स्वच्छ, सुंदर गोदावरी हाच शासनाचा ध्यास A clean, beautiful Godavari is the government’s ambition.

मंत्री गिरीश महाजन : वृक्षारोपण उपक्रमास प्रारंभ

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकचा आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा हरित कुंभमेळा म्हणून देशात आदर्श ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केले. गोदावरी नदी स्वच्छ व सुंदर ठेवणे हा शासनाचा ध्यास असून, त्यासाठी सर्वांगीण नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हरित नाशिक उपक्रमांतर्गत शहरात 15 हजार झाडांंची लागवड व संवर्धन करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ मखमलाबाद रस्त्यावरील भोईर मळा येथे झाला. यावेळी साधू-संत, महंतांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. विकासकामांमुळे बाधित होणार्‍या नागरिकांची संपूर्ण जबाबदारी शासन घेणार असून, कोणावरही अन्याय होणार नाही, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वृक्ष काढावे लागतील तेथे पुनर्रोपण अनिवार्य करण्यात येईल. नागरिकांनी आई-वडिलांच्या नावाने किमान एकतरी रोप लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. वृक्षतोडीच्या नावाने राजकारण करू पाहणार्‍यांचा मंत्री महाजन यांनी समाचार घेतला.
यावेळी महंत हरिगिरी महाराज यांनी साधू-संत, महंत व कुंभमेळ्याची बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला. कुंभमेळा ही आपली संस्कृती व अस्मिता असून, नाशिकच्या आध्यात्मिक परंपरेचे जतन करणे, ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास भक्तिचरणदास महाराज, अनिकेतशास्त्री देशपांडे, किशोरगिरी महाराज, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह 13 आखाड्यांचे प्रमुख, महामंडलेश्वर, विविध धार्मिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

अ‍ॅपचे लोकार्पण

हरित नाशिक मोबाइल अ‍ॅपवर नाव नोंदणी करून नागरिकांना वृक्ष घेता येणार आहे. या अ‍ॅपचेही लोकार्पण करण्यात आले. त्यासाठी क्य आर कोड तयार करण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था यांनादेखील मागणीप्रमाणे वृक्षलागवडीसाठी उपलब्ध होतील.

महाजनांसाठी साधू-महंतांची बॅटिंग

तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. तपोवनात करण्यात येणार्‍या वृक्षतोडीबद्दल मंत्री गिरीश महाजन यांना टीकेचे धनी व्हावे लागले होते. परंतु काल झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाला सर्व प्रमुख आखाड्यांचे साधू-महंत, तसेच धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. यावेळी सर्वच साधू-महंतांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी बॅटिंग करत हरितकुंभ साकारण्यावर भर देतानाच साधुग्रामच्या मुद्दयावर महाजन यांच्या भूमिकेचे स्वागत केले.

कुंभमेळ्याची बदनामी खपून घेणार नाही : महंत हरिगिरी

सिंहस्थ कुंभमेळ्याची बदनामी, तसेच साधू-महंत यांच्याविषयी वापरले जाणारे अपशब्द खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा महंत हरिगिरी यांनी दिला. साधू-महंतांबाबत गेल्या काही दिवसांपासून तपोवनात आंदोलन करणार्‍या काही मंडळींनी अपशब्द वापरले होते. त्याचा महंत हरिगिरी यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला.

Green Kumbh Mela
A clean, beautiful Godavari is the government's ambition.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *