संपादकीय

स्वतःच्या दृष्टिकोनाची तपासणी करण्याचा दिवस

अंधांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवून आणण्याची किमया पांढर्‍या काठीने जगाला दाखवून दिल्यानेच जागतिक पातळीवर 15 ऑक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजातील कोणालाही ओळखण्यासाठी आयडेंटिटी दिली नाही, पण ज्यांच्या हातात पांढरी काठी, तिच्या तळाला लाल रंग असणारी काठी ज्याच्याजवळ असते ती व्यक्ती दृष्टिबाधितच आहे, हे स्पष्ट होते.
पांढरी काठी ही केवळ दृष्टिबाधित व्यक्तीला चालण्यासाठी मदत करणारे साधन नाही, तर ती त्यांची जीवनदायिनी आहे. स्वातंत्र्य, स्वावलंबन, आत्मविश्वास, सुरक्षितता आणि सन्मानाचे प्रतीक आहे. पांढरी काठी आणि ब्रेल लिपीने अंधांच्या जीवनात विकासात्मक बदल आणि शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकत असल्याने त्यांना कोणाचाही आधार न घेता स्वतः सक्षम होऊन जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे त्यांना सुरक्षित वातावरण आणि स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आवश्यक आहे. भूतकाळात अंध व्यक्तीला समाजाने दुर्लक्षित केले, त्याला माणूस समजत नव्हते. ईश्वराने जन्म दिला. नैसर्गिक आपत्ती किंवा जन्मतःच काही व्यक्ती अंध असतात. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क व अधिकार घटनेने दिला आहे. तेव्हा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यासाठी समाज सुधारकांनी संशोधन केले. त्यातही त्यांना हेलन केलर, लुई ब्रेल हे स्वतः अंध असून, जीवनात कशी प्रगती केली, तो आदर्श डोळ्यासमोर होता.
अंधांना कुणाचा आधार घेता लागू नये म्हणून पांढरी काठीचा शोध लागला. त्यांना लिहिता, वाचता यावे म्हणून लुई ब्रेलने ब्रेल लिपीचा शोध लावला. हेलन केलरने स्पर्श लिपीतून अंधांना, तर कर्णबधिरांना साई लँग्वेजमधून साक्षर करता येते. अंधांमध्ये सर्व क्षमता आहे, पण दृष्टी नाही. त्यांच्याकडे दृष्टिकोन, काहीतरी करण्याची जिद्द व क्षमता आहे. पांढरी काठी असली तरी त्याचा वापर दिशा ज्ञान, वाहतूक नियम, सार्वजनिक ठिकाणाचा वापर आणि सुरक्षित प्रवासाचे प्रशिक्षण देणे, हे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल केल्याने दृष्टिबाधित व्यक्ती शिक्षणाच्या प्रवाहात येऊन सर्वसामान्यांप्रमाणे प्रगती करू लागली. कुणाचा आधार न घेता स्वतः पांढर्‍या काठीच्या सहाय्याने रस्त्यावर स्वतः चालू लागले, बागडू लागले, सक्षम होऊ लागले. ही सारी लीला या पांढरी काठीचीच होय. पांढरी काठीधारक व्यक्ती दिसली की, लोक त्याला मदत करण्यास धावतात. मदतीची भावना ठीक आहे; परंतु मदत करताना त्या अंध व्यक्तीची स्वायत्तता आणि सन्मान जपणे, हे महत्त्वाचे आहे. त्याला अपमान वाटता कामा नये. काही अंधांना हातात धरून ओढतात, त्यांची काठी पकडतात किंवा त्यांची दिशा स्वतः बदलतात, हे वर्तन बरोबर नाही. अंधांना मदत करताना त्यांना विचारूनच अंमलबजावणी करावी. त्याशिवाय अंध व्यक्ती सक्षम होऊ शकत नाही.
रस्ते, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित करणे
दृष्टिबाधित व्यक्तीच्या पांढर्‍या काठी इतकीच त्याला सुगम पायाभूत सुविधा महत्त्वाची आहे. त्यासाठी फुटपाथवर दुकाने, अडथळे, वाहने पार्किंग सोडून न लावणे, बांधकामांचे साहित्य रस्त्यावर पडून राहणे, उघडी गटारे, अतिक्रमणांतर्गतची दुकाने, जाहिरात फलक हे जर असेल तर दृष्टिबाधितांना सुरक्षित प्रवास करता येत नाही. त्यामुळे दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन शहराचे नियोजन करताना दिव्यांग व्यक्तीच्या गरजांचा विचार करणे, ही सामाजिक जबाबदारी नव्हे, तर त्यांच्या हक्काचा विषय आहे.
