महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार दत्तात्रय राघोबाजी ऊर्फ दत्ताभाऊ मेघे यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले. दत्ताभाऊ हे एक कुशल राजकारणी होते आणि तितकेच समाजकारणीदेखील होते. विदर्भात उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी जीवाचे रान केले आणि शिक्षणसंस्था उभारल्या. बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून सहकारी क्षेत्रात कारखाने उभारले. ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम सुरू केले. मात्र, हे सर्व करत असतानाच त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे, दत्ता मेघे हे एक सहृदय माणूस होते.
त्यांच्या पांडे लेआउट येथील निवासस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घ्यायला येणारे असंख्य नागरिक होते आणि ते सर्वच दत्ताभाऊंचे माणूसपण वारंवार आठवून एकमेकांना सांगत होते, हेच दत्ता मेघे यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
दत्ता मेघे अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे 11 नोव्हेंबर 1936 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण तसे हालाखीतच गेले. तरुण वयातदेखील त्यांना बराच संघर्ष करावा लागला होता. सुरुवातीच्या काळात एलआयसी एजंट म्हणून ते काम करत होते.
लग्नानंतर ते नागपुरात महाल विभागात राहायला आले. त्यावेळी अनेकदा घरभाडे द्यायलासुद्धा त्यांच्याजवळ पैसा नसायचा. त्यासाठी घरमालकाच्या चार गोष्टी त्यांना ऐकाव्या लागायच्या. मात्र, त्या परिस्थितीतदेखील ते डगमगले नाहीत. व्यवसायाबरोबर सामाजिक क्षेत्रातदेखील ते सक्रिय होतेच. त्यांनी 1970 च्या कालखंडात नागपुरात युवक कॅडर नावाची संघटना उभी केली. या संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न ते सोडवत असत. त्यावेळी नागपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री नरेंद्र तिडके यांचे मेघेंकडे लक्ष गेले आणि त्यांनीच दत्ताभाऊंना काँग्रेसमध्ये आणले. काँग्रेसमध्येदेखील ते त्या काळात एक आक्रमक कार्यकर्ते म्हणून पुढे आले.
1978 मध्ये ते महाराष्ट्रात सत्तारूढ झालेल्या वसंतदादा पाटील मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले. विशेष म्हणजे तोपर्यंत दत्ता मेघे साधी ग्रामपंचायत निवडणूकदेखील लढलेले नव्हते. याच काळात ते शरद पवारांच्या संपर्कात आले. जुलै 1978 मध्ये शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत बाहेर पडणार्या पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये दत्ताभाऊ होते. मग पवार मंत्रिमंडळातदेखील ते मंत्री राहिले होते. याच काळात ते विधान परिषद सदस्य बनले होते.
आपल्याला शिक्षण घ्यायला त्रास पडला हे बघून दत्ता मेघे यांनी नागपूर व विदर्भात जास्तीत जास्त शिक्षणसंस्था कशा उभ्या करता येतील, यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. नगर युवक शिक्षणसंस्था स्थापन करून सर्वप्रथम त्यांनी फार्मसी कॉलेज आणि पॉलिटेक्निक सुरू केले. मग इंजीनिअरिंग कॉलेज मग शारीरिक शिक्षण महाविद्यालय असे करत करत आज त्यांच्या अखत्यारित जवळजवळ पन्नासहून अधिक शाळा आणि महाविद्यालये आहेत. त्यात वर्ध्याजवळ सावंगी मेघे येथील सुसज्ज अशी मेडिकल इन्स्टिट्यूटदेखील आहे.
दत्ताभाऊ मेघे 1978 ते 1991 महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सदस्य होते. या काळात ते काही काळ मंत्रीदेखील राहिले. 1991 मध्ये ते लोकसभेत खासदार म्हणून गेले, मग एकदा नागपूर लोकसभा, एकदा रामटेक लोकसभा आणि एकदा वर्धा लोकसभा असे ते लोकसभेतही गेले. एकदा राज्यसभेतही त्यांना संधी मिळाली होती.
या काळात त्यांनी विविध सामाजिक कामे केली. मात्र, ते खरे ओळखले गेले ते त्यांच्यातील दातृत्वासाठी. त्यांनी आयुष्यात स्वतः अत्यंत अडचणीचे दिवस पाहिले होते. त्यामुळे गरिबी काय हे त्यांना माहीत होते. म्हणूनच त्यांच्याकडे कोणीही अडचणीतला माणूस आला की, त्याला दत्ताभाऊ स्वतःहून जी काही लागेल ती आर्थिक मदत करून मोकळे व्हायचे. पैसे परत आले ना आले याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. त्यांच्या या दातृत्वाची अनेक उदाहरणे मी एक पत्रकार या नात्याने त्यांचा माझा जो काही जवळीकीचा संबंध आला त्यात बघितली आहेत. अनेक गरजू विद्यार्थ्यांचे त्यांनी सवलतीच्या दरात किंवा प्रसंगी विनामूल्य शिक्षणदेखील केले होते. कित्येक सामाजिक संस्थांना आणि उपक्रमांना त्यांनी भरभरून मदत केली. अनेकांची आयुष्य त्यांनी मार्गी लावली.
