अग्रलेख

अस्मानी संकटाची चाहूल

पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात इंधनटंचाई निर्माण झाली आहे. टंचाईची झळ भारताला सर्वाधिक बसली आहे. जगातील एक सर्वांत मोठा इंधन आयातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. भारताला सध्या गॅसची तीव्र टंचाई भासत आहे. परिणामी घरगुती गॅस सिलिंडर वापरावर मर्यादा आली असून, व्यावसायिक सिलिंडर पुरवठा बंद करण्यात आल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, तसेच फूड इंडस्ट्रीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या व्यवसायातील कामगारांवर संकट आले आहे. युद्धाची झळ सर्वच क्षेत्रांना बसू लागली आहे. हे संकट कधी दूर होईल, याचा काहीही अंदाज नसताना भारताला दुसर्‍या एका संकटाची चाहूल लागली आहे. उन्हाळा सुरू झाल्यानंतर मॉन्सून म्हणजे मोसमी पावसाचे अंदाज वर्तविले जातात. भारतात यंदा एल निनो घटक सक्रिय होणार असल्याने पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकीकडे गॅसअभावी रासायनिक खतांच्या उत्पादनावर परिणाम झाला असताना मॉन्सून धोका देणार असल्याचे संकेत आहे. यंदा पाऊस कमी पडला, तर अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अन्नधान्याची टंचाई निर्माण होईल, जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न निर्माण होईल. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवेल. शेतकरी कंगाल होईल. तो परत कर्जाच्या खाईत जाईल, अशी संकटे आहेत. अतिवृष्टी, पूर, अवर्षण अशा संकटांचा सामना शेतकरी नेहमीच करत आला आहे. ’ला निना’च्या सक्रियतेने देशात गेली दोन वर्षे चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक व पाणी चांगले झाले. पाण्याची चिंता नव्हती. सन 2025 मधील अतिवृष्टी आणि कडाक्याच्या थंडीनंतर आता भारतीय हवामानावर ’एल निनो’चे सावट पसरले आहे. भारतीय हवामान विभाग आणि खाजगी हवामान संस्था स्कायमेट यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, 2026 मध्ये एल निनो स्थिती विकसित होण्याची दाट शक्यता असून, यामुळे देशात सरासरीपेक्षा कमी मॉन्सूनचा धोका निर्माण झाला आहे. यावर्षी मॉन्सून कमकुवत किंवा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटने जानेवारीतच वर्तवला होता. या अंदाजाला जागतिक हवामान संघटनेने याच महिन्यात दुजोरा दिला आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान असामान्यपणे वाढले की, त्याला ’एल निनो’ असे म्हटले जाते. ‘एल निनो’चा भारतीय मॉन्सूनवर प्रतिकूल परिणाम होतो. ला निना ही घटना एल निनोच्या उलट असते. प्रशांत महासागरातील पृष्ठभागाचे तापमान असामान्यरीत्या घटते. यामुळे वातावरणातील वार्‍याची रचना मॉन्सूनला अनुकूल होते आणि भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडतो. परिणामी मॉन्सून बळकट होतो; परंतु अतिवृष्टी, पूरस्थिती व भूस्खलन यांचा धोका वाढतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 2026 च्या सुरुवातीला ‘एल निना’चा प्रभाव संपल्यानंतर जुलै ते सप्टेंबर या मुख्य मॉन्सून काळात एल निनो स्थिती प्रबळ होऊ शकते. युरोपीय हवामान संस्थांनीही आपल्या विश्लेषणामध्ये 2026 च्या उत्तरार्धात ‘एल निनो’ परतण्याचा इशारा दिला असून, यामुळे जागतिक तापमानातही वाढ होऊ शकते. भारताने यापूर्वी अनेक एल निनो वर्षांमध्ये गंभीर दुष्काळाचा सामना केला आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून, येथील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मॉन्सूनचे आगमन आणि पावसाचे प्रमाण हे शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. यंदाच्या मॉन्सूनबाबतचा पहिला अंदाज समोर आला असून, त्यानुसार देशावर ‘अस्मानी संकट’ येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक हवामान संघटनेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यावर्षी मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. हा प्रभाव कायम राहिला तर भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेती क्षेत्रासाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. गेल्या वर्षी देशात मॉन्सून अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला होता. अनेक राज्यांना अतिवृष्टीचा फटका बसला होता आणि त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होता. अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनकडे शेतकर्‍यांचे विशेष लक्ष लागले आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते यावर्षी उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही एल निनोचा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एल निनोचा प्रभाव नेमका किती असेल याबाबत आत्ताच ठाम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे काही हवामानतज्ज्ञांचे मत आहे. मे महिन्यानंतर मॉन्सूनची खरी स्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या घाबरण्याचे कारण नसले, तरी यंदाच्या मॉन्सूनवर एल निनोचे सावट असल्याचे चित्र दिसत आहे. पश्चिम आशियात युद्ध भडकण्याची शक्यता होतीच. पण नेमके युद्ध कधी सुरू होणार, याचा मागमूस नव्हता. त्यामुळे आपल्याला युद्धोेत्तर संभाव्य संकटाचा अंदाज आला नव्हता. मॉन्सूनचा अंदाज आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून खरा अंदाज मे महिन्यात वर्तविला जाणार असला, तरी एल निनो सक्रिय राहणार असल्याचा जो अंदाज स्कायमेट आणि जागतिक हवामान संघटनेने वर्तविला आहे, त्याची दखल घेतली गेली पाहिजे. संभाव्य अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी आतापासूनच सरकारने तयारी करावी, अशी परिस्थिती आहे. हवामान कधी बदलेल, याचा काही अंदाज लागत नसतो. तरीही संभाव्य संकटांचा सामना करण्याची तयारी ठेवलीच पाहिजे.

A sign of impending disaster

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

16 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

16 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

16 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

16 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

16 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 hours ago