– प्रणाली देशमुख
माहीत नाही का, पण मला ना! ओटी (जढ) मधला सर्जन आणि लहर आली तर निगुतीने भाजी करणारा ओट्याजवळचा नवरा, दोघेही सारखेच वाटतात. एखाद्या सिनेमात ऑपरेशन थिएटरचा सीन बघितला तर मी सरळ बॅक ऑफ द माइंड स्वयंपाकघरातल्या नवर्याला आठवते. ओटीमध्ये ऑपरेशन करण्याआधी सर्जनला पूर्वतयारी हवी असते. मग सिस्टर, ब्रदर, असिस्टंट डॉक्टर आधीच सगळ्या वस्तू ठरलेल्या जागी ठेवतात. हा येतो, मास्क, ग्लव्हज, सर्जिकल गाऊन घालतो आणि हातवारे करत एक-एका वस्तूसाठी इशारे करतो. तो सलाईन चढवत नाही किंवा नेस्थेशिया देत नाही; ऑक्सिजन सिलिंडरला हात लावत नाही.
अशा तत्सम कामासाठी अन्य मदतनीस सिस्टर, असिस्टंट डॉक्टर किंवा शिकाऊ डॉक्टर बाजूला असतात. सर्जन फक्त शस्त्रक्रिया आटोपतो आणि निघून जातो.
अगदी अशाच प्रकारे, भाजी करणार्या नवर्याला पूर्वतयारीमध्ये आधीच चिरलेली भाजी, कांदा, टोमॅटो, सोललेला लसूण किंवा त्याची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, समोर मसाल्याचा डबा, तेल, मीठ, इतर मसाले, हातात चमचा, झारा, सुरा इत्यादी; कढई, चमचा आणि डोळ्याच्या कक्षेत येईल इतकं समोर लागतं. त्याही पलीकडे, आधी लायटरने गॅस प्रज्वलित करायचा, कारण त्याला लायटर समोर असूनही बरेचदा दिसत नाही. मध्येच गॅस संपला तर तो स्वतः नवीन सिलिंडर लावत नाही. जसा सर्जन सलाईन लावत नाही, तसा नवरा अधेमधे भाजीत पाणी घालायचं असेल तर स्वतः आणत नाही. तो बोटाने रिकामं भांडं दाखवतो.
सर्जन ऑपरेशन झाल्यावर पेशंट शुद्धीवर येईल तोपर्यंत तिथेच बसून राहत नाही; त्याला सिस्टरने सांगितल्यावर तो शुद्धीवर आलेल्या पेशंटला बघायला ओटीमध्ये येतो. तसाच नवरा भाजी फोडणी घातल्यावर तिथे उभा राहत नाही; जेव्हा बायको सांगते भाजी शिजली, त्यानंतर तो ओट्याजवळ येतो. ऑपरेशन झाल्यावर सर्जन साफसफाई करत नाही, व्हिजिटला आल्यावर ड्रेसिंग करत नाही; त्यासाठी नेमलेला स्टाफ असतो. भाजी झाल्यावर नवराही ओट्यावरचा पसारा आवरत नाही, भांडी घासत नाही; त्यासाठी पण नेमलेला ‘बायकोरूपी सोलो स्टाफ’ असतो.
यशस्वी शस्त्रक्रियेसाठी पेशंटचे नातेवाईक क्रेडिट सर्जनला देतात. तो ते आनंदाने स्वीकारतो, पण एखादेवेळी शस्त्रक्रियेत त्याच्यामुळे चुका झाल्या आणि पेशंटला इंज्युरी झाली किंवा तो दगावला, तर तो अजिबात मान्य करत नाही.
‘बीपी लो झाला’, ‘इन्फेक्शन वाढलं’, ‘पेशंट रिस्पॉन्ड करत नव्हता’ इत्यादी कारणं पुढे केली जातात. तसंच भाजीचं पूर्ण क्रेडिट नवर्याला जातं. जर ती भाजी खरोखर छानच झाली असेल तर आठ दिवस तरी ते गुणगान खाणार्याला करावं लागतं; पण जर का बिघडली, तर तो स्वतःची चूक मान्य करत नाही. उलट ‘मसाल्याची क्वालिटी चांगली नव्हती’, ‘मुळात आजकालच्या भाजीपाल्याला चवच नाही’, ‘रासायनिक खताचा वापर’ इत्यादी कारणं पुढे करून काढता हात घेतो.
सर्जन विशिष्ट अवयवाचा स्पेशालिस्ट असतो म्हणजे त्याचा अभ्यास फक्त ब्रेनपुरता असेल तर तो ब्रेनच्या शस्त्रक्रिया करतो जर हार्ट स्पेशालिस्ट असेल तर तो हार्ट बघतो, नवर्याची डिग्री पण तशीच असते. जर तो नॉनव्हेज पदार्थात मास्टर असेल तर तो नॉनव्हेजच बनवतो. सर्जन आणि सर्जनशील नवरा दोघेही सारखेच! जसा सर्जनच्या हाताला गुण असतो, तशीच भाजी करणार्या नवर्याच्या हाताला चव असते.
तर, आता कळलं का मला भाजी करणारा नवरा ‘सर्जन’सारखा का वाटतो? पण एक सांगू का, या ‘सर्जरी’नंतर मिळणारी चव आणि त्यातलं त्याचं ‘सर्जनशील’ प्रेम हे कशाच्याच मोबदल्यात मिळत नाही.
पण शेवटी ‘डिस्चार्ज’ द्यायचा असो किंवा ‘जेवणाची डिश’ वाढायची, असो सर्जन आणि नवरा इथे पण स्टाफच्याच भरवशावर असतात.
ओटी आणि मसालेदार ऑपरेशन थिएटर! ओट्याजवळचा नवरा आणि ओटीमधला सर्जन …
खरं सांगा आहे ना साम्य दोघांतही?
A Creative Husband… The Lap and the Kitchen Counter…