आयुष्यात कोणी मदत केली तर ती विसरायचे नाही, हे दत्ताभाऊंचे तत्त्व होते. नागपुरात सुरुवातीच्या दिवसात महाल विभागात राहत असताना त्यांच्या पत्नी बर्याचदा काही कारणाने त्यांच्या मूळ गावीच असायच्या. मग हे एकटेच राहायचे. अनेकदा घरभाडे द्यायला पैसे नसायचे. घरात काही खायला-प्यायलादेखील नसायचे. बाहेर पैसे खर्च करणेदेखील शक्य नसायचे. सकाळी घरून गेलेले रात्री उशिरा ते घरी परत यायचे. त्यावेळी घरमालकाचे आणि त्यांचे थकीत भाड्यासाठी वाद व्हायचे. मात्र, त्या घरमालकाच्या पत्नी समंजस होत्या. त्या आपल्या पतीला समजावायच्या आणि दत्ता मेघे दिवसभर उपाशी राहिले असतील हे लक्षात घेत त्यांना घरात बोलावून इतक्या उशिरा जेवू घालायच्या. ही बाब दत्ताभाऊंनी आयुष्यभर लक्षात ठेवली आणि ते खाल्ल्या मिठाला जागलेदेखील. नंतर कधीतरी या दाम्पत्याचा एक मुलगा वृत्तपत्रांसाठी जाहिरात एजंट म्हणून काम करतो, असे दत्ताभाऊंना कळले. त्यांनी लगेच त्या मुलाला आपल्याकडे बोलावून घेत आपल्या सर्व संस्थांच्या जाहिराती त्याच्याचमार्फत दिल्या जाव्यात, असे आदेश काढले आणि इतरही मित्रांना सांगून त्याला व्यवसायात स्थिरस्थावर करून दिले. आज तो परिवार दत्ताभाऊंचेच नाव घेतो.
सन 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. तेव्हा दत्ताभाऊदेखील त्यांच्यासोबत बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. मात्र, पुढे जाऊन पक्षातील नागपूर जिल्ह्यातीलच काही नेत्यांशी त्यांचे पटेनासे झाले आणि शेवटी 2008 मध्ये त्यांनी शरद पवारांचा साथ सोडून काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय जाहीर करण्यासाठी नागपूरच्या घरी आयोजित पत्रपरिषदेत दत्ताभाऊ ढसाढसा रडले होते.
राजकारणापलीकडे मैत्री जपणे हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. नागपूरचे भाजप कार्यकर्ते नितीन गडकरी नंतर विधान परिषद सदस्य झाले. त्यावेळी दत्ताभाऊंचे आणि गडकरींचे संबंध आले. पक्ष वेगळा असतानाही त्यांच्या मैत्रीत कधीच अडचण आली नाही. दोघांनीही अखेरपर्यंत आपली मैत्री जपली. नागपूरची शिक्षक सहकारी बँक ही संघ परिवारातील मंडळींशी जवळीक ठेवणारी होती. मात्र, त्या बँकेतदेखील दत्ताभाऊंनी आपल्या शिक्षण संस्थेची खाती उघडली आणि डिपॉझिट्स ठेवली होती. कोणालाही मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव होता.
गडकरींवरच्या प्रेमापोटी त्यांची भाजपशी हळूहळू जवळीक वाढू लागली होती. त्यातूनच 2003 मध्ये त्यांचा मुलगा सागर हा भाजपमध्ये आला आणि विधान परिषद सदस्य झाला. पुढे जाऊन हळूहळू दत्ताभाऊदेखील भाजपाकडे झुकत होते. 2014 मध्ये ते भाजपमध्ये आले. त्यानंतर त्यांचा धाकटा मुलगा समीर हा नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा क्षेत्रातून विधानसभेवर भाजपचा उमेदवार म्हणून विजयी झाला. तेव्हापासून समीर आमदार आहे. सागरलादेखील वर्धा जिल्ह्यातून लोकसभेची उमेदवारी भाजपनेच दिली होती. मात्र, सागर तिथे निवडून येऊ शकला नव्हता.
सामाजिक कार्याला मदत करणे हे त्यांनी कायम परमकर्तव्य मानले होते. मला आठवते 2017 मध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या नवीन डिस्ट्रिक्ट गव्हर्नरच्या पदग्रहण समारंभात त्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते. ते डिस्ट्रिक्ट गव्हर्नर महेश मोकळकर हे
वर्धेचेच होते. त्यांच्या पदग्रहण समारंभात दत्ताभाऊंनी तुम्ही कोणताही नवा प्रोजेक्ट वर्धा जिल्ह्यात उभा करा आणि मी त्याला पाच कोटी रुपयांपर्यंत मदत करायला तयार आहे, अशी घोषणा करून टाकली होती आणि आपला शब्द त्यांनी कायमही ठेवला.
असे दत्ताभाऊ मेघे एक राजकारणी होते, एक कुशल प्रशासकदेखील होते, द्रष्टे नेते होते आणि त्याचबरोबर ते एक सहृदय माणूसदेखील होते. त्यांच्या सहृदयतेचा अनुभव माझ्यासारख्या अनेकांनी अनेकदा घेतलेला आहे. तिथे त्यांना पक्षभेद, जातिभेद, धर्मभेद काहीही आडवा येत नव्हता. फक्त माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे आणि त्याला मदत करावी, हेच त्यांचे तत्त्व होते. म्हणूनच दत्ता मेघे बाकी काहीही आणि कसेही असले, तरी ते सर्वप्रथम आणि अखेरपर्यंत एक चांगला माणूस होते आणि चांगला माणूसच राहिले.
A man named Datta Meghe…
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…