालपेक्षा जास्त प्रयत्न केलेस, हे मला आवडलं. एवढेच शब्द मुलाच्या मनात मोठी ऊर्जा निर्माण करू शकतात. फक्त निकालाचे कौतुक न करता प्रयत्नांचे कौतुक करा. कारण मुलाला प्रत्येक वेळी हे जाणवायला हवे की-मी चुकलो तरी माझे आई-बाबा माझ्या सोबत आहेत.
अशा वातावरणात मुलाचा आत्मविश्वास वाढतो आणि शिकण्याची इच्छा हळूहळू निर्माण होते. नंतर अभ्यास करतो. मला गणित आवडत नाही. मी थकलो आहे. मुलं अनेकदा अशी वाक्ये बोलतात- नंतर अभ्यास करतो. मला गणित आवडत नाही. मी थकलो आहे. खूप कंटाळा येतो. मला होमवर्क आवडत नाही. अशा वेळी पालकांचा संयम सुटणे स्वाभाविक आहे. पण, लगेच ओरडण्याऐवजी थोडं थांबा आणि विचार करा-मुलाला नेमकं काय सांगायचं आहे? कधी या वाक्यांच्या मागे अभ्यासाचा गोंधळ असतो, कधी अपयशाची भीती
असते, कधी थकवा असतो, तर कधी आत्मविश्वासाची
कमतरता असते.
म्हणून तुला अभ्यास का करायचा नाही? असे विचारण्यापेक्षा, तुला अभ्यासात नेमकं काय कठीण वाटतंय? मला सांग, आपण दोघं मिळून ते सोडवूया, असे विचारून पाहा. कदाचित मुलाला त्या क्षणी उपदेशाची नाही, तर आपल्या बाजूने उभ्या असलेल्या एका व्यक्तीची गरज असेल. मुलगा अभ्यास करत नाही म्हणून त्याला आळशी, निष्काळजी किंवा नालायक ठरवण्यापूर्वी समस्या नेमकी कुठे आहे हे शोधा. कारण समस्या वेगळी असेल तर उपायही वेगळा असतो. पालकांच्या काही चुका-मुलाला अभ्यासाची सवय लावताना नकळत काही चुका होतात.
♦ अभ्यासासाठी सतत ओरडणे
♦ इतर मुलांशी तुलना करणे
♦ भीती दाखवून अभ्यास करायला लावणे
♦ परीक्षा जवळ आली की अभ्यासाला बसवणे
♦ खूप मोठ्या वेळेचा अभ्यास अपेक्षित ठेवणे
♦ फक्त गुण आणि मार्कांकडे लक्ष देणे
♦ मुलाच्या चुका समजून घेण्याऐवजी त्याला दोष देणे.
यामुळे काही वेळा मूल अभ्यासापासून आणखी दूर जाऊ शकते. अभ्यास हा शिक्षा वाटू लागला तर मुलाची शिकण्याची इच्छा कमी होऊ शकते. म्हणून अभ्यासाकडे भीतीने नाही, तर सकारात्मकतेने पाहण्याचे वातावरण घरात तयार करणे गरजेचे आहे. पालकांनी फक्त मुलाचे भविष्य पाहू नये, त्याचा आजही समजून घ्यावा.
आपण मुलाच्या भविष्यासाठी धडपडत असतो. पण त्या भविष्यासाठी धावताना मुलाचा आज हरवून जाऊ नये, याचीही काळजी घ्यायला हवी. मुलाला फक्त चांगले मार्क मिळवणारा विद्यार्थी बनवण्यापेक्षा आत्मविश्वासू, जबाबदार आणि शिकण्याची इच्छा असलेला माणूस बनवणे अधिक महत्त्वाचे आहे.
आज आपण मुलाला दिलेला संयम, समजून घेण्याची वृत्ती, प्रोत्साहनाचे दोन शब्द आणि त्याच्या छोट्या प्रयत्नांचे केलेले कौतुक-हीच त्याच्या उद्याच्या आयुष्याची खरी गुंतवणूक आहे. कारण मुलांच्या हातात फक्त पुस्तक नसते; त्यांच्या हातात त्यांचे भविष्य असते. आणि त्या भविष्याला आकार देताना पालकांची भूमिका केवळ अभ्यास कर, असे सांगण्यापुरती नसते.
कधी शिक्षक व्हावे लागते, कधी मित्र व्हावे लागते, कधी मार्गदर्शक व्हावे लागते आणि कधी फक्त शांतपणे मुलाच्या शेजारी बसून त्याचे ऐकून घ्यावे लागते. शेवटी एक गोष्ट प्रत्येक पालकाने मनात ठेवावी-
मुलं नेहमी आपलं ऐकत नाहीत, पण ते आपले अनुकरण नक्कीच करत असतात. आज आपण त्यांच्या छोट्या चुका समजून घेतल्या, त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली. तुलना करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन दिले आणि अभ्यासाची भीती दूर करून शिकण्याची गोडी निर्माण केली तर उद्या हेच छोटे-छोटे प्रयत्न त्यांच्या उज्ज्वल भविष्यात मोठे रूप घेतील.
मुलाला बदलण्याआधी त्याला समजून घ्या, कारण कधी कधी मुलाला अभ्यासाची नाही, तर आपल्या विश्वासाची गरज असते. आज मुलाच्या हातात पुस्तकासोबतच त्याच्या मनात मी करू शकतो हा विश्वास निर्माण करा. कदाचित त्याच विश्वासातून त्याच्या उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी सुरू होईल.
A child’s mind hidden behind the numbers of their grades.