पांढरी काठी दिसतात वाहन चालकाणे विशेष सावधगिरी बाळगणे, हॉर्नचा अनावश्यक वापर टाळणे जीवन सुरक्षित करू शकतात. पांढरी काठी हा स्वावलंबनाचा मार्ग आहे. आता तर शिक्षण कौशल्य, स्वयंरोजगार, व्यवसाय करता येत आहे. पण त्यांना सर्वत्र सार्वजनिक जीवनात समान सहभाग देण्याची समाजाचीही तेवढीच जबाबदारी आहे. दृष्टिबाधित व्यक्तीच्या जीवनात फार मोठा बदल सध्या होत आहे. त्यांना स्मार्टफोन, स्क्रीन रीडर, ओसीआर, जीपीएस आधारित नेव्हिगेशन, डिजिटल व ऑनलाइन शिक्षण मिळत असल्याने दैनंदिन कामे सुलभ झालेली आहेत. पांढरी काठी तंत्रज्ञानाचा वापर करून सेन्सरयुक्त काठीचा वापर होत आहे.
अंधांच्या जीवनात सन 2016 च्या कायद्यानुसार समानता, भेदभावविरहित वागणूक, रोजगार, सामाजिक सहभागात समावेश, अधिकारी पदावर नियुक्त्या 5 टक्के करून सक्षमीकरण होत आहे.
आज महाराष्ट्राचा विचार करता नॅब महाराष्ट्र नाशिक येथे अंधांच्या प्रगतीसाठी नाट्यगृह, कम्युनिटी रेडिओ केंद्र, जिम आणि स्पर्धा परीक्षा, एमपीएससी, यूपीएससीकरिता प्रशिक्षण केंद्र व वसतिगृहाची निर्मिती केली आहे. शिक्षण अंधांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे कार्य चालू आहे. नेत्र हॉस्पिटलद्वारे अंधत्व येऊ नये म्हणून वैद्यकीयदृष्ट्या उपचार आणि प्रबोधनात्मक कार्य सुरू आहे. महाराष्ट्र नॅबचे कार्य रामेश्वर कलंत्री, गोपी मयूर, सूर्यभान साळुंखे आणि मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली घोडदौड चालू आहे. बँक, शासकीय सेवा, उद्योग, वैद्यकीय सेवांमध्ये अंध व्यक्ती सक्षम होत आहेत. त्यांचा आधार पांढरी काठी आहे.
पांढरी काठी दिनानिमित्त जनतेने फुटपाथ अडवणार नाही, सुरक्षित मार्ग देईन, त्यांच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी, समान हक्कासाठी सकारात्मक भूमिका घेईन, संधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करीन, अशी भूमिका घ्यायला हवी. अंधांच्या जीवनात पांढरी काठी हातात, स्वावलंबनाची वाटचाल, सन्मानाचे जीवन, समाजाची ओळख, आता त्यांना दृष्टीचा अभाव म्हणजे दृष्टिकोनाचा अभाव नाही यादृष्टीने त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन परिवर्तनाचे कार्य करूया. हेच 15 ऑक्टोबर अंध दिनाचे महत्त्व जनता प्रबोधनासाठी आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात दिव्यांगांचा सहभाग असणार आहे. तेव्हा कायद्यानुसार त्यांना सन्मानाने या सोहळ्याचा आनंद घेता येईल यादृष्टीने दिव्यांगांसाठी विना अडथळा व्यवस्था होईल, यादृष्टीने कटिबद्ध व्हावे. म्हणूनच 15 ऑक्टोबर स्वतःच्या दृष्टिकोनाची तपासणी करण्याचा दिवस आहे, हेच खरे!

A day to examine one’s own perspective

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

7 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

7 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

7 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

7 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

8 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

8 hours ago