रस्त्यावर मृत कोंबड्यांचा खच ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

रस्त्यावर मृत कोंबड्यांचा खच

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

लासलगाव : वार्ताहर

निफाड पूर्व भागातील भरवस फाटा ते कोळपेवाडी या राज्यमार्गावरील सातमोऱ्या परिसरात अज्ञातांनी पिकअप भर मृत कोंबड्या आणून टाकल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सातमोऱ्या परिसर हा सुनसान परिसर मानला जातो. या परिसरात नेहमीच मृत कोंबड्या आणून टाकल्या जातात. मात्र यावेळेस रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सुमारे पिकअप भर मृत कोंबड्या आणून टाकल्या आहेत. या सर्व मृत कोंबड्यांच्या शरीराची विघटन प्रक्रिया होण्यास सुरुवात झाली असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणत दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील त्रास सहन करावा लागत असून शेतीकामांवर देखील परिणाम झाला आहे. या परिसरात भटकी कुत्री, तरस सदृश्य प्राणी गोळा झाले आहेत. भटके कुत्रे मृत कोंबड्यांवर ताव मारत आहेत. मात्र कोंबड्या कोणत्या कारणाने मृत झाल्या आहेत याबाबत काही माहिती नाही. कोंबड्या बर्ड फ्लू सारख्या संसर्गजन्य आजाराने मृत झाल्या असल्यास तो आजार संक्रमित होऊ शकतो व हे कुत्रे मानवी वस्तीवर आल्याने पाळीव कुत्र्यांमध्येही रोगराई पसरण्याची शक्यता आहे, परिणामी नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून नाशिक, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक शिर्डी येथे जातात. आता उन्हाळी सुट्टी असल्याने त्यात पायी प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना येथून नाक मुठीत धरून चालावे लागतेच मात्र मोकाट कुत्र्यांमुळे त्यांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे संबधित खात्याने किंवा प्रशासनाने वारंवार मृत कोंबड्या टाकणाऱ्यांचा शोध घ्यावा व त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *