एक वकील म्हणून न्यायालयात युक्तिवाद करणार्या शिवराज पाटील चाकूरकर यांनी 1967-69 या काळात लातूर नगरपालिकेमध्ये आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. ते नगराध्यक्षही झाले. महाराष्ट्र विधानसभेवर ते दोन वेळा निवडून गेले. विधानसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे लक्ष न घालता त्यांनी दिल्लीतच राजकारण केले. सन 1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर 1999 पर्यंत सलग सात निवडणुका जिंकत त्यांनी लोकसभेत एक प्रभावी नेता म्हणून आपली छाप पाडली. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश, अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 1991 ते 96 या काळात ते दहाव्या लोकसभेचे अध्यक्ष होते. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचे थेट प्रसारण, नवे ग्रंथालय यांसारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. तत्कालीन हैदराबाद संस्थानमधील लातूर जिल्ह्यातील चाकूरमध्ये 12 ऑक्टोबर 1935 रोजी जन्मलेले शिवराज पाटील यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. देश-विदेशातील अनेक संसदीय परिषदांत त्यांनी भारताचे नेतृत्व केले. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षातही त्यांनी जाहीरनामा समितीचे अध्यक्षपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदार्या सांभाळल्या. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांच्यावर काँग्रेसने विश्वास ठेवून त्यांना केंद्रात गृहमंत्रिपद दिले. त्याच्या कारकिर्दीत 26 नोव्हेंबर 2008 साठी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. त्याची देशभर, जगभर चर्चा झाली. महाराष्ट्र व देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अंतर्गत सुरक्षेतील त्रुटींची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. कोणतीही नाराजी व्यक्त न करता त्यांनी 30 नोव्हेंबर 2008 रोजी राजीनामा दिला. तेव्हापासून ते सक्रिय राजकारणापासून दूर झाले. सन 2010 ते 2015 या काळात ते पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून कार्यरत होते. देशातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते. शिवराज पाटील हे सत्यसाईबाबांचे निष्ठावंत अनुयायी म्हणूनही परिचित होते. सुमारे पाच दशकांचा संसदीय आणि प्रशासकीय अनुभव, विविध मंत्रालयातील कामकाज आणि लोकसभा अध्यक्ष म्हणून केलेले योगदान यामुळे शिवराज पाटील भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व मानले जात. कॉँग्रेस नेत्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या चर्चांमध्ये ते सहभागी असत. त्यामुळे काँग्रेसच्या किचन कॅबिनेटमध्ये ते होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी असे. गेल्या काही वर्षांपासून ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले होते. त्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. दांडगा जनसंपर्क, साधेपणा, शिस्त, तत्त्वनिष्ठा ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका सुसंस्कृत पर्वाचा अंत झाला आहे.
कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्ये
मराठवाडा ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणात त्यांनी आपल्या शांत आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाने एक वेगळी छाप पाडली होती. देशाच्या दोन सर्वोच्च घटनात्मक पदांवर (लोकसभा सभापती आणि केंद्रीय गृहमंत्री) काम करण्याचा मान त्यांना मिळाला होता. सन 1982 व 1978 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले. महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष, उपमंत्री (कायदा व न्याय, पाटबंधारे, प्रोटोकॉल), तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी देशात उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देण्याची सुरुवात केली. संसद कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आणि संसद ग्रंथालय इमारतीच्या बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सन 1980 साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांनी सलग सात वेळा (1980 ते 1999 पर्यंत) या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. राजकारणात आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी, सखोल अभ्यासासाठी आणि शांत कार्यशैलीसाठी ते ओळखले जात होते. वक्ता म्हणून ते प्रभावी होतेच, पण त्यासोबतच ते एक लेखक म्हणूनही परिचित होते. त्यांनी ‘रिमिनिसेन्स अॅण्ड रिफ्लेक्शन्स’, ‘इमरिजिंग व्हिजन ऑफ इंडिया’ ही इंग्रजी पुस्तकेही लिहिली.