थंडीचे दिवस सुरू झाले की, पहाटेची झोंबणारी हवा अन् हातापायांत भिनलेला गारठा आपल्यालाही नकळत गावाकडच्या त्या दिवसांची आठवण करून देतो. शहरातील थंडी कोरडी आणि एकाकी असते – इथले लोक फक्त गरम, लुसलुशीत ब्लँकेट, स्वेटर आणि जर्किंग यांसारखे कपडे अंगावर ओढतात. त्याने शरीराला उबदार वाटते; पण मनातली थंडी मात्र काही जात नाही. मनातली थंडी जाण्यासाठी खेड्यातल्या अंगणात पेटवलेली शेकोटीच लागते. गावाकडच्या थंडीत एक वेगळाच जिव्हाळा असतो आणि त्या जिव्हाळ्याच्या केंद्रबिंदूत असते ती ही शेकोटी!!
ते जुने दिवस आठवले की, मला आठवते ती दिनू तात्याने पहाटे पहाटे खळ्यावर पेटवलेली शेकोटी!
पहाटेच्या धुरकट धुक्यात, सूर्याचे पहिले किरण अद्याप वाकूनही दिसण्याआधी, खळ्याच्या एखाद्या कोपर्यात अथवा जनावरांच्या गोठ्याजवळ कुठेतरी शेकोटीची लालसर ज्योत डोलू लागली की समजायचे दिनू तात्याची शेकोटी पेटली. मग डोळ्यांवर कितीही गाढ झोप असली तरी आम्ही सर्व- मावडीपासून ते ब पर्यंत त्या शेकोटीच्या आजूबाजूला गोळा व्हायचो. मग उसाच चिपाड, सरपण अन् पालापाचोळा टाकत त्या शेकोटीचा परीघ अजूनच वाढायचा. आधी तळहातांवर हात घासून ते त्या शेकोटीच्या भोवती धरले जायचे. मग हळूहळू मांडी घालून बसलेली मंडळी मांड्या मोडून एक-एक तळपाय शेकवून घ्यायचे. बैलांना चारा घालण्यापूर्वी क्षणभर शेकोटीभोवती तात्या विश्रांती घ्यायचे, घरातील सुना गोठ्यातील शेणपाणी करून झाले की त्या ओलसर अंगानेच लगबगीने शेकोटीचा आधार घ्यायच्या. तर चुलीवरचा दिवस सुरू करण्याआधी आजी तिच्या नातीसह त्या उबदार स्पर्शात काही क्षण बुडवून घ्यायची. तो तेव्हाचा उबदार स्पर्श किती मौल्यवान असायचा हे आता लक्षात येते.
शेकोटी म्हणजे फक्त आग नसते, ती एक जिवंत साथ असते. ती शरीराला ऊब देते आणि मनाला एक आश्वासक, गोड स्पर्शही देते. तिच्या भोवती बसताना माणसांमधला अनोळखीपणाचा पडदा हळूहळू विरळ होतो. बोलण्याला कुठलेही कारण लागत नाही; शब्द आपोआप ओठांवर येतात. थंड हवेत वर जाणार्या धुराबरोबर मनात साठलेली दगदग, काळजी आणि थकवा जणू विरघळून नाहीसा होतो.
खरंतर गावाकडच्या थंड हिवाळ्यात शेकोटीला एक खोल अर्थ होता – ती एकत्र येण्याची परंपरा होती, मन जोडण्याचा संस्कार होता. रात्रीच्या प्रचंड गारव्यात घराबाहेर पेटलेल्या शेकोटीभोवती वृद्ध मंडळी जुन्या कथा सांगत बसत, पोरं हसतखेळत त्या ऐकत, तर आई-वडील दिवसभराचे अनुभव शेअर करत. त्या क्षणांत थंडी, आग आणि माणुसकी यांचा एक अतिसुंदर संगम घडत असे- एक अशी ऊब जी आयुष्याला अर्थ देऊन जात असे.
आजच्या धावपळीच्या आधुनिक जीवनात शेकोटी पेटवण्याइतका वेळ किंवा प्रसंग फार कमी लोकांकडे उरला आहे. तरीही, हिवाळा येताच मनात कुठेतरी एक हळूवार ठिणगी पडते-त्या पहाटेच्या ओलसर जमिनीच्या वासाची, धुरकट धुक्याची आणि शेकोटीच्या त्या उबदार, मायेच्या स्पर्शाची..!
शेकोटी आपल्याला शांतपणे सांगून जाते की, उब ही फक्त आगीची नसते- ती नात्यांची, आठवणींची आणि माणुसकीचीही असते..!! थंडीच्या या दिवसांत मनाला खरी उब देणारी अशी एखादी छोटीशी आठवण आयुष्यभर जिवंत राहते. हिवाळा येतो आणि या आठवणी पुन्हा मनात उजळून निघतात.. उबदार, जिवंत आणि कायमच्या अमर राहण्यासाठी…
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…