निपमच्या कार्यशाळेत मान्यवराच्या चर्चेतील सूर
नाशिक : प्रतिनिधी
व्यवस्थापनाला कामगारांची नाडी ओळखून त्यांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवता यायला हव्यात. अन्यथा प्रश्न वाढत जाऊन कलह निर्माण होतो. औद्योगिक कलहामुळे नाशिकचे नाव खराब होत आहे. भविष्यात अशा समस्या उदभवणार नाहीत.यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. त्यामध्ये एच आरची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन कामगार उपायुक्त विकास माळी यांनी केले.
नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (निपम) यांच्यातर्फे कामगार संघटना आणि व्यवस्थापनासमोरील आव्हाने या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पुण्याचे वरिष्ठ अधिवक्ता अशोक गुप्ते, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष ऍड. अनिल धुमणे,निपमचे अध्यक्ष प्रकाश बारी,सीएटचे उपाध्यक्ष श्रीनिवास पत्की, डॉ. उदय खरोटे, हेमंत राख, वैभव डोंगरे, ऍड. एस. एस खैरनार, राजाराम कासार, राहुल बोरसे, विनायक पाटील,माजी अध्यक्ष सुधीर पाटील, प्रकाश गुंजाळ उपस्थित होते.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सीएटचे उपाध्यक्ष श्रीनिवास पत्की होते. या वेळी झालेल्या चर्चासत्रात ऍड. अशोक गुप्ते, ऍड. अनिल धुमणे यांनी विचार मांडले. महिंद्रा आणि महिंद्रा एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष एन.डी. जाधव, आयएसपी प्रेस कामगार मजूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, एचएएल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष अनिल मंडलीक, सीटुचे राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल कराड, श्रमिक कामगार सेनेचे सुनील बागूल, एमएसएल युनियनचे अध्यक्ष उत्तमराव खांडबहाले यांनी पॅनल भूमिका मांडली. चर्चेचे नेतृत्व डॉ. उदय खरोटे यांनी केले. यावेळी त्यांनी डॉ. डी.एल. कराड आणि सुनील बागूल यांची मुलाखत घेत सद्याच्या युनियन आणि मॅनेजमेंट याविषयी प्रश्न विचारत संवाद साधला. शारदा मोटर्सचे कार्यकारी संचालक हिरामण आहेर यांनीही समारोपात विविध विषयावर उहापोह केला. राजाराम कासार यांनी उपस्थित मान्यवरांनी कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्याविषयी ज्या सूचना मांडल्या त्याविषयी कौतुक करत आभार मानले.
कामगार संघटनांसाठी खुले व्यासपीठ
कार्यशाळेत कामगार संघटनांच्या प्रतिनिधीनी कामगार आणि कामगार संघटनेची भूमिका स्पष्ट करण्याबरोबरच औद्योगिक शांतता प्रस्थापित करण्याची ग्वाही दिली. कायदेशीर सल्लागारांनी देखील वादविवाद टाळण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली. निपमने व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांना खुले व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याने औद्योगिक शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.